प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )

प्रकरण १५ वें. : इतिकर्तव्यता.

उपप्रकरण २ रें.
राष्ट्रधर्म व राजकीय बल.

राष्ट्रीय सभेची बैठक.- मुंबई, कलकत्ता किंवा मद्रास यांसारख्या प्रमुख शहरीं मोठी सभा भरली असतां तिचा तो भव्य देखावा मनास फारच आल्हादकारक असतो. एवढ्या मोठ्या सभेंतहि श्रोतृसमाजाचें वर्तन नेहमीं सभ्यपणाचें असतें. दररोज पांच तासप्रमाणें तीन दिवसपर्यंत या सभेचें काम चालत असतें. मंडप तयार करतांना वक्त्याचा आवाज प्रत्येक कोनाकोपर्‍यांत देखील ऐकूं  जावा अशी बहुधा काळजी घेण्यांत येते. मंडपांत जाण्यायेण्याकरितां शक्य तितके अधिक मार्ग ठेवण्याची व्यवस्था केलेली असते. अलीकडे गोषांतील स्त्रियाहि राष्ट्रीय सभेंतील चर्चेमध्यें विशेष लक्ष्य घालूं लागल्या असल्यामुळें त्यांच्याकरितां एक ग्यालरी मुद्दाम वेगळी राखून ठेवण्यांत येते. राष्ट्रीय सभेच्या कामाकरितां दरसाल कमींत कमी पंचवीसपासून तीस हजार रुपयांपावेतों खर्च लागतो. हा खर्च भागविण्याचीं साधनें म्हटलीं म्हणजे. (१) ज्या प्रांतांत राष्ट्रीय सभेची बैठक व्हावयाची असते तेथील ह्या संस्थेबद्दल सहानुभूति बाळगणार्‍या धनिक लोकांकडून मिळालेल्या देणग्या, (२) प्रतिनिधींपासून गोळा झालेल्या फीच्या पैशांतून लंडनमधील ब्रिटिश काँग्रेसकमिटिस अर्धी रकम देऊन राहिलेला भाग व (३) प्रेक्षकांची तिकिटें काढून गोळा झालेली रकम हीं आहेत. उपर्युक्त मार्गांनीं जमा केलेल्या निधींतून राष्ट्रीय सभेचा सर्व खर्च भागून शिल्लक राहण्याचा प्रंसग क्वचितच येतो. कांही कांहीं वेळां तर जमा झालेल्या रकमेपेक्षां खर्चच अधिक होऊन तूट मात्र आलेली आहे. काँग्रेस झाल्यानंतर स्वागतमंडळ आपल्या सवडीनुसार लवकरच तिच्या तीन दिवसांच्या कामाचा अहवाल प्रसिद्ध करतें. कांहीं वर्षेंपर्यंत काँग्रेसला लागूनच एक औद्योगिक प्रदर्शनहि भरविण्यांत येत होतें. याच प्रदर्शनापासून पुढें औद्योगिक परिषदेची उत्पत्ति झाली. ह्या सर्व प्रदर्शनांमध्यें १९०४ च्या राष्ट्रीय सभेबरोबर भरलेलें प्रदर्शन फारच यशस्वी झालें होतें.

स्वागतमंडळाकडील अतिशय महत्त्वाचें काम म्हणजे राष्ट्रीयसभेच्या अध्यक्षाच्या निवडणुकीसंबंधांत निरनिराळ्या प्रांतांतील कांग्रेसकमिट्यांचीं मतें मागविणें हें आहे. राष्ट्रीय सभेचा जो अध्यक्ष निवडावयाचा त्यासंबंधानें सामान्य नियम असा आहे कीं, तो केवळ राष्ट्रीय सभेमध्यें भाषणें करूनच नव्हे तर आपल्या प्रांतामध्यें त्या सभेचें कार्य व उद्देश यासंबंधीं लोकांमध्यें व्याख्यानें देऊन व शिक्षणप्रसार करून पूर्वीं कित्येक वर्षांपासून तिच्या कामांत उत्साहपूर्वक भाग घेत आला असावा. तथापि हा नियम नेहमींच पाळण्यांत येतो असें नाहीं. १९१६ सालच्या कांग्रेसमध्यें अध्यक्षस्थान सर सत्यप्रसन्न (आतां लॉर्ड) सिंह यांस दिले होतें. तथापि सिंह यांनीं पूर्वीं कांग्रेसमध्यें क्वचितच भाग घेतला होता. जेथें कांग्रेस भरावयाची असते तेथील स्वागतमंडळाकडे प्रत्येक प्रांतिक कांग्रेसकमिटीनें तिला ज्या माणसांतून अध्यक्ष निवडून यावा अशी इच्छा असेल त्यांचीं नांवें सप्टेंबर अखेरपावेतों किंवा दुसर्‍या एखाद्या ठरलेल्या मुदतीपावेतों पाठवावीं अशी सर्व प्रांतांच्या कमिट्यांनां सूचना देण्यांत येते. या सर्व कमिट्यांनीं सुचविलेलीं नांवें स्वागतमंडळाकडे आल्यावर त्यांतून ज्याला अधिकांश मतें मिळालीं असतील तो अध्यक्ष निवडून आला असें समजण्यांत येऊन त्याचें नांव जाहीर करण्यांत येतें. निवडून आलेल्या अध्यक्षास त्याची निवडणूक झाल्याचें स्वागतमंडळाकडून रीतसरपणें कळविण्यांत आलें म्हणजे तो आपलें भाषण तयार करण्याचें काम हातीं घेतो. ह्या भाषणांत त्या वर्षांत घडलेल्या राजकारणांतील मुख्य मुख्य गोष्टींचें समालोचन करून कांग्रेसनें आपल्या बैठकींत कोणकोणत्या महत्त्वाच्या विषयांवर ठराव पसार करावे याचें दिग्दर्शन करण्यांत येतें. कांग्रेसचा अध्यक्ष हा स्वागतमंडळाचा सन्मान्य पाहुणा असतो. उत्तमशा जागेंत त्याच्या राहण्याची व्यवस्था करण्यांत येते व त्याला सर्व प्रकारच्या सुखसोयी मिळवून देण्याकरितां प्रयत्‍न केले जातात. दोनचार स्वयंसेवक सदोदित त्याच्या तैनातींत राहत असतात. अध्यक्षाच्या तैनातींत रहावयास मिळणें हा एक ते मोठा मान समजतात. अध्याक्षाची स्वारी दाखल होतांच त्याचा बहुधा जयघोषपूर्वक सत्कार करण्यांत येतो व त्याची मिरवणूक काढून लोक आपला आनंद व्यक्त करितात. ज्यांनां शहरांतील आबालवृद्ध नरनारींच्या जयजयकारांत अशा रीतीनें रस्त्यांतून बिर्‍हाडीं घेऊन जाण्याचा मान मिळाला असे कित्येक अध्यक्ष होऊन गेले आहेत.

