प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण १४ वें.
राजकीय घडामोडी व भौगोलिक ज्ञानविकास.
उत्तरेच्या मार्गानें हिंदुस्थानांत आलेले चिनी यात्रेकरू.- चीन देशांत प्रसार पावलेल्या बौद्ध संप्रदायाच्या संस्थापकाचें जन्मस्थान हिंदुस्थानांत असल्यामुळें ख्रिस्ती शकाच्या आरंभाच्या सुमारास व त्यानंतर अनेक चिनी प्रवासी यात्रेच्या उद्देशानें हिंदुस्थानांत येऊन गेले. त्यांपैकीं उत्तरेच्या मार्गानें हिंदुस्थानांत आलेल्या कांहीं प्रवाश्यांची माहिती इत्सिंग यानें दिलेल्या हकीगतीवरून इंडियन अँटिक्वरीच्या दहाव्या पुस्तकांत दिली आहे. तिचा गोषवारा येणेप्रमाणें:-
१ इ त्सिं ग.- ज्याच्या ग्रंथावरून प्रवाश्यांविषयीं माहिती मिळते तो इत्सिंग इ. स. ६७१ च्या शेवटीं चीन सोडून निघाला. आणि कँटनहून जहाजानें जावा, मलाक्का वगैरे दक्षिणे कडील बेटांच्या आसपास दोन वर्षें राहुन ६७३ मध्यें ताम्रलिप्ती येथे आला. तेथें पांच महिने राहून नालन्द, बुद्धगया वगैरे क्षेत्रस्थानांकडे गेला. नंतर तो फोशायला परत आला. तेथें आपल्या मित्रास त्यानें आपली सर्व हकीगत लिहून दिली व ६९३ मध्यें चीन देशास परतला.
२ ता उ हि.- हा लिहशिंग प्रांतांतील कायदेपंडित होता त्याचें संस्कृत नांव श्रीदेव होतें. तो उच्च कुळांतील होता. हिंदुस्थानांतील निरनिराळीं क्षेत्रें हिंडत तो महाबोधि येथें आला. तेथें बरींच वर्षें राहून नंतर तो नालंदला व तसाच पुढें कुशी (नगरा) ला गेला. अमरावताच्या मुंग राजानें त्याचा बराच सन्मान केला. नालंदास रहात असतांना त्यानें महायानाचा कसून अभ्यास केला. त्यानें चुपोपुन्ना (दहनक्षेत्र किंवा निर्वाणमंदिर) येथें विनय पिटकाचा आणि शब्दविद्येचा अभ्यास केला होता. तहशिओ (महाबोधि) देवळामध्यें असतांना चिनी भाषेमध्यें त्यानें एक स्मृतिलेख कोरला. चिनी सूत्रें आणि शास्त्रें यांचें त्यानें नालंद येथें नवे जुने मिळून ४०० ग्रंथ ठेविले होते. इत्सिंगनें त्याचें वसतिस्थान पाहिजें, पण तो त्याला भेटला नाहीं. तो पन्नास वर्षांचा होऊन अमरावत देशांत वारला.
३ स्से.- पिन त्साइचाऊचा कायदेपंडित स्सेपिन हुआनचिन बरोबर उत्तर हिंदुस्थानांतून व पश्चिम हिंदुस्थानांतून प्रवास करून शेवटीं अमरकुव्याला आला. तेथें तो राजमंदिरामध्यें राजाच्या अगदीं मर्जींतला होऊन राहिला. येथें त्याला त्याच्या गांवचाच ताउहि भेटला. सबंध उन्हाळाभर येथें राहिल्यावर तो आजारी पडून ३५ वर्षांच्या वयांत वारला.
४ आ र्य व र्मा.- एक कोरियन आर्यवर्मा चंगान सोडून नालंद येथें ६३८ मध्यें आला. तेथें त्यानें ब-याच सूत्रांची नकल करून घेतली. तो विनय व अभिधर्म या दोनहि पिटकांत चांगलाच प्रवीण होता. तो पूर्वेकडे कुक्कुट पाद पर्वतास जाऊन आला होता, आणि पश्चिमेकडील मकर-हदांतहि त्यानें स्नान केलें होतें. तो नालंद येथें ७० वर्षांचा होऊन वारला.
