प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )
प्रकरण ८ वें.
पश्चिमेकडे भ्रमण.
जिप्सी.- पश्चिमेकडे सोकोत्रापर्यंत झालेलें चाच्यांचें भ्रमण आणि कांहीं बौद्ध संप्रदायाचे पश्चिमेकडील अवशेष यांबद्दल मागें सांगितलेंच आहे. आतां प्रत्यक्ष यूरोपाकडे वळलें पाहिजे. भारतीयांचा परदेशांशीं संबंध पहातांना यूरोपांत जिप्सी नांवानें प्रसिद्ध असलेल्या भ्रमण करणार्या जातींस विसरतां कामा नये. जेथें जेथें या जाती संघरूपानें दृष्टीस पडतात तेथें तेथें त्यांचे पोषाख वगैरे पाहून कोणाहि भारतपरिचितास भारतीयांची आठवण झाल्याशिवाय रहात नाहीं. जर्मनींत गेलेल्या एका महाराष्ट्रीय तरुणास हा कोणीतरी आपल्यांतला आहे असें समजून त्याच्याशीं जिप्सी भाषेंतच बोलण्याचा एका जिप्सीनें प्रयत्नहि केला होता. या जिप्सींविषयीं आपणांमध्यें फारशी माहिती नाहीं. या विषयावरील वाङ्मय इंग्रजींत फारसें नसून जर्मन भाषेंत आहे असें मित्र {kosh Memoirs of London Anthroplogical Society Vol. III (१870).}*{/kosh} यांच्या एका लेखावरून आणि नामदार रमणभाई नीलकंठ यांनीं पुण्यास भरलेल्या पहिल्या प्राच्य परिषदेंत वाचलेल्या मार्मिक निबंधावरून व्यक्त होतें. असो.
जिप्सींची माहिती हिंदुत्वाच्या अवशेषांत न देतां हिंदूंच्या अपसृष्टीच्या इतिहासांत यावयाची कां कीं, जिप्सी हे हिंदु रक्ताचे असून पुढें परकीय झाले. तथापि प्राचीन बहिर्देशगमनाबरोबर यांचीहि माहिती दिल्यास ती अधिक मनोरंजक होईल. सुशिक्षित नेत्यांशिवाय जे बहिर्देशगमन होतें त्याचा परिणाम काय होतो हें जिप्सींच्या उदाहरणावरून स्पष्ट होणार आहे. परदेशीं गेलेल्या अर्वाचीन भारतीयांची स्थितीहि आज आहे त्यापेक्षां अधिक शोच्य झाली असती. परंतु पुष्कळशा पौरस्त्य लोकांपेक्षां ब्रिटिश राज्यकर्तें बाहेर गेलेल्या भारतीयांची बरीच काळजी घेतात यामुळें सदरील लोकांची स्थिति कांहींशी बरी आहे. याविषयीं सविस्तर माहिती पुढें येईलच.
जिप्सी हे लोक भारतीय खरे तथापि ते येथून केव्हां गेले, जे गेले ते कोणत्या प्रदेशांतील आणि कोणत्या जातीचे होते, इत्यादि प्रश्न अजून पूर्णपणें सुटावयाचेच आहेत असें आम्हीं समजतों.
हे लोक भारतीय असतां त्यांस जिप्सी हें नांव पडण्याचें कारण एवढेंच कीं, हे इजिप्तमधून आपल्या देशांत आले असावे असा इंग्रज लोकांचा प्रथम समज असे. त्यांच्या भाषा अभ्यासिल्या जाऊन जेव्हां त्यांचें सादृश्य भारतीय भाषांशीं दिसून आलें तेव्हां हे लोक हिंदुस्थानांतून गेले असावे असा समज झाला. आजकालच्या अनेक इंग्रजी कादंबर्यांतून अनेक निरनिराळे लोक जिप्सींच्या टोळ्यांत जाऊन सामील झाले, आणि जिप्सींनीं अमुक मुलास चोरून नेलें, त्याचें पुढें अमुक झालें, अशा गोष्टी येतात.
