प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण १४ वें.
राजकीय घडामोडी व भौगोलिक ज्ञानविकास.
इब्न बतूता.- यूरोपांतील अज्ञानमय स्तिमित युगांत अरबी संस्कृतीची भरभराट होत चालली असतां शेवटच्या अरब भूगोलशास्त्रज्ञाच्या हयातींतच यूरोपांत विद्याविषयक व कलाविषयक पुनरुज्जीवनास प्रारंभ झाला. इब्नबतूता हा तो शेवटचा भूगोलशास्त्रज्ञ होय. या सुप्रसिद्ध अरब प्रवाश्यानें प्रथम खुष्कीनें तांजीरपासून कैरोपर्यंत व पुढें सिरिया देशांत प्रवास केला, आणि नंतर मक्केची व मदिनेची यात्रा केली.
ही यात्रा संपविल्यावर तो इराण देशांत भटकला, व त्यानंतर कांहीं वर्षें तो पुन्हां मक्केस जाऊन राहिला. तेथून परत येतांना त्यानें तांबड्या समुद्रांतून येमेनपर्यंत व नंतर पुढें त्या प्रदेशांतून एडनपर्यंत प्रवास केला. मग त्यानें आफ्रिकाखंडाच्या किना-याकिना-यानें सफर केली. या सफरींत तो मोंबासा व किलोआ या बंदरांत उतरला होता. नंतर तो समुद्र ओलांडून ऑर्मझवरून इराणी आखातांतून गेला.
तो बारेनपासून निघून अरबस्थान ओलांडून जिद्दापर्यंत गेला, व तांबडा समुद्र व वाळवंट ओलांडून सायीनि येथें आला. त्यानें नाइल नदीच्या प्रवाहाप्रवाहानें कैरो शहरापर्यंत प्रवास केला. ह्यानंतर पुन्हां तो सिरिया, व आशियामायनर या देशांत सफरी करून काळा समुद्र, अस्त्राखानपासून बुखारापर्यंत असलेलें वाळवंट आणि हिंदकुश पर्वत ही ओलांडून हिंदुस्थानांत आला. त्यानें दिल्लीचा सुलतान महंमद तघलक याच्या पदरीं सुमारें आठ वर्षें नोकरी केली होती. येथें त्याची चीन देशास रवाना केलेल्या शिष्टमंडळांत नेमणूक होऊन तो हिंदुस्थानच्या पश्चिम किना-यानें दक्षिणेस गेला व कालिकतवरून निघून मालदिव व सिलोन या मार्गानें मलायाद्वीपसमूहामधून चीनला जाऊन परत मलबारला आला. तेथून तो बगदाद, दमास्कस ह्या शहरावरून १३४९ च्या नोव्हेंबर महिन्यात स्वदेशीं फेझ शहरीं पोहोंचला. नंतर स्पेनमध्यें जाऊन पुन्हां एकदां तो १३५२ सालीं मध्यआफ्रिकेंत जाण्यास निघाला व तिंबक्तू व नायगर ही शहरें पाहून फेझ येथें १३५३ मध्यें परत आला. त्यानें स्वतः केलेलें प्रवासवर्णन सध्यां उपलब्ध आहे.
या नंतरचे भौगोलिक शोधाचे प्रयत्न स्पेन व पोर्तुगाल देशांतील लोकांनीं केले व त्यांचें अंतिम फल अमेरिकाखंड व हिंदुस्थान मार्ग सांपडणें हें होय.
प्राचीन काळापासून स्तिमित युगाच्या अखेरीपर्यंतच्या राजकीय घडामोडीस व संस्कृतिप्रसारास जे भौगोलिक शोध कारणीभूत झाले त्यांचा इतिहास वर दिल्याप्रमाणें आहे. आतां आपण १२ व्या प्रकरणांत कुशान घराण्याच्या अखेरीपर्यंत आणून सोडलेलें कथासूत्र पुन्हां हातीं घेऊं.