५ हु इ नि ए.- इ. स. ६३८ मध्यें एक कोरियन कायदे पंडित हुइनिए हा पश्चिमेकडील बोधि देवळांत येऊन राहिला होता. पुढें तो पवित्र वस्तूंचीं दर्शनें घेऊन नांलंदला गेला आणि तेथें धार्मिक ग्रंथांचा अभ्यास करीत राहिला. इत्सिंग हा कांहीं पुस्तकें चाळीत असतांना एक पुस्तक हुइनिएनें लिहिल्याबद्दल त्याला उल्लेख आढळला. तेथें चौकशी करतां तो ६० वर्षांचा होऊन त्याच वर्षीं वारल्याचें त्याला समजलें. त्यानें लिहिलेलीं संस्कृत पुस्तकें नालंदास जपून ठेविली होतीं.
६ यु आ न ता इ.- हाहि कोरियन कायदेपंडितच होता. याचे संस्कृत नांव सर्वज्ञानदेव होतें. यंगहिबाइ वर्षीं म्हणजे इ. स. ६५० मध्यें तो तिबेटांतील रस्त्यानें नेपाळमधून हिंदुस्थानांत आला. तेथें त्यानें बोधिवृक्षाजवळच्या वस्तूंचें दर्शन घेतलें. नंतर तरखार देशास गेल्यावर त्याला ताउहि भेटला, आणि त्याबरोबर तो तहसिओ (महाबोधि) देवळास परत आला. पुढें त्यानें चीनदेशाकडे प्रयाण केलें व त्यानंतर त्याच्या संबंधांत पुन्हां ऐकुं आलें नाहीं.
७ यु आ न हा उ.- हा कोरिअन कायदेपंडित युआन चिन बरोबर चेंगक्वान कालाच्या मध्यावर हिंदुस्थानांत आला आणि तहसिओ देवळास जाऊन तेथेंच तो वारला.
८ बो धि ध र्म.- हा तुरखार देशचा असून अंगानें चांगला सशक्त होता. तो चिनास येऊन उपदेक बनला. तो सांप्रदायिक भिक्षूप्रमाणें नऊहि ग्रांतांतून भिक्षा मागत फिरला. नंतर पवित्र वस्तूंचें दर्शन घेण्यास तो हिंदुस्थानांत आला. येथें त्याला नालंद येथें इत्सिंग भेटला. हा उत्तर हिंदुस्थानांत वयाच्या ५० व्या वर्षीं वारला.
९ तौ लि ह.- पिंगचांगचा कायदेपंडित तौलिह हा वाळूचें मैदान व तसिह खडक या मार्गानें नेपाळास जाऊन तहसिओ देवळांस आला, आणि तेथें बरीच वर्षें राहिला. यानंतर तो नेपाळास पुन्हा परत गेला. (इत्सिंग ही हकीकत लिहीत असतांना तो तेथेच होता.)
१० तौ सिं ग.- हा पिंगचाऊचा एक कायदेपंडित होता. याचें संस्कृत नांव चंद्रदेव असें होतें. तो इ. स. ६४९ मध्यें म्हणजे चेंक्वॉन कालाच्या शेवटच्या वर्षीं तुफान रस्त्यानें हिंदुस्थानांत आला, व बोधि देवळाजवळ येऊन याने चैत्यांची पूजा केली. तो तरून असल्यामुळें तो नालंदला गेला तेव्हां राजानें त्याला बराच सन्मान केला. यानंतर १२ योजनें पूर्वेकडे गेल्यावर तो राजमंदिरास आला. तेथें फक्त हीनयानाचाच अभ्यास होत असे. तेथें तो हीनयानाप्रमाणेंच तिपिटकाचाहि अभ्यास करीत बरींच वर्षें राहिला. पुढें नेपाळमधून चिनास परत जाऊन तेथें तो वारला.