लोकसंख्या.- जिप्सी सर्व यूरोपखंडांत आणि पश्चिम आशिया, सैबेरिया, इजिप्त उत्तर आफ्रिका, अमेरिका व आस्ट्रेलियांतहि आढळतात. यांची नक्की लोकसंख्या कळत नाहीं. यूरोपमधील यांची गणती केलेले आंकडेहि परस्परविरोधी व अविश्वसनीय असे आढळून येतात. यांची यूरोपमध्यें सर्वांत मोठी संख्या हंगेरीमध्यें ट्रान्सलेथोनिया या प्रांतांत आढळते. हा आंकडा जरी बराच जुन्या काळचा (१८९३) आहे तरी तो बहुतेक बरोबर असून विश्वसनीय असावा असें वाटतें. त्या वेळीं यांचीं संख्या २,७४, ९४० असून त्यांपैकीं बहुतेक स्थाईक झाले होते व केवळ ९००० भटकत फिरणारे होते. यानंतर यांची मोठी संख्या रुमानियामध्यें दोनपासून अडीच लाखांपर्यंत आढळते. याखेरीज इतर प्रांतांत यांची संख्या अनुक्रमें, युरोपांतील टर्की १,१७,००० (१९०३), पैकीं बल्गेरिया ५१,००० व पूर्व रुमेलिया २२,०००; सर्व्हिया ४१,०००; बोस्निआ आणि हर्जेगोविना १८,०००; ग्रीस १०,०००; ऑस्ट्रिया १६,०००; जर्मनी २,०००; फ्रान्स २,०००; इटली ३२,०००; स्पेन ४०,००० रशिया ५८,०००; पोलंड १५,०००; स्वीडन आणि नॉर्वे १५०००; डेन्मार्क आणि हॉलंड ५०००; इराण १५,०००; ट्रान्सकॉकेशिया ३०००; आशियांतील टर्की अजमासें एक दीड लाख; ग्रेट ब्रिटन सुमारें १२०००; याप्रमाणें आहे. एकंदर जिप्सींची संख्या दहा लाखांच्या आंतच असावी.
नांवें.- यूरोपीय जिप्सी लोकांची हकीकत सामान्यतः पुढें दिल्याप्रमाणें आहे. यांनां निरनिराळ्या देशांत निरनिराळ्या नांवांनीं ओळखतात, पण मुख्यतः या नांवांच्या दोन शाखा पडतात. पहिल्या शाखेंत बाल्कन द्वीपकल्पांतील बहुतेक लोक येतात व त्यांनां अत्झिंगन, या सामान्य नांवानें ओळखतात. या नांवाचेच अपभ्रंश तुर्कस्थान आणि ग्रीसमध्यें त्शिंगन, बल्गेरिया सर्व्हियामध्यें त्सिंगन, जर्मनीमध्यें झिगनर, इटलींत झिंगरी असे होतात; व इंग्रजी टिंकर किंवा टिंक्लर हा शब्दहि या शब्दापासूनच निघाला असावा असा कित्येकांचा तर्क आहे. यांच्याच नांवांची दुसरी शाखा इजिप्त या शब्दापासून निघालेली आहे. परंतु जिप्सी लोक या संज्ञा कमीपणाच्या मानतात. इंग्लिश ‘जिप्सी’, जर्मनींतील १६ व्या शतकांतील कांहीं लेखांत ‘इजिप्तेर’, स्पॅनिस ‘गितानो’, अर्वाचीन ग्रीक ‘गिफ्तॉस’, या त्या संज्ञा होत. फ्रान्समध्यें यांनां बोहेमिअन म्हणतात व यांखेरीज बालाशि, सारासेनी, अगरेनी, न्युबियानी, इत्यादि अनेक नांवें त्यांनां मिळालीं आहेत.
