प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )
प्रकरण ८ वें.
पश्चिमेकडे भ्रमण.
यूरोपभर संचार.- सर्व यूरोपभर जिप्सींचे अस्तित्व इसवी सन पंधराशेंच्या सुमारास दिसून येते आणि याच सुमारास ते इंग्लंडमध्यें पोंचले असावेत. चवदाशें चवदाच्या सुमाराला त्यांचें अस्तित्व हेसे या जर्मन संस्थानांत दिसून येतें. आलबर्ट क्रान्झ यानें साक्सोनिया नांवाचा एक ग्रंथ कोलोन येथें पंधारशें वीस सालीं प्रसिद्ध केला त्यांत त्यांची प्रथमतः सविस्तर माहिती सांपडते. आणि त्याचेंच वर्णन इतर ग्रंथकारांनीं पुनरुक्त केलें आहे. क्रान्झ वर्णन करितो कीं, त्यांच्यामध्यें एक राजा (काउन्ट) असे आणि कांहीं सरदार (नाइट्स) असत ते घोड्यांवरून जात. इतर पायांनीं चालत आणि बायका व मुलें दुचाकी गाड्यांतून जात. ते सिजिसमंडचे आणि इतर राजांचे सुरक्षितपणें जाऊं देण्याविषयींचे परवाने दाखवीत. ते भटकण्याचें कारण असें सांगत कीं, त्यांस कांहीं पापक्षालनार्थ यात्रा करावयाची आहे. क्रान्झ पुढें वर्णितो कीं, या लोकांस स्वतःचा देश नाहीं, आणि ते इतस्ततः संचार करीत असतात. ते कुत्र्याप्रमाणें राहतात आणि त्यांचा विशिष्ट पारमार्थिक संप्रदाय असा कांहींच नाहीं. तथापि त्यांस जर कोणी बाप्तिस्मा दिला तर ते घेतात. ते उनाड पुरुष व बायका यांचाहि आपल्यांत समावेश करितात. त्यांच्या बायका भविष्य सांगतात आणि त्या भविष्य सांगतां सांगतांच खिसे कातरतात. या जुन्या लेखकांपैकीं कोणीहि त्यांचा भांडीं नीट करणारे किंवा गाणें बजावणें करणारे म्हणून उल्लेख करीत नाहींत. सिजिस्मंडनें जें त्यांस पत्र दिलें आहे त्या पत्रांत त्यांच्या मुख्यास त्यांच्या आपसांतील भांडणांचा निकाल करण्याचा अधिकार दिला आहे.
चवदाव्या शतकाच्या सुरवातीपासून पंधाराव्या शतकाच्या मध्यापर्यंत त्यांची प्रवासप्रवृत्ति पश्चिमेकडे कां झाली हें स्पष्ट झालें नाहीं. ते हंगेरींतून बाहेर पडल्यानंतर त्यांच्यापाशीं सिजिस्मंडचें पत्र होतें तरी देखील त्यांचा छळ होण्यास सुरुवात झाली. ते चोर्या करीत, खिसे कातरीत. यामुळें लोकक्षोभ त्यांच्यावर पुष्कळ झाला. ते कोठें गेले म्हणजे तेथील शेतकरीवर्ग घाबरून जात असे आणि या लोकांस करावें तरी काय म्हणून त्यांनीं कोठें तरी एका ठिकाणीं रहावें अशी इच्छा करणार्या मुत्सद्यास मोठा प्रश्न उपस्थित होई.