प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण १४ वें.
राजकीय घडामोडी व भौगोलिक ज्ञानविकास.
भूगोलवर्णनाच्या कामीं भारतीयांचे शैथिल.- भारतीयांच्या भूगोलवर्णनाच्या प्रयत्नांविषयीं थोडेंबहुत लिहिणें म्हणजे त्यांच्या केवळ कल्पनांचाच इतिहास देणें होय. कनिंगहॅमनें असें दाखविलें आहे कीं, प्राचीन भारतीयांनां देशाच्या सामान्य आकाराची कल्पना होती. तसेच 'निरक्षदेशात् क्षितिषोडशांशे भवेदवंती गणितेन यस्मात् ।' यासारखे उतारे विशिष्ट स्थानाचे अक्षांश मोजण्यापर्यंत ज्योतिषाचें अंग म्हणून भारतीयांचें भूगोलज्ञान वाढलें होतें असें दाखवितात. तथापि देशवर्णनें, दोन स्थलांमधील अंतरें, जगांतील निरनिराळे देश वगैरेसंबंधीं माहिती करून देणारें वाङ्मय भारतांतील लेखक वर्गानें फारसें निर्माण केलें नाहीं. निरनिराळ्या देशांची नांवें महाभारतांत येतात व रामायणांतहि आलेलीं आहेत, परंतु त्यांवरून तत्कालीन भूगोलाची स्थिति समजण्यास बरीच अडचण पडते, तो इतकी की, रामायणोक्त जनस्थान कोणतें- नाशिक कीं भद्राचलकडील प्रदेश- यासारख्या गोष्टीविषयीं देखील आज संशयच आहे. कांहीं देशांचा उल्लेख बृहत्संहितेनें केला आहे, पण त्यांतहि माहितीची निश्चितता विशेष नाहीं. प्राचीन भारताचा भूगोल जमविण्यास यवन लेखकांचे, व 'दिव्य साम्राज्यां'तील नागरिक प्रवाशांचे ग्रंथ पहावे लागतात. तथापि त्यांनीं लिहिलेले किंवा वर्णिलेले प्रदेश कोठें आहेत हें अजून पूर्णपणें निश्चित होत नाहीं. आपणांस येथें भूवर्णनशास्त्राची वाढ पहावयाची असल्यामुळें सामान्यतः असें म्हणतां येईल कीं, या विषयावर भारतीय प्रयत्न फारच थोडा झाला आहे, आणि म्हणून भूगोल ज्ञानाचा विकास द्यावयास भारतीय वाङ्मयाचा कांहीं एक उपयोग होणार नाहीं. जगांतील निरनिराळ्या राष्ट्रांकडून परस्परावगमन कसें झालें हें शोधण्यास ग्रीकांचे, अरबांचे, चिन्यांचे आणि यूरोपींयांचे परिश्रम आपणांस पाहिले पाहिजेत. नौकायनासारख्या गोष्टी भारतीयांस अपरिचित होत्या असें नाहीं, किंवा भारतीयांनीं मोठमोठ्या सफरी केल्या, क्षत्रियवर्गानें देशहि जिंकले, त्यांच्या वसाहतीबरोबर ब्राह्मणहि गेले व त्यांनीं आपलें धर्मशास्त्र, ज्योतिष यांच्या ज्ञानाचा फायदाहि घेतला, पण प्रवासवर्णनें लिहून ठेवण्याची मात्र कोणीं फारशी फिकीर केली नाहीं असो.
भारतीयांच्या जगदव्यापक प्रयत्नांत जरी भौगोलिक ज्ञान यांच्याकडून प्रत्यक्ष वृद्धिंगत झालें नाहीं, तरी त्यांच्या प्रदेशांत बाहेरचे लोक येत गेल्यामुळें या बाह्यांकडून भारतवर्णनाचें आणि भारतपरिकरवर्णनाचें कार्य झालें. उदाहरणार्थ जे अनेक चिनी प्रवासी आपल्या देशांत आले. त्यांचे ग्रंथ प्राचीन भूगोलज्ञानास अत्यंत महत्त्वाचे आहेत.
ज्यांनीं लिहून ठेविलेली भारतविषयक प्रवासाची माहिती थोडीबहुत आज उपलब्ध आहे अशा प्रवाश्यांमध्यें चिनी प्रवासी हे सर्वांत प्राचीन असल्यामुळें त्यांच्याविषयीं थोडी हकीगत येथें सांगितली पाहिजे.