जिप्सी लोक प्रथम यूरोपमध्यें केंव्हा गेले याबद्दल अनेकांनीं अनेक मतें प्रतिपादन केलीं आहेत. बटैलार्ड (Bataillard) यानें यांचा संबंध हिरोडोटसनें उल्लेखिलेल्या सिगिन्नाइ (Sigynnoi) यांच्याशीं जोडून सहाव्या शतकापूर्वींच बायझन्टाइन लेखकांनीं उल्लेख केलेले कोमोद्रोमॉइ (Komodromoi) ते हेच असावेत असें म्हटलें आहे. रिएन्झी (Rienzi १832) व ट्रम्प (Trumpp १872) यांनीं हिंदुस्थानच्या ईशान्य भागांतील चंगर लोकांशीं यांचा संबंध जोडला आहे तर द गोएजे (de Goeje) यानें फारसी ‘चंग’ (एक वाद्य) किंवा ‘झंग’ (काळा) या शब्दांशीं यांचा संबंध जोडण्याचा प्रयत्न केला आहे. मिक्लॉसिक् (Miklosich) यानें यांचा संबंध पूर्वीं आशियामायनरमध्यें फ्रिजियांत राहणार्या अथिंगनॉइ (Athinganoi) नांवाच्या एका विशिष्ट पंथाच्या लोकांशीं जोडला आहे. हे लोक फार शुद्ध आचरणाचे नियम पाळीत व इतरांचा स्पर्श होऊं देत नसत म्हणूनच त्यांस अथिंगनॉइ (मला शिवूं नको) हें नांव पडलें. या ग्रंथकारानें बायझंटाइन इतिहासांतून कांहीं उतारे काढून हे लोक जादूगार, सर्पमांत्रिक, भविष्यकथन करणारे असत असें दाखविलें आहे. पण तेवढ्यावरून ते जिप्सीच होते असें खात्रीनें म्हणता येत नाहीं.
जिप्सी भाषा.- त्यांच्या भाषांचा अभ्यास जो आज पर्यंत झाला आहे त्यावरून हे हिंदुस्थानांतून तिकडे गेले हें निश्चित झालें आहे. त्यांच्या भाषांत जे इतर भाषांतले शब्द दृष्टीस पडतात त्यांवरून त्यांचा प्रयाण-मार्ग सहज दृष्टीस पडतो. फारसी, तुर्की, ग्रीक, स्लाव्ह इत्यादि सर्व भाषांतील शब्द त्यांच्यांत आहेत तथापि अरबी भाषांतील शब्द त्यांच्यांत नाहींत ही एक लक्षांत घेण्याजोगी गोष्ट आहे. बायझंटाइन व अर्वाचीन ग्रीक भाषेंतील शब्द जर्मनी व इटली या प्रदेशांत राहणार्या जिप्सींच्या मध्यें देखील सांपडतात, आणि त्यांवरून त्या देशांतील जिप्सींचा पूर्वानुभव व्यक्त होतो.
जिप्सींच्या भाषांच्या अभ्यासास आणि त्यांचें हिंदुस्थानांतील भाषांशीं नातें शोधून हे हिंदुस्थानांतील नक्की कोणत्या प्रदेशांतून आले हें ठरविण्यास अडचणी उत्पन्न होतात त्या या कीं, जिप्सींच्या भाषांत भेसळ आणि विकृति ही एकसारख्या चाललेल्या स्थलांतरामुळें फार झाली आहे. दुसरी गोष्ट ही कीं हिंदुस्थानच्या भाषा बदलत आहेत. यामुळें अनेक कल्पनांस अवकाश झाला आहे. आर्मेनियन जिप्सींची भाषा आणि प्राकृत भाषा यांचा संबंध निकट आहे असें फिंक म्हणतो, तर ग्रियरसन पिशाच्च भाषांशीं तिचें नातें दाखवूं लागतो व रमणभाई हिंचे गुजराथी व राजस्थानी या भाषांशीं नातें दाखवितात.
जिप्सींच्या भाषेचे कांहीं नमुने दिल्यास आपला आणि जिप्सीचा संबंध होता या विषयीं खात्री पटेल.