११ शं ग ति ह.- पिंगचाऊचा शंगतिह हा एक मननशील उपदेशक होता. पश्चिम स्वर्गीय आनंदाचा अनुभव घेण्यास सांपडावा अशी त्याला उत्कट इच्छा होती. तेथें जन्म यावा म्हणून बुद्धाच्या नांवाचा जप करीत तो आपलें आयुष्य धार्मिक रीतीनें घालवूं लागला त्यानें संबंध प्रज्ञासूत्र म्हणजे १०,००० प्रकरणें लिहून काढावयाचा निश्चय केला होता. पवित्र वस्तूंचे दर्शन घेण्याच्या इच्छेनें व त्या स्वर्गांत जन्म व्हावा म्हणून जास्त पुण्याच्या संग्रहाकरितां तो नऊहि प्रांतांमधून लोकांनां आपल्या संप्रदायाची दीक्षा देत आणि धर्म पुस्तकें लिहीत फिरला. नंतर किना-यावर येऊन तो कलिंगास जाण्याकरितां जहाजांतून निघाला. तेथून पुढें जलमार्गानें मलाया देशास जाण्यास निघाला. या देशांतून तो पुन्हां हिंदुस्थानास जाण्याच्या इच्छेनें एका व्यापारी जहाजांत बसून येत असतां जहाज वादळांत सापडून तो बुडून मरण पावला. या प्रसंगाची अशी एक गोष्ट सांगतात कीं, खलाशी व व्यापारी जवळ एक नांव होती ती गांठण्यासाठी धडपडूं लागले. जहाजाचा नाखवा हा भाविक बौद्ध असल्यामुळें तो ह्या उपदेशकास वांचविण्याकरितां त्याला मोठ्यानें हांका मारूं लागला. पण शंगतिह म्हणाला 'मी येणार नाहीं, बाकीच्या लोकांनां वांचीव.' शंगतिह याचें बुद्धाच्या ठिकाणीं मन गुंतल्यामुळें, आयुष्याच्या राहिलेल्या थोड्या मुदतींतच आनंद मानून पश्चिमेकडे तोंड करून सुखाने 'अमित, अमित' असा पवित्र नामात्रा उच्चार करीत जहाजाबरोबर त्यानें जलसमाधि घेतली. त्याचा एक अनुयायीहि अमित बुद्धाचें नांव उच्चारीत त्याच्या बरोबर मरण पावला.
१२ वों ग पो.- चीनच्या राजधानींत मतिसिंह म्हणून एक इसम होता त्याचें प्रचारांतील नांव वांगपो होतें. हा स्सेपिनबरोबर मध्यप्रदेशास येऊन सिंगच्या देवळांत राहिला. संस्कृतमध्यें फारशी गति होईना म्हणून नेपाळास जात असतांना तो रस्त्यावरच वयाच्या सुमारें ४० व्या वर्षीं वारला.
१३ यु आ ब लु इ.- हा कायदेपंडित असून एका सेनापतीचा मुलगा होता, असें ऐकिवांत आहे. तो उत्तर हिंदुस्थानात सोडून काश्मीर येथें राहिला होता. राजाचे सर्व हत्ती त्याच्या ताब्यांत होते. या देशाच्या राजास निरनिराळ्या मंदिरांत जाण्याचा फार नाद होता. मकर-हद मंदिर व कुंगयंग मंदिर ही यापैकींच दोन मंदिरें आहेत. येथें ५०० अर्हतांनां दान धर्म होत असे. मध्यन्तिकाचा शिष्य आनंद यानें राजास दीक्षा दिली ती याच ठिकाणीं. एकदा काश्मीरच्या राजानें १००० लोकांनां फांशीची शिक्षा फरमाविली असतांना यानें राजाला उपदेश करून सर्व लोक वांचविले. येथें कांहीं दिवस राहून तो दक्षिणेकडे बोधि देवळांत गेला. तेथें बोधिवृक्षाची पूजा करून मुचीन (मच्छलिंग) सरोवर पाहून गृध्रशिंखरावर वगैरे गेला आणि नंतर नेपाळास जाऊन तेथेंच वारला.
१४ चि त्त व र्मा.- हा आणखी उत्तरेकडून तुरखार देशास जाऊन नवविहारांत राहिला. या ठिकाणीं हीनयान पंथच उपदेशिला जात होता. येथें तो उपदेशक बनून चित्तवर्मा हें नांव धारण करिता झाला. उपदेश घेतल्यावर तीन पवित्र वस्तू खाण्याचें त्यानें नाकारिलें. त्यावर तेथील मठाधिका-यानें प्रश्न करतांच तो म्हणाला 'बुद्धानें जरी पांची वस्तू खाण्याची परवानगी दिली असली तरी महायानाच्या सर्व पुस्तकांप्रमाणें त्या खाण्याची मनाई आहे, आणि माझीं बनलेलीं मतें सोडण्यास मी तयार नाहीं.' त्या बरोबर मठाधिकारी म्हणाला, 'मुख्य तीन पवित्र ग्रंथाप्रमाणें मीं माझीं तत्वें ठरविलीं आहेत, व माझ्या मताविरुद्ध मी कोणाचें चालूं देणार नाहीं. जर तूं आपलाच हेका चालविणार असशील तर मी आज पासून तुझा गुरू नव्हेच. या थरास गोष्ट आल्यावर त्यास पडतें घेणें भाग पडलें. नंतर थोडेसें संस्कृत शिकून उत्तरेच्या रस्त्यानें तो परत गेला. त्याची या पुढील कांहीं माहिती उपलब्ध नाहीं.
