प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण १४ वें.
राजकीय घडामोडी व भौगोलिक ज्ञानविकास.

आशिया खंडांतील प्रवास.- पोप इनोसंट यानें तार्तर देशांतील लोक व त्यांचा राजा यांनां आपल्या संप्रदायाचा उपदेश करण्याकरितां 'जोआन्नेस डी प्लॅनोकार्पिनि' नामक फ्रान्सिस्कन भिक्षूच्या नेतृत्वाखालीं एक संप्रदायप्रसारक मंडळ पाठविलें होतें. हा भिक्षु १२४६ च्या फेब्रुवारींत व्होल्गा नदीकाठीं बाटु मुक्कामीं पोहोंचला त्या ठिकाणीं कांहीं वेळ राहून तो मध्य आशियांत काराकोरम जवळ थोरल्या खानाची छावणी होती तेथें त्यास भेटण्यास गेला, व १२४७ च्या पावसाळ्यांत स्वदेशीं सुखरूप परत आला. ह्यानंतर कांहीं वर्षांनीं रूब्रुकिस नामक गृहस्थास अशास प्रकारें संप्रदायप्रचारक म्हणून पाठविण्यांत आलें. कास्पियन समुद्राची पूर्ण माहिती देणारा पहिला प्रवासी हाच होय. ह्याच सुमारास अर्मेनियाचा राजा हेटन यानें, १२५४ सालीं कर्पिनि व रूब्रुकिस हे ज्या मार्गानें गेले होते त्याच्या उत्तरेच्या बाजूस पुष्कळ दूर असलेल्या दुस-या मार्गानें काराकोरमला सफर केली. त्या ठिकाणीं त्याचा बराच आदर होऊन तो समर्कंद ताब्रीझच्या वाटेनें स्वदेशीं परत आला. हेटन राजाच्या कुतूहलोत्पादक प्रवासवर्णनाचें क्लॅप्रॉथ यानें भाषांतर केलें आहे.

अशा रीतीनें इटालींतील लोकसत्ताक राज्याचे व विशेषतः वेनिसच्या नगरराज्याचे रहिवाशी हिंदुस्थानांत व इतर पौरस्त्य देशांत तयार झालेला मौल्यवान माल पाश्चात्त्य जगांत खपवीत असतां, त्या व्यापरापासून होणा-या फायद्याच्या इच्छेंनें व त्याचप्रमाणें अज्ञात भूमि पाहण्याच्या जिज्ञासेनें पाश्चात्त्य देशांतील कांहीं व्यापा-यांनीं या दूरदूरच्या देशांत जाण्यास उत्सुक व्हावें हें साहजिकच आहे. पूर्वेकडे व्यापार करणारे व तार्तरी देश स्वतः पाहून आलेले पोलो बंधु ह्यांपैकींच होत. त्यांच्या प्रवासाच्या कवनांनीं तरूण मार्कोपोलो याची कल्पनाशक्ति जागृत झाली, व आपला बाप व चुलता ह्यांसह तो १२६५ सालीं कुब्लाईखानाकडे जाण्यास निघाला. मार्कोपोलोनें १७ वर्षें खानाची नोकरी बजावली. ह्या अवधींत त्यानें स्वतःच्या निरक्षिणानें पुष्कळ माहिती गोळा करून स्वतःन पाहिलेल्या देशांची हकीकत दुस-याकडून गोळा केली. अशा रीतीनें पौरस्त्य जगासंबंधीं माहितीचा अपूर्व सांठा करून घेऊन तो यूरोपखंडास परतला, आणि जिनोवाच्या लोकांनीं त्यास बंदिवान केलें असतां त्यानें बंदिवासांत आपल्या प्रवासाची माहिती लिहून काढली. हा मार्कोपोलोचा ग्रंथ मध्ययुगांतील भौगोलिक माहितीचा अमूल्य खजिना होय.

ख्रिस्तसंप्रदायप्रचारक लोकांनीं आपलें भौगोलिक संशोधन पुढें चालू ठेवलेंच होतें. हिंदुस्थानांत सफर करून आलेली जॉन आफ माँटे कार्व्हिनो, अँड्रयू ऑफ पेरूजिआ, जॉन मॅरिग्निऑली, व फ्रायर जॉर्डेनस इत्यादि मंडळी ह्यांपैकींच होती. यांशिवाय फ्रायर ओडोरिक यानेंहि हिंदुस्थानचा कांहीं भाग मलायाद्वीपसमूह, चीन, तिबेट इत्यादि प्रदेशांत १३१८ च्या सुमारास प्रवास केला होता.