प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )
प्रकरण १५ वें. : इतिकर्तव्यता.
उपप्रकरण २ रें.
राष्ट्रधर्म व राजकीय बल.
कांग्रेसचा आरंभ.- सर वुइल्यम वेडर्बर्न यांनीं मि. अॅलन ऑक्टेव्हियन ह्यूम यांचें जें चरित्र लिहिलें आहे त्यांत कांग्रेसला आरंभ कसा झाला त्यासंबंधानें कांहीं महत्त्वाचा मजकूर आहे तो खालीं दिला आहे.
सर ऑक्लंड कॅल्व्हिन हे संयुक्त प्रांताचे लें० गव्हर्नर असतांना त्यांनीं ह्यूम साहेबांस एक पत्र लिहून कांग्रेससभा काढणारांनीं फार घाई केली, कांग्रेससारख्या सभेची प्रतिष्ठापना होण्याचा काळ तेव्हांचा नसून ही सभा स्थापण्यापूर्वीं हिंदुस्थानांत आणखी पुष्कळ सामाजिक वगैरे प्रगति व्हावयास पाहिजे होती, कांग्रेसची चळवळ ही देशाला अपायकारक आहे वगैरे विधानें त्यांत केलीं होतीं. या विधानांनां ह्यूम साहेबांनीं उत्तर देतांना कांग्रेससभा घाईनें व अवेळीं स्थापली गेली नसून सरकारच्या राज्याच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनें असल्या सभेची अत्यंत अवश्यक झाल्यामुळेंच आपण तिच्या स्थापनेचा प्रसंग घडवून आणला असें म्हटलें आहे. हा पत्रव्यवहार १८८८ च्या आक्टोबरमधील आहे. कांग्रेस स्थापनाविषयक असे ह्यूम साहेबांच्या पत्रांतील कांहीं उतारे येणेंप्रमाणेः- “माझ्या मनाप्रमाणेंच मला करतां आलें असतें तर आणखी कांहीं वर्षेंपर्यंत ही कांग्रेसची स्थापना मी पुढें ढकलली असती, पण मला व माझ्या ज्या सहकारी लोकांनीं कांग्रेस काढली त्यांनां आपल्या इच्छेप्रमाणें वागण्यास सवडच नव्हती. पाश्चात्त्य कल्पना, पाश्चात्त्य शिक्षण, शोध व साधनें हिंदुस्थानांत येऊन कांहीं दिवस झालेले आहेत व या मुदतींत त्यांनीं एक नवीन खळबळ उत्पन्न केलेली आहे. ही खळबळ जोरानें प्रसार पावून कांग्रेस स्थापनेच्या काळीं ती जमिनींत घुसून गुप्त कटांचें स्वरूप घेऊं लागली होती. अर्थात् जमिनीखालचा हा प्रसार थांबावा म्हणून लोकांच्या चित्तक्षोभाला उजेडांतली सनदशीर वाट काढून देणें अपरिहार्य झालें. ब्रिटिशांचें हिंदुस्थानांतील साम्राज्य राखावयाचें या अत्यंत जिव्हाळ्याच्या दृष्टीनें कांग्रेससंस्थापकांनां प्रश्न असा पडला होता कीं, ही कांग्रेस काढण्याची वेळ निघून तर नाहींना गेली ? देशांत इतका असंतोष माजला होता कीं कांग्रेस काढलेली फुकट जाईल, लोक या कांग्रेसकडे न बघतां कटांचाच मार्ग पुढें चालवितील अशी धास्ती आम्हांला वाटत होती. देशांत इंग्रजांच्या कारवाईनें ज्या चळवळीच्या शक्ती उत्पन्न होऊन दिवसानुदिवस सारख्या वाढत चालल्या होत्या त्यांनां बॉयलर (वाफेच्या यंत्रा) मधील वाफेला बाहेर जावयास ‘सेफ्टी व्हाल्व्ह’ (संरक्षक द्वार) असतें त्याप्रमाणें एका तोंडाची अत्यंत आवश्यकता होती व आमच्या कांग्रेसनें हें आवश्यक तोंड निर्माण करून दिलें. आमची अशी खात्री आहे कीं, लोकांतील क्षोभाची वाफ सुरक्षितपणें बाहेर पडावयास हें कांग्रेसचें तोंड जितकें कार्यक्षम झालें तितकें दुसरें कांहींहि झालें नसतें. त्या वेळीं (म्हणजे मला