राष्ट्रीय सभा उघडण्याच्य दिवशीं तिचे अध्यक्ष, जनरल सेक्रेटरी, सेक्रेटकी, स्वागतमंडळाचे अध्यक्ष व त्या प्रसंगास हजर असलेले राष्ट्रीय सभेचे माजी अध्यक्ष या सर्वांस घेऊन आपल्या उच्चासनावर येऊन बसतात. ही मंडळी स्थानापन्न होतांच काँग्रेसच्या बैठकीस सुरुवात झाली असें जाहीर करण्याकरितां एक घंटा होते. बैठकीच्या सुरुवातीस स्वागतमंडळाच्या अध्यक्षाचें भाषण होतें. ह्या भाषणांत ते प्रथम तेथें जमलेल्या प्रतिनिधींचें स्वागत करितात व आपल्या शहरामध्यें विशेष ध्यानांत ठेवण्यासारख्या अशा कोणत्या गोष्टी आहेत हें सर्वांच्या निदर्शनास आणून लोकांपुढें असलेल्या प्रांतिर व दुसर्‍या कांहीं प्रश्नांचा उल्लेख करितात. हें काम झाल्यानंतर लागलीच अध्यक्षांच्या निवडणुकीची औपाचारिक सूचना पुढें आणून त्यांनां यथाशास्त्र त्यांच्या जागेवर अधिष्ठित करण्यांत येतें. सूचना पुढें मांडणारे गृहस्थ आपल्या भाषणांत अध्यक्ष कोण आहेत व त्यांनीं आपल्या देशाची कोणती सेवा केली आहे याची बहुधा श्रोतृवृंदास ओळख करून देतात. हें झाल्यावर अध्यक्ष टाळ्यांच्या गजरांत भाषण करावयास उभे राहतात. सामान्यतः अध्यक्षांचें भाषण अगोदर लिहून काढून छापलेलें असतें व तें सभेंत फक्त वाचून दाखविण्यांत येतें. तें वाचावयास बहुधा दीड तास लागतो. तथापि कित्येक अध्यक्ष श्रोत्यांचें जणूं काय सत्त्वच पहातात. बांकीपूरच्या कांग्रेसच्या वेळेस अध्यक्षाचें (रा. ब. मुधोळकरांचें) भाषण चारपांच तास झालें असावें. अध्यक्ष आपल्या भाषणांत राजकारणांतील तत्कालीन परिस्थितीचें पर्यालोचन करितात, राज्यकारभारासंबंधीं प्रश्नांवर त्या वर्षीं निरनिराळ्या संस्थांतून जें मत व्यक्त झालें असेल त्याचा प्रतिध्वनि करितात व पुढें कोणत्या सुधारणा करावयास पाहिजेत यासंबंधात कांहीं शिफारशी व सूचना करून ते आपलें भाषण संपवितात.

 

अध्यक्षांचें भाषण संपल्यावर जमलेल्या प्रतिनिधींतून विषयनियामक कमिटीची निवडणूक करण्यांत येऊन तिच्यांतील सभासदांचीं नांवें अध्यक्षांकडून जाहीर केलीं जातात. अर्ध्या तासांत किंवा फार झालें तर एक तासांत मंडपांतील एखाद्या विविक्त भागांत विषयनियमाक कमिटीची सभा भरते. विषयनियामक कमिटीवर नसलेल्या प्रतिनिधींस व दुसर्‍या सर्व बाहेरच्या लोकांस तेथून निघून जाण्याविषयीं विनंती करण्यांत येते. राष्ट्रीयसभेचे अध्यक्ष आपल्या अधिकाराच्या नात्यानें या कमिटीचे अध्यक्ष होतात व नंतर जे प्रश्न दुसर्‍या दिवशी काँग्रेसमध्यें ठराव आणून पास करून घेण्याइतके महत्त्वाचे असतात त्यांवर चर्चेला सुरुवात होते. या ठिकाणीं काँग्रेसचे प्रतिनिधी अगदीं एकाग्र मनानें आपलें काम करीत असल्याचा देखावा दृष्टीस पडतो. ही एक प्रकारची हाऊस ऑफ कॉमन्सची ‘सिलेक्ट कमिटीच’ असते. येथें वादविवादांत निष्णात असलेले उत्तम उत्तम वक्तेच बहुधा पुढें येऊन छोटीं छोटीं भाषणें करितात. ठरावांच्या मसुद्यांत काटछाट व फेरफार करून त्याला अखेलचें कायम स्वरूप देण्यांत येतें. कित्येकदां ठरावांच्या मुद्दयाकडे दुर्लक्ष करून किंवा एकंदर ठरावांच्या यादीकडे दुर्लक्ष करून ठराव सुबक इंग्रजींत कसे लिहावे याविषयींच पुष्कळसें बाष्कळ पांडित्य चालतें. सभासदांचीं मतें घेण्याकरितां त्यांनां हात वर करावयास सांगण्यांत येतें व अध्यक्ष स्वतः मतें मोजून एखादी सूचना मंजूर झाली कीं नामंजूर झाली तें जाहीर करितात. अशा रीतीनें दररोज बहुधा पांच सहा ठराव निकालांत काढण्यांत येतात. हे सर्व ठराव दुसर्‍या दिवशीं दुपारीं काँग्रेसच्या बैठकीपावेतों छापून तपासून तयार ठेवणें हें चिटणिसांचें काम असतें. काँग्रेसच्या बैठकींतील दोन दिवसपर्यंत विषयनियामक कमिटीचें काम सामान्यतः दररोज तीन तासप्रमाणें चालत असतें; परंतु फारच वादग्रस्त प्रश्न पुढें आल्यास यापेक्षांहि अधिक वेळ लागतो. यावरून एक गोष्ट स्पष्ट होईल कीं, राष्ट्रीयसभेच्या अधिवेशनांतील खरें महत्त्वाचें काम जमलेल्या प्रतिनिधींतली उत्तम उत्तम माणसें घेऊन बनविलेल्या विषयनियामक कमिटीच्या बैठकींतच होत असतें. विषयनियामक कमिटीच्या स्वरूपांत १९२० सालीं स्पटेंबर महिन्यांत कलकत्त्यास जी जादा काँग्रेस भरली होती तींत बदल करण्यांत आला. या कमिटीचें काम गुप्त म्हणून समजण्यांत येत असे तें तसें राहूं न देतां तें खुलें समजण्यांत आलें आणि तिचा वृत्तांतहि प्रसिद्ध करण्यांत आला.