ए त्रिं मोरेश गिले पेंगे= | तीन माणसें गेलीं. |
जीवमास्के=जीवन | छ वे=मलें, छावे, श्यावक |
दिकेल=दिसणें | चिरिक्ले=पक्षी (चिडिया=चिमण्या) |
पोरो=वृद्ध (पुरातन) | पोरोदारे=पुरातनतर |
कोन=कोण | सी=असे |
कोनसी=कोण आहे. | मन्=मज |
मे=मी | तु=तूं |
आमेन=आम्ही | तुमेन=तुम्ही |
तुत्=तुज | ओइ=ती |
ओव्=तो | ववेर=(सं) अवर, अपर |
ओल्=ते (अनेकवचन) | सो= काय, शूं (गुजराथी) |
साव=सर्व | तेरो=तुझी, तेरी (हिंदी) |
ओव, ओई आणि ओल हीं सर्वनामें येणेंप्रमाणें चालतात.
प्र. | ओव | ओइ | ओल् |
द्वि. | लेस | ला | लेन |
तृ. | लेस | लास | लेण्डच |
च.(१) | लेस्ते | लाते | लेन्दे |
(२) | लेस्के | लाके | लेंघे |
पं. | लेस्तर | लातर | लेन्दर |
ष. | लेस्केरो | लोकेरो | लेंगेरो |
सर्व देशांतील जिस्पींची भाषा एकच आहे तथापि तींत कांहीं पोटभाषा दिसून येतात. या सर्वांचा हिंदुस्थानी भाषांशीं संबंध आहे.
जिप्सी | ||||||
संस्कृत | इराण | इजिप्त | नार्वे | इंग्लंड | हिंदी | पाली |
पानीय | पानी | पानी | पानी | पानी | पानी | |
अग्नि | अइक | आग | जाग | योग | आग | |
केश | बाल | बाल | बाल | बाल | बाल | |
अक्षिन् | अकि | अंखि | जाक | योक | आंख | |
हस्त | वस्त् | हत्थ | ||||
काष्ट | कप्त् | कत्थ | ||||
ओष्ठ | वुप्त् | ओत्थ | ||||
त्रास | त्रष् | तस् | ||||
त्रि, त्रीणि | त्रिन् | ति, तिनी |
वरील शब्द नेहमींच्या प्रचारांतील होत; तथापि संस्कृत मध्यें असून अर्वाचीन भाषेंत नसलेलेहि शब्द सध्यांच्या जिप्सींत नाहींत असें नाहीं. असले शब्द जिप्सींच्या गमनकालाचे सूचक आहेत. उदाहरणार्थ “कम” हा शब्द घ्या. हा सध्यांच्या भाषांतून गेलेलाच आहे; तथापि ‘कमेसहि’= ‘तूं प्रेम करीत होतास’, असें वाक्य या भाषेंत सांपडतें. ‘जीव्’ हा शब्द केवळ ‘राहणें’ या अर्थीं संस्कृतमध्यें आहे. पण त्याचा तसा उपयोग अर्वाचीन प्राकृत भाषांत दिसत नाहीं. जिस्पींत तसा उपयोग आहे. ‘जिवेनेस’ याचा ‘तूं जिंवत होतास’ असा अर्थ असून ‘तूं राहत होतास’ असाहि अर्थ आहे.
जिप्सींच्या भाषेंत द्विवचन व नपुंसकलिंग हीं आढळत नाहींत. एकावयवी नामांखेरीज बहुतेक पुल्लिंगी नामें ओकारान्त असतात व स्त्रीलिंगी नामें इकारान्त असतात. उदाहरणार्थ-रक्लो (मुलगा); रक्लि (मुलगी). व्यंजनान्त पुलिंगी नामांची स्त्रीलिंगी रूपें ‘नि’ हा प्रत्यय लागून होतात. उदाहरणार्थ-रोम् (नवरा), रोम्नि (बायको). निर्जीव वस्तूंनांहि पुल्लिंगी किंवा स्त्रीलिंगी समजण्याचा प्रघात आहे. उदाहरणार्थ-गाव(गांव), गाद (अंगरखा) हे पुल्लिंगी आणि नोक (नाक), बोक (भूक) हे शब्द स्त्रीलिंगी समजतात.
