प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )

प्रकरण ८ वें.
पश्चिमेकडे भ्रमण.

जाट व डोम.- ह्या जातीचे विशिष्ट धर्म काय आहेत हें आपण पाहिलें. आतां, हिंदुस्थान व इराण या देशांत जिप्सी लोकांच्या मुख्य फिरत्या टोळ्या कोणत्या आहेत व त्यांचे धर्म यूरोपीय जिप्सी लोकांच्या धर्मांशीं कोठपर्यंत जुळतात ह्याचें आलोचन केलें पाहिजे. जिप्सी लोकांचे पूर्वज जाट आहेत हें गृहीत धरण्यास भाषाविषयक पूर्वगत संशोधन व जाट धाडसाचा इतिहास कारण झाला आहे. हिंदुस्थानच्या वायव्य दिशेकडे जाट लोकांची जात फार शूर म्हणून गणली जात असे. त्यांनीं खलीफांवर अनेक महत्त्वाचे जय मिळविले. अकराव्या शतकांत महंमदानें त्यांचा मोड केला व ते पश्चिमेकडे पळाले. ते अश्वविद्याविशारद होते व त्यांचा जीव कोणत्याहि विशिष्ट प्रकारच्या मतांत अगर उपास्यांत अडकला नव्हता. चौर्यकर्माविषयीं त्यांची फार प्रसिद्धि होती. ह्या विशिष्ट लक्षणांमध्यें त्यांचें व यूरोपीय जिप्सी लोकांचें साम्य आहे, परंतु मेलेल्या डुकरांचें मांस जाट खात नसत व ते कुत्र्यांप्रमाणें खादाड नव्हते. वर निर्दिष्ट केलेले सर्व धर्म जाट लोकांमध्यें होते असें आपणाला म्हणतां येत नाहीं आणि यामुळें रक्तमिश्रणाच्या संशयास अवकाश होतो. फिरत्या लोकांच्या अनेक ज्ञाती पाहिल्या तर त्यांमध्यें जाटांशीं विसदृश पण जिप्सींत असलेले सर्व धर्म दिसून येतात, ह्यावरून कांहींजणांनीं असें अनुमान काढलें आहे कीं, जाट लोकांमध्यें इतर लोक मिसळले. मिसळणार्‍या लोकांत प्रमुख डोम लोक असावेत अशी कल्पना मांडली गेली आहे. डोम हे मध्यहिंदुस्थान व उत्तरतम सरहद्द यांमध्यें आढळणारी भटक्या व गलिच्छ लोकांची एक जात आहे. हे काश्मिरांतील गिलजित  भागांतहि आढळतात आणि तेथें त्यांची पदवी फार कनिष्ठ आहे. हिचा उल्लेख आपल्या ग्रंथांतून अनेकदां आलाच आहे. डोम बिहार प्रांतांतील इतर लोकांहून दिसण्यांत व आचारांत फार भिन्न आहेत. {kosh The People of India”, edited by J. Forbes Watson & J.W. Kaye (India Museum, १868)}*{/kosh}  त्यांचें तेथें अस्तित्व पुरातन कालापासून आहे.  डोम आणि मनुस्मृतींत (१०,३४) उल्लेखिलेले ‘श्वपाक’ (कुत्रे खाणारे) हे एकच होत असा समज आहे. ते टोळ्याकरून फिरतात, टोपल्या व चटया बनवितात आणि दारूंत सर्व पैसे घालवितात. प्रेतें जाळणें व सर्व शवांची तजवीज करणें या गोष्टींचा बहुतेक त्यांनीं मक्ताच घेतला आहे; आणि काशीक्षेत्रीं त्यावर एक कुल फार श्रीमान् झालें आहे. स्वाभाविक मृत्यूनें मेलेलीं सर्व जनावरें ते खातात व विशेषेंकरून मेलेल्या डुकराच्या मांसाची त्यांनां आवड आहे. अनियमितपणें वागून देखील त्यांच्यापैकीं पुष्कळ ८०-९० वर्षांपर्यंत जगतात व ६०-६५ वर्षांच्या पुढें त्यांचे केंस पांढरे होण्याला सुरवात होते असी त्यांच्या संबंधाची माहिती पाश्चात्त्य लेखकांनीं गृहीत धरली आहे. तींपैकीं त्यांच्या दीर्घायुष्यासंबंधाची माहिती अजीबात चुकली आहे. ह्या डोम लोकांच्या पूर्वजांपैकीं कांहींजण उत्तरेकडील सरहद्दींत सांपडतात व तेथें ते ‘डोमर’ नांवानें प्रसिद्ध आहेत. हे “आर्यन्” लोकांनीं भरतखंडाच्या पूर्वभागांत वसती केली त्या काळाच्या अगोदरचे असावे असें समजतात. ते पर्वतांत राहतात. टोळ्या करून भटकतात. व मेंढपाळाचें काम करितात आणि लुटारूपणाचाहि धंदा करितात. यूरोपीय लोक त्यांनां जिप्सी असेंच म्हणतात. त्यांची भाषा यूरोपीय जिप्सींनां समजते असेंहि जरासें साहसाचें विधान करण्यांत आलें आहे.

यूरोपीय जिप्सींप्रमाणें डोम लोकांत कित्येक अवनतिदर्शक ठळक लक्षणें सांपडतात. तीं लक्षणें खलीफाला जिंकणार्‍या शूर व लढवय्या लोकांच्या (गटांच्या) संवयींशीं अगदीं न जुळणारीं आहेत. नैसर्गिक प्रवृत्तीनेंच जणोंकाय घाणींत काबाडकष्ट करणें, प्रेतांनां हात लावणें, टोपल्या करणें, मृतपशूंचें मांस खाणें, दारूबाजी हें आयुष्याचें मुख्य कर्तव्य मानणें, ह्या गोष्टी जाट लोकांची आपणाला जी माहिती आहे तिच्याशीं जुळत नाहींत. तथापि यूरोपीय जिप्सींमध्यें ह्या सर्व गोष्टी आढळून येतात व जाटांप्रमाणें अश्वविद्यानैपुण्य देखील दृष्टोत्पत्तीस येतें. यावरून जाटांखेरीज इतर रक्त आणि तें देखील कनिष्ठजातीचें रक्त त्यांत मिसळलें असावें, असें अनुमान काढतां येतें. डोम हीच ती निराळ्या कनिष्ठ रक्ताची जात असावी आणि तिनेंच आपणांत जाटांचा समावेश करून एकत्र बनलेल्या वर्गाला डोम उर्फ रोम (डरयोरभेदात्) हें नांव दिलें असावें असा संशय व्यक्त झाला आहे, तो बरोबर असेल. तथापि उच्चजातीची कनिष्ठाचाराकडे प्रवृत्ति होणें देखील परदेशीं स्वाभाविक आहे. ती कशी होते याचें स्पष्टीकरण पुढें येईल.