राष्ट्रीय सभेच्या जाहीर बैठकींतील कामकाज सुव्यवस्थितपणें व्हावें म्हणून तें कसें चालवावयाचें यासंबंधीं नियम आहेत व त्या नियमानुसार नेहमीं कामकाज चालतें. जाहीर सभेंत कोणत्याहि प्रतिनिधीस ठरावास उपसूचना आणण्याचा हक्क आहे, परंतु त्यानें सभेपुढें ठराव मांडला जात असतांना अध्यक्षास अगोदर तशी सूचना केली पाहिजे. उपसूचनेस अनुकूल व प्रतिकूल असणार्‍या प्रतिनिधींचीं मतें हात वर करावयास सांगून घेण्यांत येतात. विशेष प्रसंगीं मतें घेण्याकरितां नियम केलेले आहेत, पण त्यांचा उपयोग करण्याचा प्रसंग क्वचितच येतो. १९२० च्या जादा कांग्रेसमध्यें  {kosh असहकारितेचा ठराव - (१) ज्या पक्षीं खिलाफत प्रकारणांत हिंदुस्थान सरकार व ब्रिटिश सरकार हे दोघेहि हिंदीमुसुलमानांसंबंधाच्या आपल्या कर्तव्यापासून सर्वस्वीं च्युत झाले व मुख्य प्रधानानें तर आपलें वचन जाणूनबुजून मोडलें; आणि अशा रीतीनें हिंदी-मुसुलमानांवर जी आपत्ति कोसळली तिच्यांतून पार पडण्याकरितां मुसुलमानांकडून जो प्रयत्‍न करण्यांत येईल त्यास सर्व प्रकारें कायदेशीर रीतीनें मदत करणें हें हिंदी-मुसुलमानेतरांचेंहि कर्तव्य आहे;}*{/kosh}  {kosh (२) आणि ज्या पक्षीं पंजाबांत १९१९ च्या एप्रिलमध्यें उद्भवलेल्या घालमेलींत पंजाबांतील निरपराधी प्रजेचें संरक्षण करण्यांत आणि निरपराधी प्रजाजनांशीं रानटीपणानें व क्षात्रवृत्तीला लांछन लागेल अशा रीतीनें वर्तन करणार्‍या अधिकार्‍यांस शिक्षा करण्यांत सदर सरकाराकडून भयंकर हयगय झाली किंवा त्यांस आपलें कर्तव्य बजावतां आलें नाही; शिवाय रहिवाशांच्या छळणुकीकडे ज्यानें पाषाणहृदयीपणानें दुर्लक्ष केलें व अधिकार्‍यांच्या हातून घडलेल्या बहुतेक सर्व अपराधांची जबाबदारी ज्याच्या माथ्यावर प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष रीतीनें असते त्या सर मायकेल ओडवायरला सदर सरकारांनीं दोषमुक्त केलें;}*{/kosh} {kosh (३) आणि ज्या पक्षीं पार्लमेंटांतील व विशेषतः लॉर्डांच्या सभेंतील वादविवादावरून हिंदी लोकांविषयीं सहानुभूतीचा शोचनीय अभाव दिसून आला, आणि पंजाबांतल्या अधिकार्‍यांनीं जी सोटेशाही व रावणशाही राजरोस चालविलि तिला या वादविवादानें जणु काय दुजोराच दिला;}*{/kosh} {kosh आणि ज्या पक्षीं व्हाइसरॉयांच्या नुकत्याच झालेल्या भाषणांत खिलाफत व पंजाब या दोनहि प्रकरणांतील उभय सरकारांच्या वर्तनाविषयीं पश्चात्तापाचा लवलेशहि दिसून आला नाहीं; त्या पक्षीं, या राष्ट्रीय सभेचें असें मत आहे कीं, वरील दोन प्रकारांतील अन्यायाची दुरुस्ती झाल्याविना हिंदुस्थानांत समाधान नांदणार नाहीं; आणि यासंबंधांत आपल्या राष्ट्राची इज्जत राखण्याला व असल्या राक्षसी वर्तनाची पुनरावृत्ति न होईल अशी खबरदारी घेण्याला स्वराज्याच्या स्थापनेखेरीज दुसरा रामबाण उपाय नाहीं.