वाटतें लॉर्ड लिटन जाण्यापूर्वीं सुमारें सव्वा वर्ष) ज्या गोष्टीनें माझी अशी खात्री केली कीं, एक भंयकर स्फोट होऊन आपणांवर लवकरच मोठें संकट कोसळणार आहे ती गोष्ट अशीः ब्रह्मदेश, आसाम व इतर कांहीं लहान प्रांत वगळून बाकीच्या प्रदेशाचे कांहीं एका पद्धतीनें भाग पाडण्यासंबंधींचे सात मोठे ग्रंथ मला पाहण्यास मिळाले; त्यांत बर्याचशा कागदपत्रांची नोंद होती; हरएक प्रकारच्या देशी भाषेंतील रिपोर्टांचीं आणि बातम्यांचीं इंग्रजी भाषांतरें आणि कांहीं सारांश, जिल्हे (आपण पाडलेल्या जिल्ह्यांशीं असदृश), पोट-जिल्हे, तालुके, लहानमोठीं शहरें आणि गांवें अशा वर्गीकरणानें या ग्रंथांत घातले होते; या नोंदलेल्या गोष्टींची संख्या फारच मोठी होती; निरनिराळ्या तीस हजारांपेक्षांहि जास्त बातमीदारांकडून आलेल्या त्या बातम्या आहेत असा कांहीं जणांचा समज होता. अगणित वाटल्यामुळें मी त्या मोजल्या नाहींत; पण माझ्या फारच परिचयाच्या व निःसंशय तापदायक अशा वायव्य प्रांतांतील एका जिल्ह्यांतील शहरें व गांवें यांसंबंधींच्या अजमासें तीनशें नोंदण्या त्यांत होत्या; त्यांतील पुष्कळशा लोकांचीं नांवें वगैरे बाबतींत त्या मला अर्धवट ताडून पाहतां येण्यासारख्या होत्या.
“बर्याचशा नोंदण्यांतून खालच्या दर्जाच्या लोकांचीं संभाषणें उदधृत केलीं होतीं; त्यांचा सारांश इतकाच कीं हे गरीब लोक चालू कारभारासंबंधीं निराशेनें व्याप्त झालेले होते. त्यांची अशी वृत्ति होऊन चुकली होती कीं, आपण भुकेनें तडफडत मरून जाऊं, तेव्हां आपण ‘कांहींतरी’ केले पाहीजे......... आपली जूट करून हे लोक ‘कांहींतरी’ करणार होते; आणि हें कांहींतरी म्हणजे अत्याचार, साहस इ. होतें, कारण अनेक नोंदण्यांतून जुन्या तरवारी, भाले आणि तोडीच्या बंदुका लपवून ठेवल्याचा उल्लेख होता; या जिनसा जरूरीच्या वेळेकरितां तयार ठेवल्या होत्या. प्रथमावस्थेंत याचा परिणाम सरकारविरुद्ध वास्तविक एखादें बंड करण्यांत होईल असें कोणी मानीत नव्हतें तर, वैयक्तिक गुन्हे, तिरस्कृत लोकांचे खून, व्यांकवाल्यांच्या चोर्या, बाजारांची लुटालूट यांचा या परिस्थितीनें एकदम जोराचा स्फोट होईल असें मात्र निश्चित वाटत होतें. अर्धपोटीं राहणार्या अगदीं खालच्या दर्जाच्या लोकांच्या स्थितीवरून असें वाटूं लागलें होतें कीं, प्रथमचे थोडे गुन्हे त्यांजसारख्या दुसर्या शेंकडों गुन्ह्यांनां आणि अराजकतेच्या सार्वत्रिक वाढीला कारण होऊन अधिकारी आणि प्रतिष्ठित वर्ग यांची पांचावर धारण बसवितील. शिवाय अशीहि खात्री वाटत होती कीं, जिकडे तिकडे पानावरील पाण्याच्या थेंबांप्रमाणें लहान लहान संघ मोठ्यांत मिळून जाऊं लागतील, देशांतील सर्व स्फोटक द्रव्यें एकत्र होतील आणि लवकरच हे संघ फारच मोठ्या प्रमाणाचे होऊन सरकारशीं सलोखा न ठेवणारे असे सुशिक्षित वर्गांपैकीं कांहीं थोडे लोक तरी या चळवळींत जिवावर उदार होऊन सामील होतील, कांहीं ठिकाणीं ते पुढाकार घेतील, आणि या स्फोटाला एकीकरणाचें स्वरूप देऊन राष्ट्रीय बंडाचें त्याला वळण देतील.”