रोम् व रक्लि हे शब्द पुढें दिल्याप्रमाणें चालवितातः-
रोम्. पु. | रक्लि. स्त्री. | ||
एकवचन | अनेकवचन | एकवचन | अनेकवचन |
प्र. रोम् | रोमा | रक्लि | रक्लिआ |
द्वि. रोमेस् | रोमेन् | रक्लिआ | रक्लिअन् |
तृ रोमेसा | रोमेन्दजा | रक्लिआसा | रक्लिएन्दजा |
च.(१) रोमेस्ते | रोमेन्दे | रक्लिआते | रक्लिएन्दे |
च.(२) रोमेस्के | रोमेन्घ | रक्लिआके | रक्लिएन्घे |
पं. रोमेस्तर | रोमेन्दर् | रक्लिआतर् | रक्लिएन्दर् |
ष. रोमेस्केरो | रोमेन्गेरो | रक्लिआकेरो | रक्लिएन्गेरो |
सं. रोमा | रोमाले | रक्लिए | रक्लाले |
षष्ठ्यन्त नामांचा उपयोग बहुतेक विशेषणांप्रमाणें होतो, म्हणजे त्यांचें पुढील नामाप्रमाणें लिंग बदलतें. उदाहरणार्थ, ए देर्विसेस्केरि रक्लि (एक दरवेशाची मुलगी). सोनेकइएस्केरो मोच्तो (सोन्याचा पेटारा) इ. द्वितीया विभक्तीच्या रूपास ‘ते’ किंवा ‘के’ (ला) हे प्रत्यय लाविले असतां चतुर्थीचीं, ‘सर’ (नें, बरोबर, सह) हा प्रत्यय लाविला असतां तृतीयेचीं व ‘तर’ प्रत्यय लाविला असतां पंचमीचीं रूपें बनतात. उ., कातर=कोठून.
ओकारान्तनामांचें अनेकवचन एकारान्त होतें; जसेः- चावो-चावे (मुलें), चिरिक्लो-चिरिक्ले (पक्षी). इतर नामांचें ‘आ’ किंवा ‘इआ’ कारान्त होतें; जसें, तेम्-तेमा (जमीन), चइ-चइआ (मुली), पेन्-पेन्या(बहिणी). विशेषणें बहुतेक ओकारान्त असून अनेकवचन एकारान्त होतें व स्त्रीलिंग इकारान्त होतें.
वर्तमान काळाचे प्रत्यय. - हे प्रत्यय क्रियापद स्वरान्त असून ऐकावयवी असल्यास तसेच जोडावयाचे. तसें नसल्यास मध्यें एक स्वर घालून जोडावयाचे.
एकवचन | अनेकवचन |
व | स |
स | न |
ल | न |
उदाहरण, लाव=मी घेतो; केर्-आ-व=मी करतों |
टर्किश | वेल्श मराठी | मराठी | वेल्श | टर्किश |
इसोम् | शोम्=मी आहें | आम्ही आहों= | शम् | इसाम् |
इसान् | शन्=तूं आहेस | तुम्ही आहां= | शेन् | इसान् |
इसी | से=तो आहे; | ते आहेत= | से | इसी |
शोमस्=मी होतो.
शेनेस्=तूं होतास; तुम्ही होता
सेस्=तो होता; ते होते
आतां त्यांची शब्दमालिकाच घेऊं. ही जर्मन जिप्सींची आहे.
जिप्सी नामें ( हिंदी / मराठी ) / एक जिप्सी गोष्ट |
जिप्सींच्या भाषेची अधिक स्पष्ट कल्पना येण्यासाठीं त्यांच्या भाषेंतील एक उतारा घेऊं. हा उतारा वेल्श जिप्सी भाषेंतील गोष्टी जिप्सी राबर्ट्स यानें प्रसिद्ध केल्या आहेत त्यांतील आहे. आम्ही हा ब्रिटानिकेच्या नवव्या आवृत्तींतून घेतला आहे. शब्दांखालींच त्यांचे अर्थ जसे तेथें दिले आहेत तसे घेतले आहेत.