आणि या राष्ट्रीय सभेचें आणखी असें मत आहे कीं, वरील दोनहि अन्याय दूर होईपर्यंत व स्वराज्याची स्थापना होईपर्यंत क्रमशः वर्धिष्णु व अत्याचारवर्ज असहकारिता करण्याचें तत्त्व मान्य करणें व तें आचरणांत आणणें याखेरीज हिंदी लोकांनां गत्यंतर नाहीं;

आणि ज्या अर्थीं ज्या वर्गानें आजपर्यंत जनतेचें प्रतिनिधित्व स्वीकारून लोकमताला वळण लावलें त्याच वर्गानें या असहकारितेला सुरुवात केली पाहिजे, आणि ज्या अर्थीं सरकार आपल्या हुकमतीखालच्या शाळा, कोर्टें, कौन्सिलें आणि बहुमान व पदवीदानसमारंभ यांच्या योगानें आपली सत्ता दृढ करितें, आणि ज्या अर्थीं या चळवळीच्या सध्यांच्या बाल्यावस्थेंत आपलें ध्येय साध्य करण्याला विसंगत न होईल इतका पण कमींत कमी धोका व कमींत कमी नुकसान होईल असें करणें प्राप्त आहे; }*{/kosh} {kosh त्या अर्थीं ही राष्ट्रीय सभा सर्वांस कळकळीनें असा सल्ला देते कीं,  (१) सरकारनें दिलेल्या पदव्या, बिनपगारी अधिकारांच्या जागा आणि स्थानिक संस्थांतील सरकारनियुक्त सभासदत्व सोडून द्यावें.  (२) गव्हर्नरची लेव्ही, सरकारी अधिकार्‍यांनीं भरविलेले दरबार, किंवा त्यांच्या मानाकरितां होणारे समारंभ यांच्यांत भाग घेऊं नये. (३) पूर्ण सरकारी, निम सरकारी अगर सरकारच्या मदतीनें चालणार्‍या शाळांतून व कॉलेजांतून पालकांनीं आपलीं मुलें आस्तेआस्ते काढून घ्यावीं आणि अशा शाळा व कॉलेजें यांच्या ऐवजीं प्रांताप्रांतांतून राष्ट्रीय शिक्षणाच्या शाळा व कॉलेज स्थापन करावीं. (४) वकील व पक्षकार यांनीं खासगी भांडणतंटे तोडण्याकरितां सरकारी कोर्टाकडे धांव घेण्याचें क्रमाक्रमानें सोडून देऊन त्या कोर्टांच्या जागीं स्वतःचीं लवाद कोर्टें स्थापन करावीं. (५) लष्करी, कारकुनी व मजुरदार पेशाच्या लोकांनीं मेसोपोटेमियांत नोकरी करण्याकरितां रिक्रूट किंवा उमेदवार होऊं नये. (६) सुधारलेल्या कौन्सिलच्या निवडणुकीकरितां उभे राहिलेल्यांनीं आपलीं नांवें उमेदवारींतून परत घ्यावीं आणि राष्ट्रीय सभेचा हा ठराव न जुमानतां जे उमेदवार उभे राहतील त्यांनां मतदारांनीं मतें देण्याचें नाकारावें. (७) परदेशाहून येणार्‍या मालावर बहिष्कार घालावा.}*{/kosh} {kosh आणि ज्या अर्थीं ज्या गुणांखेरीज राष्ट्र उदयाला येऊं शकत नाहीं अशा गुणांचें, म्हणजे शिस्तीचें व स्वार्थत्यागाचें वळण जनतेला लावण्याचा मार्ग म्हणून ही असहकारितेची चळवळ अंगिकारण्यांत आली आहे आणि ज्या अर्थीं या चळवळीच्या पूर्व रंगांत देखील प्रत्येक पुरुषाला, स्त्रीला व मुलालाहि कांहीं तरी शिस्तीचा व स्वार्थत्यागाचा धडा घेण्याला संधि मिळणें जरूर आहे. त्या अर्थीं ही राष्ट्रीय सभा सर्वांनां स्वदेशी मालाचा, मुख्यतः स्वदेशी कापडाचा, उपयोग करण्याविषयीं सल्ला देत आहे. आणि ज्या अर्थीं हिंदी भांडवलाच्या व हिंदी लोकांच्या देखरेखीखालीं चालणार्‍या गिरण्यांतून देशांतील सर्व लोकांनां पुरवठो होईल इतकें सूत व कापड सध्यां हिंदुस्थानांत तयार होत नाहीं व पुदेंहि बराच काळपर्यंत तयार होईल असें वाटत नाहीं, त्या अर्थीं प्रत्येक कुटुंबांत हातरहाटावर सूत काढण्याच्या कामाला उत्तेजन देण्यांत यावें, आणि ज्या लक्षावधि कोष्टयांनीं आपल्याला प्रोत्साहन मिळत नाहीं म्हणून आपला सन्मान्य धंदा सोडून दिला आहे त्यांनीं हातमागावर कापड विणण्यास सुरुवात करावी असेंहि या राष्ट्रीय सभेचें सांगणें आहे.}*{/kosh} {kosh Annals of Rajasthan. Vol I. p. ६६३ f.}*{/kosh}  असहकारितेचा ठरावावर त्याचें महत्त्व जाणून व त्या विरुद्धहि बरींच भाषणें झाल्यामुळें प्रांतवार मतें घेण्यांत आलीं.

ठरावावर भरपूर चर्चा होऊन तो सर्वसामान्य स्वरूपांतच बाहेर पडत असल्यामुळें प्रतिनिधींमध्यें दुमत सहसा होत नाहीं. ठरावांवर भाषणें कोणीं करावयाचीं व त्यांनां दुजोरा कोणीं द्यावयाचा हें सर्व विषयनियामक कमिटीनेंच अगोदर ठरविलेलें असतें. तथापि अध्यक्षांनां वाटल्यास ते यादींत नसलेल्या माणसासहि परवानगी देऊं शकतात. सभेंत होणारीं भाषणें हीं सामान्यत्वेंकरून मध्यम प्रतीचींच असतात. कांहीं थोडे अपवाद खेरीज करून भाषणामध्यें अलंकाराचा उपयोग सहसा केलेला आढळून येत नाहीं. भाषणामध्यें वक्तृत्वाची रेलचेल असते व बरींचशीं भाषणें पूर्वतयारी न करतांच केलेलीं असतात. अर्थात् आपणांस काय सांगावयाचें आहे याचा विचार वक्ते अगोदर करून ठेवीत नसतील असा याचा अर्थ नाहीं; परंतु मुद्दे टिपून आणून त्यांच्या मदतीनें क्वचितच भाषण करण्यांत येतें. तिसर्‍या दिवशीं संध्याकाळीं राष्ट्रीय सभेचें काम संपल्यावर अध्यक्षांचे आभार मानण्यांत येतात व त्याला अध्यक्षांकडूनहि लहानसें उत्तर मिळतें. एवढें झाले कीं, पुढच्या वर्षीं काँग्रेस कोठें भरावयाची हें जाहीर करण्यांत येऊन ती बरखास्त होते.