१५ ति बे ट च्या यु व रा जा चे धा त्री पु त्र.- नेपाळांत रहाणारे दुसरे दोघे तुफानच्या (तिबेटच्या) युवराजाच्या दाईचे मुलगे होते. या दोघांनींहि दीक्षा घेतली होती परंतु एक पुन्हां पूर्वाश्रमी गेला. ते स्वर्गीय राजांच्या देवळांत रहात होते. त्यांनां संस्कृत पुस्तकें चांगलीं समजत असत, आणि संस्कृत बोलतांहि चांगलें येत असे.
१६ लं ग.- हाहि एक कायदेपंडित होता, पण तो कोठून आला तें ठाऊक नाहीं. चेंगक्वान म्हणजे इ. स. ६२३-६५० या कालामध्यें तो उत्तरेकडील रस्त्यानें क्षेत्रांचें दर्शन घेण्याच्या हेतूनें उत्तरहिंदुस्थानास गेला. मध्य प्रदेशांत त्याला एक फाहवा (सुप्तकमल) चें पुस्तक संस्कृतमध्यें लिहिलेलें मिळालें. नंतर तो गंधारास गेला व तेथेंच त्याचें देहावसान झालें.
१७ मिं ग यु ए न.- थिहचाऊचा हा कायदेपंडित होता. याचें संस्कृत नांव चिंन्तादेव. कोचीन चीनच्या एका जहाजांत चढून तो कलिंग देशास आला. व तेथून सिंहलद्वीपास गेला. तेथील राजा एकदां पूजेंत गुंतला असतां यानें बुद्धाचा दांत उचलून तो आपल्या देशांत चोरून आणण्यासाठीं आपल्या हातांत लपवून ठेविला. परंतु तें उघडकीस येऊन त्याला हद्दपार करण्यांत आलें. पुढें तो दक्षिणहिंदुस्थानांत आला. तेथून तो महाबोधीकडे जात होता असें म्हणतात, परंतु रस्त्यांत तो एके ठिकाणीं थांबला असतां तेथें त्याच्या कोठ्याची पचनशक्ति बिघडून त्याचा अंत झाला. त्याचें त्यावेळींचे वय काय होते ते ठाऊक नाहीं.
मिंग युएननें जो दांत चोरण्याचा प्रयत्न केला तो हि आतां फारच काळजीपूर्वक एका गोपूरांत पहा-यांत ठेविलेला असतो. त्याच्या कुलुपावर पांच अंमलदारांचीं मोहर असते. तो जेव्हां बाहेर काढतात तेव्हां वाद्यें वगैरे वाजवून चोहोंकडे बराच गोंगाट होतो, रोज फुलें, धूप वगैरेंनीं त्याची पूजा करतात. बाहेर काढल्यावर तो एक सुवर्णपुष्पावर ठेवतात व त्यामुळें त्याची प्रभा चोहोंकडे फांकते. हा स्मृतिशेष नाहींसा झाल्यास एक राक्षस येऊन सर्वांनां भक्षण करील असें म्हणतात. कोणी असेंहि म्हणतात कीं, कांहीं दैविक चमत्कारानें तो चिनांत जाणार आहे.
१८ इ लीं ग.- इयेचाऊचा एक उपदेशक इलींग हा विनय पिटकामध्यें व योगतत्त्वामध्यें चांगला प्रवीण होता. चिंगन नांवाच्या आपल्याच प्रांतांतील एका उपदेशकाबरोबर तो चंगनहून निघाला. त्याच्याबरोबर हहुआन नांवाचा एक प्रख्यात पुरूष होता. दक्षिण प्रान्तांतून प्रवास करीत ते निउलुईला आले. तेथून एका व्यापारी जहाजानें लंकियाला आल्यावर चिंगन मेला. इलींग हा आपल्या दुस-या मित्राबरोबर सिंहलद्वीपास गेला, व तेथे दाताची पूजा वगैरे करून व बरेच ग्रंथ वगैरे घेऊन पश्चिम हिंदुस्थानांतून परत आला. इत्सिगनें आपली हकीकत लिहिण्याच्या वेळेस तो कोठें होता हें त्यास ठाऊक नव्हतें.
१९ हु इ ये न.- हिंगकंगचा एक शिष्य हुइयेन हा कायद्यांत निष्णात असून तो आपल्या गुरूबरोबर सिंगला (सिंहला) स गेला असतां तेथेंच त्याचा अंत झाला.
२० सिं ग चि न.- हाहि एक कायदेपंडित होता. त्याचें संस्कृत नाव चरित्रवर्मा होतें. उत्तरेच्या रस्त्यानें तो पश्चिम देशांत येऊन सिंगच्या मंदिरांत राहिला. सिंगचिनचें देहावसान याच ठिकाणीं झालें मरणसमयीं त्याचें वय ३५ वर्षांचें होतें.