प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )
प्रकरण १५ वें. : इतिकर्तव्यता.
उपप्रकरण २ रें.
राष्ट्रधर्म व राजकीय बल.
ब्रिटिश कमिटी.- राष्ट्रीयसभेची ‘ब्रिटिश काँग्रेस कमिटी’ म्हणून लंडनमध्यें एक शाखा आहे. हिंदुस्थानांतील राष्ट्रीयसभेकडून या कमिटीस पैसा पुरविण्यांच येतो. या कमिटीस तिची स्वतःची कचेरी असून तिला जोडूनच मतप्रसार करण्याकरितां ‘इंडिआ’ नांवाचें एक स्वतंत्र वर्तमानपत्र आहे. ह्या वर्तमानपत्राच्या खर्चाची रकम वेगळी तोडून दिलेली आहे. त्यामध्यें हिंदुस्थानांत घडत असलेल्या प्रत्येक आठवड्यांतील ठळक ठळक गोष्टी प्रसिद्ध होत असल्यामुळें तें थोडेंबहुत उपयुक्त आहे. त्याला हिंदुस्थानांतून सर्व प्रकारची बातमी पुरविण्यांत येते व हिंदुस्थानच्या आकांक्षाविषयीं सहानुभूति बाळगणार्या व त्याच्या कल्याणाकडे व प्रगतीकडे लक्ष पुरविणार्या पार्लमेंटांतील सर्व सभासदांत त्याचा फुकट प्रसार करण्यांत येतो. या कमिटींत हिंदुस्थानांत नोकरी करून परत गेलेले अँग्लोइंडिअन लोक सभासद असतात. तिच्या अध्यक्षस्थानीं पुष्कळ दिवसपर्यंत हिंदुस्थानचे सुप्रसिद्ध हितचिंतक व त्याच्या कल्याणाकरितां अगदीं निःस्वार्थ बुद्धीनें झटणारे सर विल्यम वेडरबर्न हे होते. हिंदुस्थानानें त्यांनां दोन वेळ राष्ट्रीयसभेच्या अध्यक्षत्वाचा मान देऊन त्यांच्याबद्दल वाटत असलेली आपली कृतज्ञताबुद्धि व्यक्त केली आहे. एखाद्या गोष्टीचा खल करावयाचा असला म्हणजे ही कमिटी हिंदुस्थानांतले जे कोणी सुप्रसिद्ध किंवा पुढारी लोक लंडनमध्यें असतील त्या सर्वांनां निमंत्रण देते. हाउस ऑफ् कॉमन्समध्यें हिंदुस्थानसंबंधांत जे जे कांहीं वादविवाद होतात त्यांची ही कमिटी नेहमीं माहिती ठेवीत असते व गरच पडेर तेव्हां तेथील सभासदांस हिंदुस्थानविषयक प्रश्न विचारण्यास इकडील माहितीहि पुरविते. पूर्वीं ब्रिटिश काँग्रेस कमिटी ही हाउस ऑफ कॉमन्समधील सभासदांची एक स्टँडिंग कमिटीच होती. मध्यंतरी तिचें तें स्वरूप नाहींसें झालें होतें. इ. स. १९१३ च्या सुमारास तिला तिचें पूर्वरूप प्राप्त करून देण्याचे पुन्हां प्रयत्न करण्यांत आले. ब्रिटिश काँग्रेस कमिटी ही इंडिआ ऑफिसशीं आपला पत्रव्यवहार ठेवित व पुष्कळ वेळां ती सेक्रेटरी ऑफ् स्टेटला हिंदी लोकमत समजावून देण्याचें काम करितें. याप्रमाणें ही ब्रिटिश कांग्रेस कमिटी इंग्लंडमध्यें हिंदुस्थानची एक बरीच उपयुक्त कामगिरी बजावीत आहे. येथें हें सांगितलें पाहिजे कीं, काँग्रेसमध्यें राष्ट्रीय पक्षाचा जोर झाल्यानंतर कांहीं कालपर्यंत ब्रिटिश काँग्रेसकमिटीचें आणि इंडिया पत्राचें धोरण काँग्रेसच्या विरुद्ध होऊं लागलें होतें तें धोरण पुन्हां काँग्रेसला अनुसरून करण्याचा बराचसा यशस्वी प्रयत्न कै० लोकमान्य टिळक यांनीं इंग्लंडांत असतांना केला.