एकदां आणि दिनीं खलाशी तसेच अवर चार माणूस होते. एक लोहार होता आणि तो दुसरा शिपाई होता आणि शिवणगार आणि पल्याडचा खाणावळवाला होता. तो खलाशी त्या लोहारास त्या दर्यावर येणें विचारतो. तो लोहार म्हणाला, “नाहीं, (मला) वृत्ति करणें जाणें आहे.” “तुझी वृत्ति काय असे” ? तो लोहार उच्चारी “लोखंड तापविणें आणि त्यास रूप घोड्या (चे) नालांत करणें.” तो खलाशी त्या अवरां तिघां त्या तार्वा आंत येणें पृच्छी. तो शिपाई म्हणाला कीं, “तुम्हा तप्त रक्षिणें वेश करणें जाणें आहे.” आणि तो खाणावळकर म्हणाला सर्व आणि तुम्ही त्या सैतानाकडे जाणें. तुम्हा मत्त करणें दारु करणें मी जा. येथें सर्व त्याला.
या अवतरणांतील शब्दांचें आतां पृथक्करण करूं.
खालील शब्द संस्कृत शब्दापांसून व्युत्पादितां येतात. कंसांतील अंक शब्दांवर घातलेलेच आहेत.
येक=एक (१,१०); अ=च (२,९४) ; सेस्=अस् धातूचें रूप (४,११,१६,२२) ; याचें आणखी एक रूप ‘से’(४५); ‘ता’=तथा, आणि या अर्थानेंहि याचा उपयोग आहे, (६,१३, १८, ५४, ७४, ७९) ; ववेर्=अवर(७,१५,६४), स्तोरे=चत्वारः(८) ; ‘पोतचेदस’ आणि ‘पोतचदास’=पृच्छति(२६,६०) ; ते=तुम्(२९,३९,४१, ४८,५५,६६,७६,८५,८७,९०,१००,१०३,१०७); अप्र=उपरि(३१) ; पेन्दस्=वद् (३६,७३,८३,९७) ; नाउ=नभवति(३७) ; शोम्=स्यामि (३८,८४); जा व जान्=या (४०,८६,१०८) ; केर्रा=कृ (४२,५६,८८, १०१) ; दुसरें रूप ‘केल’(७७,१०४) ; तिसरें रूप ‘केर्रव्’(५६) ; बूत्ती=वृत्ति (४३,४७) ; तेरो=तव (४६) ; तोमेन(९२,१०५) ; तसर्रा=त्रस् अथवा तप (४९) ; चोतचि=उच्चर (५१) ; उन्द्र=अन्तर् (५७); दुसरें रूप ‘अद्र’ (६८) ; जल्ल=चल (७५) ; एस=वेश (८९) ; रिगेरेन्=रक्ष् (९१) ; तते=तप्त(९३) ; मा=अस्मत् (९९) ; मते=मत्त (१०६) ; साव्=सर्व (१०९,११६; बेंग*=भग (११४); ओक्के=आत्र (११५).
अर्वाचीन देशी भाषांतील शब्द.
दोरेअव=दर्या(३२) ; सो=गुजराथी ‘शूं’ (४४) ; कइ=कडे (११२) ; सिवमन्गरो=शिवणगार (१९,८२) ; पल्लनो=पल्याडचा(२१) ;
हिंदुस्थानांतून प्रयाण झाल्यानंतर आले असावे असा संशय ज्यांविषयीं आहे असे शब्द.
बेअरो, बेअरेन्गरो=तारूं आणि तारूंवाला (खलाशी), (५,२५,६२,७०) ; पेल्तनेन्गरो=लोहार (१२,२८,३५,५३) ; कोरमन्गरो=शिपाई (१७,७२) ; किर्चिमक्करो=खाणावळवाला (२३,९६) ; सस्तर्न=लोखंड (५०) ; चिचाव्=नाल (५८) ; ग्रेन्गे=घोडा (५९) ; वेन, वेल=येणें (६७,३०) ; मोयाबेन=म्होर (७८) ; जवबेन=जा (८०,९८) ; मेन्दे=तुम्ही (१११).