अमृतसरमध्यें जानेवारी १९२० मध्यें भरलेल्या ऑल इंडिया काँग्रेस कमिटीच्या बैठकींत काँग्रेसच्या घटनेंत फेरफार सुचविण्याकरितां एक पोट कमिटी नेमली होती. या कमिटीकडून नवीन घटनेची योजना पुढें आली आहे. {kosh राष्ट्रीय सभेच्या घटनेच्या नव्या मसुद्यांतील कांहीं महत्त्वाचीं कलमें.- (१) हिंदी राष्ट्रीय सभेचा उद्देश कोणत्याहि सनदशीर व शांततेच्या मार्गांनीं हिंदुस्थानास स्वराज्य प्राप्त करून देणें हा आहे. (२) राष्ट्रीय सभेस प्रतिनिधि म्हणून निवडून आलेल्या प्रत्येक पुरुषास व स्त्रीस पहिल्या कलमांत नमूद केलेला राष्ट्रीय सभेचा उद्देश व तो साध्य करून घेण्याचे तिचे मार्ग मान्य आहेत असें गृहीत धरण्यांत येईल व त्याला किंवा तिला पुढें राष्ट्रीयसभेच्या घटनेनुरूप व नियमांनुरूप वागणें प्राप्त होईल.}*{/kosh} {kosh (३) (अ) राष्ट्रीय सभेची बैठक साधारणतः वर्षांतून एकदां नाताळच्या सुट्टींत आदल्या बैठकींत ज्या ठिकाणीं ती भरविण्याचें ठरलें असेल त्या ठिकणीं अगर यापुढें उल्लेखिली जाणारी अखिलभारतीय काँग्रेसकमिटी ठरवील त्या ठिकाणीं भरेल. (आ) राष्ट्रीय सभेची जादा बैठक अखिलभारतीय काँग्रेसकमिटीनें आपण होऊन अगर प्रांतिक काँग्रेसकमिट्यांनीं बहुमतानें मागणी केल्यास ती जेथें भरविणें इष्ट वाटेल तेथें भरवावी. अशा बैठकीला घटनेचे सर्व नियम अखिलभारतीय काँग्रेसकमिटीला वाटतील ते फेरबदल करून लागू होतील.}*{/kosh} {kosh (४) राष्ट्रीय सभेचे पोटभाग.- हिंदी राष्ट्रीय सभा ही खालील घटकांची बनलेली असेल- (अ) हिंदी राष्ट्रीय सभा. (आ) प्रांतिक काँग्रेसकमिट्या. (इ) जिल्हा काँग्रेसकमिट्या. (ई) तालुका काँग्रेसकमिट्या. (उ) अखिल भारतीय काँग्रेसकमिटी. (ऊ) ब्रिटिश काँग्रेसकमिटी आणि हिंदुस्थानच्या बाहेर राष्ट्रीय सभेच्या मार्फत वेळोवेळीं बनतील त्या कमिट्या. (ए) प्रांतिक अगर जिल्हा काँग्रेसकमिट्यानीं वेळोवेळीं भरविलेल्या सभा व स्थापिलेल्या कमिट्या, उदाहरणार्थ राष्ट्रीयसभेची स्वागतकमिटी आणि तालुका, जिल्हा व प्रांतिक परिषदा.}*{/kosh} {kosh (५) वर नमूद केलेल्या कोणत्याहि सभेचा अगर कमिटीचा सभासद होऊं इच्छिणारा मनुष्य निदान २१ वर्षांचा असला पाहिजे व या घटनेच्या कलमांत नमूद केलेले राष्ट्रीय सभेचे उद्धेश, मार्ग, व नियम या सर्वांनां त्यानें लेखी मान्यता दिली असली पाहिजे.}*{/kosh}  {kosh प्रांतिक काँग्रेसकमिट्या.
(६) प्रांतिक काँग्रेसकमिट्या बनविण्यासाठीं हिंदुस्थानचे (संस्थानें धरून) खालीं दिल्याप्रमाणें भाषावार विभाग केले आहेत.

१ मद्रास (तामिळ), मुख्य ठिकाण मद्रास.
२ आंध्र (तेलगू),    ”     ”           ”
३ कर्नाटक (कानडी),”          ”    बेळगांव अगर धारवाड.
४ महाराष्ट्र (मराठी), मुख्य ठिकाण मुंबई अगर पुणें.
५ गुजराथ (गुजराथी),”    ”          मुंबई. अगर अहमदाबाद.
६ सिंध (सिंधी), मुख्य ठिकाण हैद्राबाद.
७ पंजाब व वायव्य सरहद्दीवरील प्रांत (पंजाबी), मुख्य ठिकाण लाहोर.
८ दिल्ली, अजमीर मेवाड व ब्रिटिश.
                 राजपुताना (हिंदुस्थानी), मुख्य ठिकाण दिल्ली.
९ संयुक्त प्रांत (हिंदुस्थानी), मुख्य ठिकाण अलाहाबाद.
१० मध्यप्रांत (हिंदुस्थानी), मुख्य ठिकाण नागपूर अगर जबलपूर.
११ वर्‍हाड व मध्यप्रांत (मराठी), मुख्य ठिकाण उमरावती अगर नागपूर.
१२ बहार (हिंदुस्थानी), मुख्य ठिकाण पाटणा.
१३ ओरिसा (ओरिया) बंगाल, आंध्र, आणि मध्यप्रांत या भागांतील ओरिया भाषा बोलणारे लोक धरून. मुख्य ठिकाण कटक.
१४ बंगाल व आसाम (बंगाली), मुख्य ठिकाण कलकत्ता.
१५ ब्रह्मदेश (ब्रह्मी), मुख्य ठिकाण रंगून.

