प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )
प्रकरण ८ वें.
पश्चिमेकडे भ्रमण
मूलपीठिका. - जिप्सींचे मूळपुरुष हिंदुस्थानच्या वायव्य दिशेकडील जाट लोक होत असा कॅप्टन रिचर्ड बर्टन यांचा तर्क आहे. जाट लोक व दुसरे कित्येक लोक दहाव्या शतकापासून हिंदुस्थानच्या बाहेर पश्चिमेकडे परदेशवासार्थ गेले व यांपैकीं जाट लोक हे यूरोपीय जिप्सींचे मूळपुरुष (हौप्तस्तम) झाले असें बर्टन साहेबांचें म्हणणें आहे. जेथें जातिनिर्बंध प्रस्थापित झाला आहे व जातींच्या बाहेर असणार्या लोकांत देखील धंदे आनुवंशिक आहेत अशा हिंदुस्थान देशांतून जिप्सी लोकांचा उगम झाला असा तर्क जिप्सींच्या अनेक वर्षांच्या व्यवहारासातत्यावरून काढला आहे तो निर्दोष आहे असें नाहीं. परक्या देशांत गेलेल्या मनुष्याचा मूळचा धंदा कोणताहि असला तरी विशिष्ट धंदाच त्यास तेथें करतां येतो. अर्थात् जिप्सींची पाश्चात्त्य संशोधकांनीं गृहीत धरलेली विशिष्ट धंद्यांतील नैसर्गिक प्रवृत्ति कांहींएक सिद्ध करीत नाहीं. मात्र विशिष्ट धंद्यांची त्यांची आवड लक्षपूर्वक पाहिली तर ह्या बाबतींत त्यांच्याशीं संशोधकांनीं ठरविलेल्या त्यांच्या भारतीय पूर्वजांचें सादृश्य आहे एवढें मान्य करण्यास हरकत नाहीं. यूरोपांतील जिप्सींच्या पूर्वजांचें धंदे व संवयी खालीलप्रमाणें आहेत. ते जुनी भांडीं नीट करीत. ते लोहाराचें काम करीत. त्यांनां अश्ववैद्यक घोड्याची नालबंदी करणें अवगत होतें. नाचणें, गाणें वाद्यें वाजविणें व दोरीवर नाचून कोल्हाट्यासारखा खेळ करणें या कामांत ते फार कौशल्य दाखवीत. अशा खेळ करणारांच्या प्रवासी मंडळांत आणि यूरोप व अमेरिका येथील प्रत्येक नाटकगृहांत निदान एक तरी मनुष्य यूरोपीय जिप्सीवंशांतील (Romany) असतो असा नियम काढितां येतो. ते घोड्यांचा व्यापार करीत व घोड्यांची परीक्षा त्यांनां स्वभावतःच करतां येत असे. मनांत शंका न बाळगतां ते खुशाल उचलेपणा व खिसेकातरूपणा करीत आणि ज्या गुणाचा सामान्य यूरोपीय आणि अमेरिकन लोकांकडून भारतीयावर आरोप झाल्यानें, आजदेखील पाश्चात्य देशांत भटकणार्या भारतीयास जो पोटाचें साधन झाला आहे तो अदृष्टज्ञानाचा गुळ आपल्या अंगीं आहे असें दाखवून हस्तसामुद्रिकानें ते दैवीं काय लिहिलें आहे हें सांगत. बर्टन म्हणतो “स्वाभाविक मृत्यू पावलेली जनावरें ते शंका न बाळगतां खुशाल खात असत. डुकारची त्यांनां फार आवड होती व इग्लंडमधील श्रीमंत जिप्सी मेलेलें डुकर मिष्टान्न म्हणून खात असत. ते प्राण्यांचीं चामडीं सोलून काढीत, व प्रेतें वहात असत. अशा कंटाळवाण्या धंद्याकडे यांची प्रवृत्ति फार होती, व कित्येक यूरोपीय राष्ट्रांत बराच काळापर्यंत फक्त हेच लोक हे धंदे करीत. चटया, टोपल्या व लांकडाचे लहान पदार्थ तयार करून हे लोक विकीत असत.”
वृद्धापकालापर्यंत त्यांचे केंस काळे राहतात, आणि यूरोपीय लोक किंवा सामान्य पौर्वात्य लोक यांपेक्षां जिप्सी लोकांचे केंस जास्त टिकतात.
ते आर्यन् भाषा बोलतात. मुख्यत्वेंकरून ती जाट लोकांच्या भाषेसारखी असते, परंतु दुसर्या हिंदुस्थानच्या भाषांचें तींत मिश्रण झालेलें आहे.