भाषेच्या रचनेंत आपणांस काय भेद आढळून येतात हें पाहूं. प्रथमतः एक गोष्ट दिसून येत आहे कीं, शब्द आपलेच ठेवून वाक्यरचना मात्र इंग्रजी बनली आहे. या तर्हेचे विकार मराठीस थोड्या अंशीं तंजावर येथें आढळतात. वाक्यरचना करतांना जे प्रत्यय आपण नंतर लावतों आणि इंग्रज अगोदर लावतात ते जिप्सी इंग्रजांप्रमाणेंच अगोदर लावतात. उदाहरणार्थ,
ते वेल =णें ये =येणें (२९,३०)
ते जा =णें जा =जाणें(३९,४०)
ते केर्रा =णें कर =करणें(४१,४२)
याप्रमाणें ‘ते’ संस्कृत ‘तुम्’ या अर्थानें पुढें अनेक प्रसंगीं या उतार्यांतच आलें आहे. (४८,५५,६६,७६,८५,८७,९०,१००,१०३,१०७)
शब्दयोगी अव्यय नामांनंतर मराठींत येतें. जिप्सी भाषेंत तें नंतर आलें नाहीं, एवढेंच नव्हे तर अगोदर शब्दयोगी मग उपपद आणि मग नाम असा अनुक्रम आला आहे.
अप्र ओव् दोरेअव् =वर त्या दर्या (३१,३२,३३)
कर्म क्रियापदानंतर घेण्याची पद्धत दिसतें. तसेंच अस् धातूचा उपयोग करतांना विधेयाशेजारींच विधान न घेतां, क्रियापदानंतर घेण्याची पद्धत आहे. उदाहरणार्थ, एक सेस् पेल्तनेन्गरो = एक होता लोहार. क्रियापदाचें स्थान कर्त्याविषयीं सांगावयाच्या मजकुराच्या अगोदर घेण्याची पद्धत संस्कृत भाषेच्या स्वरुपास विरूद्ध नाहीं हें येथें सांगितलें पाहिजे.
जिप्सींच्या भाषेमधील ईश्वरविषयक शब्दावरून त्यांच्या हिंदुस्थानी आठवणी गेल्या नव्हत्या असें दिसतें. देवाला शब्द ‘देवला’ आणि क्रॉसला शब्द ‘त्रुशूल’ (त्रिशूल) हे त्या आठवणींच्या अस्तित्वाचे सूचक आहेत. त्रिशूळपरिचितांस क्रॉस दिसल्यावर आणि तो देखील पवित्र आहे ही भावना कळल्यावर त्यास ते शिववायुधाचें नांव कां देणार नाहींत ? त्यांच्या रीतीभातींमध्यें एक गोष्ट विशेष लक्षांत ठेवण्याजोगी आहे ती ही कीं, ते माणसें पुरतात पण त्यांचे कपडे जाळतात. हिंदुस्थानांतील अग्निमार्फत सर्व गोष्टी पाठविण्याची कल्पना आणि ईश्वराच्या हांकेबरोबर सशरीर पुनरुत्थानाची ख्रिस्ती कल्पना या दोहोंमधील हा मध्यम पंथ आहे. असो.
भारतीयांच्या भाषांच्या इतिहासांत जिप्सींच्या मूल भाषेचें स्थान शोधण्यासाठीं त्यांचें वाङ्मय आणि भाषा हीं नागरी लिपींत छापिलीं जाऊन त्यांवर भारतीय पंडितांचा परिश्रम होणें अवश्य आहे. रमणभाईंच्या पूर्वीं कोणीहि भारतीयानें या विषयाकडे विशेष लक्ष दिलेसें दिसत नाहीं.
या लोकांस ‘रिलिजन्’ नाहीं. हे मुसुलमान लोकांत मुसुलमान, ख्रिस्त्यांत ख्रिस्ती, अशी यांची स्थिति आहे आणि एका दृष्टीनें पाहतां यांस हिंदुत्वाचीच एक यूरोपांत चालण्यासारखी आवृत्ति असें म्हणण्यास हरकत नाहीं.