राष्ट्रीय सभेस प्रसंगानुरूप कोणतेंहि हिंदी संस्थान उपरिनिर्दिष्ट प्रांतांपैकीं कोणत्याहि एका प्रांतांत समाविष्ट करण्याचा अधिकार असून प्रांतिक काँग्रेसकमिटीस राष्ट्रीय सभेनें तिच्याकडे सोंपविलेलें संस्थान तिच्या हाताखालच्या जिल्ह्यांपैकीं वाटेल त्या जिल्ह्यांत घालतां येतें.}*{/kosh} {kosh (७) मागील कलमांत सांगितलेल्या प्रत्येक प्रांतास एक एक प्रांतिक काँग्रेसकमिटी राहील व या कमिट्यांनां आपआपल्या प्रांतामध्यें निरनिराळ्या जिल्हा व तालुका कमिट्या बनविण्याचा व त्याचप्रमाणें आपआपल्या प्रांतांतर्फें काँग्रेससंबंधीं काम करण्याचा हक्क राहील. प्रांतिक काँग्रेसकमिटीच्या प्रत्येक सभासदास वर पांचव्या कलमांत सांगितलेल्या सर्व अटी लागू असून त्याला ती कमिटी ठरवील तितकी वार्षिक वर्गणी आगाऊ दिली पाहिजे. प्रांतिक काँग्रेसकमिटीचे अंमलदार मामूली वहिवाटीप्रमाणें तिच्या सभासदांकडून निवडण्यांत येतील.}*{/kosh} {kosh (८) जिल्हा व तालुका कमिट्या ह्या त्या त्या प्रांतांतील काँग्रेस कमिट्यांनीं घालून दिलेल्या नियमांनुरूप बनविण्यांत येतील.}*{/kosh}  {kosh मतदारसंघ व प्रतिनिधी - (१०) (अ) प्रत्येक जिल्हा काँग्रेसकमिटीनें आपल्या व आपल्या हाताखालच्या सर्व तालुकाकमिट्यांच्या सभासदांतून आपल्या जिल्ह्याच्या लोकसंख्येंतील दर लाख माणसांस एक या प्रमाणांत राष्ट्रीय सभेकरितां प्रतिनिधी निवडून द्यावे. अर्धा लाख किंवा लाखाचा याहून मोठा अंश हा एक लाखाबरोबर धरण्यांत येईल.

 

ज्यांचा कोणत्याहि जिल्ह्यामध्यें अंतर्भाव होत नाहीं अशीं सर्व शहरें या कलमांतील बाबींकरितां वेगळे जिल्हे म्हणून समजण्यांत येतील व यांपैकीं प्रत्येक शहराचा एक एकच जिल्हा समजावा किंवा त्याहून अधिक जिल्हे समजावे या गोष्टीचा निकाल करण्याचा अखत्यार अखिलभारतीय काँग्रेसकमिटीस आहे.

 

(आ) २१ व्या कलमाप्रमाणें प्रत्येक प्रांतिक काँग्रेसकमिटीच्या वांट्यास अखिलभारतीय काँग्रेसकमिटीचे जितके सभासद आले असतील तेवढेच सभासद त्या प्रांतिक काँग्रेस कमिटीनें आपल्यातर्फें राष्ट्रीय सभेकरितां निवडून द्यावे.

 

(इ) ब्रिटिश काँग्रेसकमिटीनें व चवथ्या कलमाच्या ‘ऊ’ या भागांत उल्लेखिलेल्या हिंदुस्थानाबाहेरील प्रत्येक कमिटीनें आपल्या तर्फें पांच सभासद निवडून राष्ट्रीय सभेस पाठवावे. }*{/kosh} 
{kosh
अखिलभारतीय काँग्रेसकमिटी. (२१) अखिलभारतीय काँग्रेसकमिटीमध्यें तिचे खास (एक्स ऑफिशिओ) सभासद खेरीज करून आणखी १०० सभासद राहतील. या खास सभासदांमध्यें हिंदुस्थानांत राहत असलेल्या किंवा हजर असलेल्या राष्ट्रीय सभेच्या माजी सर्व अध्यक्षांचा व पुढें २५ व्या कलमांत उल्लेखिलेल्या राष्ट्रीय सभेच्या जनरल सेक्रेटरींचा समावेश होतो. जे राष्ट्रीय सभेचे जनरल सेक्रेटरी असतील तेच अखिलभारतीय काँग्रेसकमिटीचे जनरल सेक्रेटरी होतील.

 

प्रत्येक प्रांतानें आपआपल्या प्रांताच्या प्रांतिक काँग्रेसकमिटीनें या बाबतींत जे नियम केले असतील त्यांनां धरून दरवर्षीं दिसेंबरच्या १५ तारखेपूर्वीं त्या सालीं आपल्या प्रांतांतून काँग्रेसमध्यें निवडून पाठविलेल्या प्रतिनिधींमधूनच अखिल भारतीय काँग्रेसकमिटीकरितां आपल्या तर्फें प्रतिनिधी निवडून द्यावे. अखिलभारतीय काँग्रेसकमिटींत निरनिराळ्या प्रांतांतर्फें शक्य तोंपावेतों पुढें दिल्याप्रमाणें प्रतिनिधींची संख्या राहीलः-

 

(१) हिंदुस्थानी-संयुक्त प्रांत १५; (२) बंगाली-बंगाल १४; (३) पंजाबी-पंजाब १०; (४) तामिळ-मद्रास ९; (५) हिंदुस्थानीं, बिहार ८; (६) तेलगू-आंध्र ७; (७) मराठी-महाराष्ट्र ६; (८) गुजराथी-गुजराथ ६; (९) कानडी-कर्नाटक ५; (१०) सिंधी-सिंध ४; (११) हिंदुस्थानीं- दिल्ली ३; (१२) मराठी वर्‍हाड व मध्यप्रांत ४; (१३) ओरिया-ओरिसा ३; (१४) ब्रह्मी-ब्रह्मदेश ३; (१५) हिंदुस्थानी-मध्यप्रांत ३. एकंदर १००.

