प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण १४ वें.
राजकीय घडामोडी व भौगोलिक ज्ञानविकास.
टॉलेमी राजांची एतद्विषयक कामगिरी.- इजिप्तमधील टॉलेमींनीं भौगोलिक ज्ञानाच्या मर्यादा विस्तृत करण्याबद्दल पुष्कळ खटपट केली. टॉलेमी युअर्जिटीझ (ख्रि .पू. २४७-२२२) यानें एराटॉस्थिनीझ या पुरूषास आश्रय देऊन भूगोलशास्त्राची अपूर्व कामगिरी बजावली. कारण पृथ्वीचें गोलत्व ज्ञात करून देण्यास ह्याचेच श्रम कारणीभूत झाले. दुसरा युअर्जिटीझ व त्याचा अनुगामी टॉलेमी लॉथिरस (ख्रि. पू. ११८-११५) ह्यांनीं अरबी समुद्राचें संशोधन करण्याकरितां एक आरमार 'युडोंक्सस' नामक पुरुषाच्या हाताखालीं दिलें. हीं दोन पर्यटनें यशस्वी रीतीनें पार पाडल्यावर युडॉक्सस यास आफ्रिकाखंड दक्षिण दिशेस समुद्र वेष्टित असावें अशी जबर शंका आल्या वरून त्यानें इजिप्तच्या राजाची नोकरी सोडून आफ्रिकेच्या शोधाला पैसे पुरवील अशा त-हेचा आश्रयदाता शोधण्याकरितां केडिझ वगैरे बंदराकडे मोर्चा फिरविला. स्ट्रेबोच्या उल्लेखावरून असें दिसतें कीं, वरील संशोधकानें आफ्रिकेच्या किना-याच्या बाजूनें दक्षिणदिशेकडे दोन पर्यटनें केलीं होतीं. इकडे टॉलेमी याचाहि आपल्या बेरिनायसि, मायॉस व हॉर्मस या तांबड्या समुद्रांतील बंदरांतून दर वर्षीं अरबस्तान, आफ्रिका आणि हिंदुस्थान येथील बंदरांकडे नवीन नवीन आरमारें पाठविण्याचा क्रम चालू होता.