या उतार्यांवरून कांग्रेससभा निर्माण करण्याच्या मुळाशीं काय हेतु होता हें स्पष्ट कळून येईल. असो.
त्या वेळीं पुणें हें राजकीय चळवळीचें आगर असल्यामुळें राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाकिरतां तीच जागा अगोदर पसंत करण्यांत आली होती. हें अधिवेशन १८८५ सालच्या नाताळांत व्हावयाचें ठरलें असून त्याकिरतां पुण्यांत जोराची तयारीहि चालली होती. परंतु इतक्यांत तेथें पटकीचा उपद्रव सुरू झाल्यामुळें प्रतिनिधींनां अशा ठिकाणीं जमा करणें इष्ट न वाटून राष्ट्रीय सभा पुण्यास भरविण्याचा बेत तहकूब केला; व ती मुंबई येथें बांबे प्रेसिडेन्सी असोशिशिएनच्या विद्यमानें भरविण्यांत आली. फिरोजशहा मेथा, काशिनाथ त्र्यंबक तेलंग व दिनशा एदलजी वाच्छा हे उद्योगी गृहस्थ त्या वेळीं ह्या असोशिएशनचे सन्माननीय चिटणीस होते. हिंदी जनतेचें मत कांहीं एक विपर्यास न करितां व्यक्त करणें हा या सभेचा मुख्य उद्देश असल्यामुळें तिला हिंदी राष्ट्रीय सभा हें नांव देण्याचें याच वेळीं ठरविण्यांत आलें.
राष्ट्रीय सभेच्या पहिल्या कांहीं वर्षांत तिचे उद्देश व ध्येय यासंबंधीं इतकीं दिशाभूल करणारीं विधानें करण्यांत आलीं आहेत कीं, १८८८ सालीं अलाहाबाद येथें झालेल्या चौथ्या अधिवेशनांत स्वतः ह्यूम साहेबांनींच आपल्या भाषणांत राष्ट्रीय सभेचे जे उद्देश सांगितले ते येथें नमूद करणें अवश्य आहे. उद्देश कथन करण्यापूर्वीं ते आपल्या प्रास्ताविक भाषणांत असें म्हणाले कीं, ‘अर्वाचीन इतिहासांतील दुसर्या कोणत्याहि चळवळीनें हिंदुस्थानांतील लोकांच्या मनावर इतक्या थोड्या अवधींत इतका स्पष्ट पगडा अद्यापपर्यंत कधींहि बसविलेला नाहीं किंवा इतके हितकारक व दूरगामी परिणाम दुसर्या कोणत्याहि चळवळीपासून होतील असें वाटत नाहीं. हिंदुस्थानच्या कल्याणाकरितां कांहींएक गाजावाजा न करतां झटण्यासाठीं, बहुतेक सर्व या देशांतच जन्मास आलेले जे सुशिक्षित लोका कांहीं वर्षांपूर्वीं एकत्रित झाले, त्यांच्या परिश्रमांचें राष्ट्रीय सभेची चळवळ हें-आज तेंच सर्वांत ढळढळीत व सुव्यक्त दिसत असलें तरी-केवळ एक दृश्य फळ आहे.’ राष्ट्रीय सभेचीं मूलभूत तत्त्वें ह्यूम साहेबांनीं स्पष्ट केलीं तीं येणेंप्रमाणेः (१) हिंदुस्थानच्या जनतेंतील परस्परभिन्न लोकांमध्यें राष्ट्रीयत्वाची भावना उत्पन्न करून त्यांचें एकीकरण करणें, (२) अशा रीतीनें निर्माण झालेल्या राष्ट्राची बौद्धिक, नैतिक, सामाजिक व राजकीय अशा सर्व बाजूंनीं आस्ते आस्ते सुधारणा घडवून आणणें, आणि (३) हिंदुस्थानास अन्याय्य व अपायकारक असलेल्या गोष्टींत फेरफार घडवून आणून तो देश व इंग्लंड यांच्या ऐक्याचें दृढीकरण करणें ही आहेत.