 

(२५)-(अ) राष्ट्रीयसभेला तीन जनरल सेक्रेटरी नेमले जातील. यांची निवडणूक दर वर्षीं राष्ट्रीय सभेच्या बैठकींत होईल. राष्ट्रीय सभेची वार्षिक बैठक जेथें व ज्या वेळीं व्हावयाची ठरली असेल त्या ठिकाणीं त्या वेळच्या कांहीं काळ अगोदर अखिलभारतीय काँग्रेसकमिटी आपली बैठक भरवील व या बैठकीपुढें या कमिटीनें वर्षभर केलेल्या कामाचा अहवाल, हातीं आलेल्या फंडांच्या हिशोबासह जनरल सेक्रेटरी सादह करतील. नंतर या हिशोबाच्या व कामाच्या अहवालाच्या प्रती राष्ट्रीयसभेपुढें सादर करण्यांत येतील व सर्व काँग्रेसकमिट्यांकडे पाठविण्यांत येतील.}*{/kosh} {kosh कार्यकारी कमिटी. (२६) अखिलभारतीय काँग्रेसकमिटीनें आपल्या पहिल्याच बैठकींत अध्यक्ष, जनरल सेक्रेटरीज व आणखी सात सभासद इतक्या जणांची एक कार्यकारी कमिटी नेमावी. या कार्यकारी कमिटीस अखिलभारतीय काँग्रेसकमिटी तिच्याकडे वेळोवेळीं जीं निरनिराळीं कामें सोंपवील तीं सर्व करावीं लागतील. (२७) अखिलभारतीय काँग्रेसकमिटी ही आपल्या शिरावरील जबाबदारी पार पाडण्याकरितां तिला जितक्या सभा भरविणें जरूर असेल तितक्या सभा भरवील. अशी सभा भरविण्यासाठीं प्रत्येक वेळीं या कमिटीच्या किमानपक्ष पंधरा सभासदांची ते कोणत्या उद्देशानें सभा भरवूं इच्छितात हें जींत स्पष्ट नमूद केलें आहे अशी (लेखी) विनंति असली पाहिजे. }*{/kosh}  {kosh विषयनियामक कमिटी. (२९) राष्ट्रीय सभेच्या चालू बैठकीसाठीं प्रत्येक प्रांतातर्फें अखिलभारतीय काँग्रेसकमिटींत जे सभासद निवडून दिलेले असतील तेच सभासद त्या बैठकीच्या विषयनियामक कमिटींतहि  राहतील. (३०) काँग्रेसचें जाहीर अधिवेशन होण्यापूर्वीं कमींतकमी दोन दिवस तरी अगोदर विषयनियामक कमिटीची सभा भरली पाहिजे. विषयनियामक कमिटीच्या बैठकीचें अध्यक्षस्थान नवीन निवडून आलेल्या अध्यक्षांस देण्यांत येईल. अगोदरच्या वर्षींचे सेक्रेटरी यांनीं पुढील बैठकीच्या कार्यक्रमाचा मसुदा व निरनिराळ्या प्रांतिक काँग्रेसकमिट्यानीं राष्ट्रीय सभेच्या बैठकींत पुढें मांडण्याकरितां म्हणून सुचविलेले ठराव या विषयनियामक कमिटीच्या बैठकींत सादर करावे. (३१) यानंतर विषयनियामक कमिटी या तिजपुढें आलेल्या कार्यक्रमावर चर्चा करील व राष्ट्रीयसभेच्या जाहिर अधिवेशनांत जे ठाराव पुढें मांडावयाचें त्यांचा मसुदा तयार करील. (३२) राष्ट्रीय सभेचें अधिवेशन चालू असतांना देखील जरूर पडल्यास विषयनियामक कमिटीच्या आणखी बैठकी करण्यांत येतील. (३३) राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाच्या सुरुवातीस जमलेल्या मंडळीच्या स्वागतार्थ स्वागतकमिटीचे अध्यक्ष पंधरा मिनिटांत आटपेल असें एक लहानसें भाषण करतील. या भाषणाची एक छापील प्रत दाराशींच प्रत्येक प्रतिनिधीस व प्रेक्षकास कांहींहि मोबदला न घेतां देण्यांत आली पाहिजे. स्वागतकमिटीच्या अध्यक्षांचें भाषण संपल्याबरोबर त्यांनीं राष्ट्रीय सभेच्या नवीन अध्यक्षांस अध्यक्षस्थान स्वीकारण्याविषयीं विनंती करावी. यानंतर राष्ट्रीय सभेच्या अध्यक्षांनी आपलें स्वतःचें भाषण करावें. हें त्यांचें भाषण ४५ मिनिटांच्या आंत आटपेल असें असलें पाहिजे व त्याच्याहि छापील प्रती पूर्वींच दाराशीं प्रतिनिधींस व प्रेक्षकांस फुकट वांटण्यांत आल्या असल्या पाहिजेत. (३४) राष्ट्रीय व स्वागत सभांच्या अध्यक्षांचीं भाषणें इंग्रजी भाषेंत, नागरी व उर्दु या दोन्हीहि लिपींमध्यें हिंदुस्थानीं भाषेंत व ज्या प्रांतांत राष्ट्रीय सभा भरली असेल त्या प्रांताच्या भाषेंत छापलीं जातील. (३५) राष्ट्रीय सभेचें सर्व काम शक्य तोंपावेतों हिंदुस्थानीं भाषेंतच चालविण्यांत येईल. तथापि अध्यक्षांच्या इच्छेनुरूप ज्या ठिकाणीं राष्ट्रीय सभा भरली असेल त्या ठिकाणच्या देश्य भाषेंत किंवा इंग्रजी भाषेंत काम चालविण्याचीहि सवड ठेवण्यांत येत आहे.}*{/kosh}

