प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )

प्रकरण १५ वें. : इतिकर्तव्यता.

उपप्रकरण २ रें.
राष्ट्रधर्म व राजकीय बल.

राष्ट्रीय सभा.- राष्ट्रीय सभेची संस्थापना इ. स. १८८५ ह्या वर्षीं झाली असून तिला अस्तित्वांत आणण्याचें बहुतेक सर्व श्रेय कैलासवासी अ‍ॅलन् ऑक्टेव्हिअन ह्यूम यांजकडेच आहे. ह्यूम साहेबांचे वडील जोसेफ ह्यूम हे ब्रिटिश पार्लमेंटचे एक सभासद असून ते आपल्या रॅडिकल उर्फ आमूलसुधारणावादी (जहाल उदारमतवादी) तत्त्वांकरितां फार प्रसिद्ध होते. अ‍ॅलन् ऑक्टेव्हिअन ह्मूम हे इंडिअन सिव्हिल सर्व्हिसमध्यें शिरून हिंदुस्थानांत आले. येथें त्यांनीं आपलें काम चोख रीतीनें बजावल्यामुळें लवकरच पुढें ते प्रसिद्धीस आले. १८५७ सालीं हिंदुस्थानांत बंड झालें तेव्हां ते या देशांत नुकतेच आले असून इटावा येथें कलेक्टर व मॅजिस्ट्रेट होते. तेथें त्यांनीं बंड उग्र स्वरूपांत येण्यापूर्वींच त्याचा बंदोबस्त करून सरकारची एक मोठीच कामगिरी बजाविली. तिजमुळें त्यांनां सरकारकडून ‘सिव्हिल कंपॅनिअन ऑफ दि बाथ’ ही त्या वेळीं फारच बहुमानाची अशी समजली जाणारी पदवी अर्पण करण्यांत आली. अशा रीतीनें मोठमोठ्या हुद्दयाचीं कामें उत्तम प्रकारें पार पाडून शेवटीं ते हिंदुस्थान सरकारच्या होम सेक्रेटरीच्या जागेपावेतों चढले व याच कामावर असातांना त्यांची नोकरी पुरी होऊन त्यांनीं वृद्धवेतन घेतलें. त्या वेळीं हिंदुस्थानांत लॉर्ड लिटन (१८७६-८०) यांच्या कारकीर्दींतील धोरणामुळें असंतोष उत्पन्न झाला होता. ‘कृष्ण कायदा’ या नांवानें प्रसिद्धीस आलेला व्हर्नाक्युलर प्रेस अ‍ॅक्ट व अफागाणिस्थानचा अमीर शेरअल्ली याशीं निष्कारण वैर केल्यामुळें उपस्थित झालेलें दुसरें अफगाण युद्ध या दोन गोष्टींवर तत्कालीन नेमस्त म्हणून गणल्या जाणार्‍या मुत्सद्दयांकडूनहि देशांतील सर्व भागांतून टीकेचा भडिमार होत होता. असा स्थितींत हिंदी जनतेच्या तक्रारी सरकारपुढें मांडण्याकिरतां परिषदेसारख्या एखाद्या संघटनेची आवश्यकता भासूं लागली व या परिषदेची निर्दोष पायावर उभारणी करून तिला कायम स्वरूप कसें देतां येईल यासंबंधीं निरनिराळ्या प्रांतांतील विचारी पुढार्‍यांत पत्रव्यवहार सुरू झाला. लिटन साहेबांनंतर व्हाइसराय होऊन आलेले लॉर्ड रिपन यांच्या कारकीर्दींत ह्या कल्पनेस चेतना व उत्तेजन मिळालें. इ. स. १८८३ मध्यें ह्यूम साहेब सरकारी नोकरींतून बाहेर पडले तेव्हां ही कल्पना इतकी परिपक्व दशेस आली होती कीं, त्याच वर्षीं जॉन ब्राइट व स्टॅगप्रभृति पार्लमेंटांतील हिंदुस्थानची कळकळ बाळगणार्‍या मित्रांकडून तिला पाठिंबा मिळतांच ह्यूम साहेबांच्या सहानुभूतियुक्त मदतीनें एक संघ निर्माण झाला. ह्यूम साहेब हे हिंदुस्थानांत घडत असलेल्या सर्व गोष्टींचें शांतपणें पण दक्षतापूर्वक निरिक्षण करीत आले होते. हिंदुस्थानची आर्थिक, सामाजिक व राजकीय स्थितींत सुधारणा घडवून आणण्यास त्यांच्या मनाची पूर्ण तयारी झाली असल्यामुळें राष्ट्रीय सभेच्या चळवळीस आपण कांहीं तरी प्रत्यक्ष मदत केली पाहिजे असें त्यांनां वाटूं लागलें. निरनिराळ्या प्रांतांतील पुढार्‍यांशीं त्यांचा यासंबंधात पत्रव्यवहारहि चालू होता. येथें एक गोष्ट नमूद केली पाहिजे कीं, राष्ट्रीय सभेची कल्पना गर्भावस्थेंत होती तेव्हां ह्यूम साहेब हे समिल्यास गेले असतांना त्यांनां लॉर्ड डफरिन यांचा या संबंधांत सल्ला घेण्याची संधि मिळाली होती. त्या वेळीं ह्यूम साहेबांचीं मतें डफरिन साहेबांस पूर्णपणें पसंत पडलीं होतीं व ह्यूम साहेबांस डफरिन साहेबांकडून बरेंच उत्तेजनहि मिळालें होतें ही गोष्ट खरी आहे. {kosh Indian year 1914. Times of India}*{/kosh} पुढें १८८८ नंतर काय कारण झाले असेल तें असो. डफरीन साहेब राष्ट्रीय सभेवर उलटले. परंतु १८८८ सालीं दिसेंबर महिन्यांत जॉर्ज यूल ह्यांनीं अलाहाबाद येथें भरलेल्या राष्ट्रीय सभेंत जें भाषण केलें त्यानें डफरीन साहेबांच्या वर्तनास चांगलेंच उत्तर मिळालें.