प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण १४ वें.
राजकीय घडामोडी व भौगोलिक ज्ञानविकास.

फिनिशियनांचें भूगोलज्ञान.- तथापि अज्ञातकालाचा ज्ञातकालाशीं संबंध जोडून देणारे आणि भौगोलिक शोधांच्या इतिहासांतील अतिप्राचीन कार्यकर्ते असे भूमध्यसमुद्राच्या कांठावरील लोक म्हणजे फिनीशियनच होत. हे प्राचीन व्यापाराचा आणि प्राचीन लिपिज्ञानाचा विस्तार करण्यांत भारतीयांच्या तोडीचे पण भूगोलज्ञानाच्या बाबतींत भारतीयांहून श्रेष्ठ होते. सायडानमधून व त्यानंतर त्याशीं स्पर्धणा-या व त्याहूनहि अधिक प्रसिद्धीस आलेल्या टायर शहरामधून निघून फिनीशियांतील धाडशी व्यापा-यांनीं भूमध्यसमुद्राचा सबंध किनारा शोधून काढला व त्यावर वसाहत केली. त्यानंतर त्यांनीं आपला मोर्चा त्या समुद्रापलीकडेहि फिरविला. तांबड्या समुद्रावरहि त्यांनीं व्यापार सुरू केला, आणि हिंदुस्थान देश व दक्षिणेकडील व पश्चिमेकडील बंदरे यांच्याशीं त्यांचे व्यापारी दळणवळण सुरू झालें. यामुळें साहजिकच शलोमोन बादशहानें आपल्या समुद्रावरील व्यापाराच्या कामीं टायरचीं व्यापारी गलबतें लावलीं.

फिनीशियन लोकांच्या भूगोलज्ञानविषयक प्रयत्नाच्या इतिहासांत कांहीं संशयस्थलें आहेतच. उदाहरणार्थ बायबलमध्यें टार्शिश या नांवानें ज्ञात असलेलें पश्चिमेकडील व्यापारी केंद्र हें बहुधा स्पेनच्या दक्षिणेस केडिझच्या जागी पूर्वीं बसलेलें असावें, असें एक अनुमान आहे, पण कांहीं ग्रंथकारांनां तें उत्तरआफ्रिकेंतील कार्थेज शहर असावें असें वाटतें. सोन्याची निर्गत करणा-या दक्षिणेकडील ओफर बंदराच्या स्थलनिश्चयाविषयी तर त्यापेक्षांहि जास्त मतभेद आढळून येतो. कांहीं संशोधक ह्या बंदराची जागा अरबस्थानांत निश्चित करतात तर कांहीं अफ्रिकेच्या पूर्व किना-यावरील एक दोन स्थळें त्या जागेकरितां सुचवितात. एवढे मात्र निश्चित आहे कीं, आफ्रिकाखंडाचा शोध ज्या पर्यटनांत लागला तें पाहिलें समुद्रपर्यटन मग त्याचा ओफर बंदराच्या शोधाशीं संबंध असो अगर नसो-तांबड्या समुद्रांतून जहाजें हाकारणा-या फिनीशियन लोकांनीच केले होतें. ख्रिस्तपूर्व पांचव्या शतकांतील प्रख्यात प्रवासी हिरोडोटस यानें असें म्हटलें आहे की, ख्रिस्तपूर्व ६०० च्या सुमारास होऊन गेलेल्या इजिप्त देशच्या २६ व्या राजवंशातील नीको नामक राजानें तांबड्या समुद्रावर एक जहाजांचा काफिला तयार केला, व तो फिनीशियन खलाशांच्या ताब्यांत देऊन त्यास दक्षिणेकडे जाऊन हर्क्युलीस याचा स्तंभ व भूमध्यसमुद्र या मार्गानें पुन्हां इजिप्त देशास परत येण्याची आज्ञा केली. ही दंतकथा जरी हिरोडोटससारख्या लेखकानें नमूद केलेली आहे तरी तिला शक्य कोटींतील म्हणून मानल्या जाणा-या गोष्टीपेक्षां जास्त महत्त्व देतां येत नाहीं.

ख्रि .पू. ८०० च्या अगोदर स्थापन झालेल्या कार्थेजच्या सुप्रसिद्ध वसाहतीनेंहि आपल्या मातृदशाच्या व्यापारी धाडसाची कीर्ति पुढें चालवून आफ्रिकेच्या व यूरोपच्या किना-यावरील प्रदेशाशीं जलमार्गानें व्यापार सुरू केला. विशिष्ट भौगोलिक हेतूनें केलेलें प्राचीन कालांतील सुप्रसिद्ध यटन म्हटलें म्हणजे कार्थेज येथील राजसभेच्या सांगण्यावरून हन्नो याच्या नेतृत्वाखालीं झालेले होय. आफ्रिकेच्या पश्चिम किना-यावर वसाहती कराव्या असा या पर्यटनाचा उद्देश होता. फ्लिनीनें दिलेल्या माहितीवरून हें जलपर्यटन काथजच्या भरभराटीच्या काळांत म्हणजे ख्रि. पू. ५७०-४८० च्या सुमारास झालें असावें असें दिसतें. ह्या पर्यंटनाचें क्षेत्र संशयित आहे, परंतु त्यांतील शेवटचें ठिकाण गिनीच्या आखाताच्या उत्तरेकडील पूर्वपश्चिम किना-यावर कोठें तरी असावें. त्याच प्रमाणें हन्नोशी समकालीन असलेल्या हिमिल्को नामक पुरूषासहि कांहीं माणसें देऊन आयबीरिआच्या पश्चिम किना-यानें उत्तर दिशेस पर्यटन करण्याची आज्ञा झाली होती. ह्या पर्यटनासंबंधाचे जे कांहीं संदिग्ध उल्लेख उमगले आहेत त्यांवरून त्यानें बिस्केच्या उपसागरांतून जाऊन इंग्लंडचा किनारा प्रत्यक्ष पाहिला असावा असें दिसतें.