परिणाम.-१९०७ सालची काँग्रेस धरून १९१९ सालापावेतों काँग्रेसच्या एकंदर छत्तीस बैठकी झाल्या. काँग्रेसच्या आद्य प्रवर्तकांपैकीं आज सुरेंद्रनाथ बॅनर्जी, मदन मोहन मालवीय, दिनशा एदलजी वाच्छा, रंगनाथ नरसिंह मुधोळकर वगैरे थोडीशीच मंडळी हयात आहेत. थोड्या थोड्या वर्षांनीं काँग्रेसच्या रचनेंत नेहमीं फेरफार घडून येत असतात. गेल्या पंचवीस तीस वर्षांचें सिंहावलोकन केलें तर असें आढळून येईल कीं, एकंदरींत राष्ट्रीय सभेनें लोकांची उन्नती घडवून आणण्याचें बरेंच भरींव काम केलेलें आहे. लॉर्ड लॅन्सडौन हे हिंदुस्थानचे व्हाइसराय असतांना त्यांनीं असे उद्गार काढले होते कीं, राष्ट्रीय सभा ही एक पुढारलेल्या उदारमतवादी लोकांची संस्था आहे व वास्तविक पाहिलें असतां तिच्या कार्यक्रमांत नेहमीं प्रागतिक सुधारणांचाच अंतर्भाव केलेला आहे. इ. स. १८८५ व १९०९ यांच्या दरम्यान कायदे कौन्सिलच्या घटनेसंबंधांत ज्या दोन वेळां सुधारणा झाल्या त्या काँग्रेसच्या जोरदार व सतत चालू ठेविलेल्या चळवळींमुळेंच प्राप्त झाल्या असें म्हटलें असतां त्यांत अतिशयोक्ति होणार नाहीं. पहिलें सुधारणा बिल १८९२ सालीं पास झालें. परंतु थोडक्याच वर्षांत असें आढळून आलें कीं, कौन्सिलांतील लोकांनीं निवडून दिलेल्या प्रतिनिधींची संख्या अपुरी पडते, ‘व्हावा निधि तर घ्या प्रतिनिधि’ ह्या तत्त्वानुसार अंदाजपत्रकावर मोकळेपणानें वादविवाद व्हावयास पाहिजे तसा होत नाहीं आणि १८९२ मध्यें प्रश्न विचारण्याचा जो हक्क देण्यांत आला त्यांत कांहींतरी सुधारणा व वाढ होणें जरूर आहे. याप्रमाणें कौन्सिलांची पुन्हा सुधारणा होणें जरूर भासलें तेव्हा काँग्रेसनें या सुधारणेसाठीं चळवळ सुरू केली. काँग्रेसनें ही चळवळ सारखी चालू ठेविल्यामुळें पुढें मोर्लेमिंटो सुधारणा मिळाल्या. मिठावरील कर अडीच रुपये मण होता तो एक रुपया मण करण्यांत आला याचें श्रेय ह्या संस्थेसच दिलें पाहिजे. कमाल पक्षीं किती उत्पन्नापावेतों प्राप्तीवरील कर माफ असावा याची काँग्रेसनेंच शिफारस केली होती. आगगाड्यांपेक्षां पाटबंधार्‍याचीं कामें हातीं घेणें अधिक महत्त्वाचें आहे या तत्त्वाचा तिनें सदोदित पुरस्कार केला आहे. दुष्काळनिवारणाच्या कामांतील सरकारी अव्यवस्थेवर ती जी टीका करीत आली तीच मुख्येत्वेंकरून दुष्काळनिवारणासंबंधींची व्यवस्था जवळजवळ पूर्णतेला नेऊन पोंचविण्यास कारणीभूत झाली आहे. सर्व प्रकारच्या शिक्षणांत, व त्यांतल्या त्यांत प्राथमिक व व्यवहारोपयोगी शिक्षणांत, जी कांहीं आज प्रगति झालेली दृष्टीस पडते ती बहुतेक सर्व काँग्रेसच्या चळवळीमुळेंच झाली आहे. आरोग्यखात्यांतील सुधारणांस काँग्रेस अंशतः तरी कारणीभूत झालेली आहे असेंहि तिचे अभिमानी म्हणतात. जंगल खात्यांतील व देशी मालावरील करांसंबधीं कडक नियमांमुळें होणारा त्रास काँग्रेसच्या विनवण्यांमुळें कांहींसा कमी झाला आहे. शेतसार्‍याच्या विषयाकडे काँग्रेसनें लक्ष पुरविलें असून शक्य तोंपर्यंत कायमधार्‍याची पद्धतीच अमलांत यावी असें तिचें थोडेबहुत धोरण आहे. ‘सिव्हिल सर्व्हिस एक्झॅमिनेशन’ इंग्लंड व हिंदुस्थान या दोन्हीहि ठिकाणीं घेण्यांत यावी व न्यायखातें अंमलबजावणी खात्यापासून वेगळें करावें यासंबंधांत तिनें आजपर्यंत केलेली सर्व ओरड अरण्यरुदनवत् झाली आहे, तथापि तिनें दाखविलेली चिकाटी स्पृहणीय आहे. दक्षिण आफ्रिकेंत व इतर ठिकाणीं असलेल्या हिंदू लोकांच्या वतीनें कलेल्या तिच्या सर्व विनवण्या कळकळीच्या पण नेमस्तपणाच्या आहेत. चलनी नाण्याच्या प्रश्नावरील सरकारचीं मतें तिला पसंत नाहींत. सरकारी नोकरींतील वरिष्ठ जागांवर हिंदी लोकांच्या बर्‍याच मोठ्या प्रमाणांत नेमणुका होऊं लागतील असें करणें हा तिचा पूर्वींपासून उद्देश असून त्या प्रश्नाचा विचार करण्याकरितां सरकारनें पब्लिक सर्व्हिस कमिशनची नेमणूक केलीहि होती. थोडक्यांत सांगावयाचें म्हणजे काँग्रेसनें आजपर्यंत लोकांच्या पुष्कळ तक्रारी सरकारपुढें मांडल्या व त्यांतील कांहीं सरकारकडून दूर झाल्या आहेत. वरिष्ठ जागांवर हिंदी लोकांच्या अधिक प्रमाणांत नेमणुका करवून घेणें, लष्करी खात्यांतील खर्च कमी करणें, जकाती बसविण्याचा अधिकार, विशेषतः जुन्या पद्धतीनें तयार होणार्‍या कापडावर जकात बसविण्याचा अधिकार प्राप्त करून घेणें, गुन्हेगार लोकांच्या इन्साफाच्या पद्धतींत सुधारणा घडवून आणणें (यांतच अंमलबजावणी खातें न्यायखात्यापासून विभक्त करण्याच्या सुधारणेचा अंतर्भाव होतो), व ब्रिटिश साम्राज्याचे नागरिक या नात्यानें बादशहांच्या ताब्यांत असलेल्या सर्व मुलुखांत इतरांच्या बरोबरीचे हक्त मिळविणें हे राष्ट्रीयसभेचे कांहीं ठळक ठळक उद्देश आहेत.