प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )

प्रकरण १५ वें. : इतिकर्तव्यता.

उपप्रकरण ५ वें.
चातुर्वर्ण्यसंस्थापन.

चातुर्वर्ण्याचे प्रकार.- आपल्या देशांतील चातुर्वर्ण्य व इतर देशांतील चातुर्वर्ण्य यांत असा फरक आहे कीं, आपलें चातुर्वर्ण्य संस्कारांकित आहे. प्रत्येक वर्णास वर्णविशिष्ट संस्कार आहेत. इतर देशांतील चातुर्वर्ण्य संस्कारांकित नाहीं. अमुक मनुष्य अमुक पदवीचा हें पुष्कळदां बाह्य चिन्हांनीं ओळखलें जातें. राजा कोण तर जो सर्व लोकांवर हुकूम चालवितो तोच केवळ नव्हे तर ज्यास राज्याभिषेक होतो, जो सिंहासनावर बसतो, मुकुट घालतो आणि ज्याची प्रतिमा नाण्यावर कोरलेली असते तो, अशी सामान्य मनुष्याची कल्पना असावयाची. सामान्य मनुष्यास पदवी बाह्य चिन्हांवरून ओळखतां येते आणि समाजांतील पदवीचीं निदर्शक जीं बाह्य चिन्हें आहेत त्यांस यांमुळें महत्त्व आहे. अर्थात् वेदोक्त संस्कार हेंच आज द्विजत्वाचें बाह्य चिन्ह आहे, आणि वेदोक्त संस्कार आपणांस मिळावेत म्हणून जी धडपड दृष्टीस पडते तिचें कारण हेंच आहे.

एखादा मनुष्य वाण्याचा धंदा करीत असेल तर ती गोष्ट प्रत्यक्ष दिसत असल्यामुळें कोणीहि नाकबूल करणार नाहीं. तथापि चातुर्वर्ण्यामध्यें आमचें वैश्यस्थान आहे असें त्यानें सांगितलें म्हणजे कुलाचा व त्याच्या इतिहासाचा प्रश्न आला. संस्कारांसंबंधानें पूर्वापार काय चाल आहे हे  देखील प्रश्न उपस्थित झालेच.

संस्कारांकित  चातुर्वर्ण्यामुळें दोन प्रश्न उपस्थित होतात. एक प्रश्न म्हटला म्हणजे क्रियेच्या दृष्टीनें चातुर्वर्ण्यांत अंतर्भूत होणारा, तथापि संस्काराच्या दृष्टीनें चातुर्वर्ण्याच्या बाहेरचा असा वर्ग समाजांत आहे काय?

दुसरा असा प्रश्न उत्पन्न होतो कीं, संस्कारांकित चातुर्वर्ण्यांतर्गत जो समाज आहे त्या समाजामध्यें क्रियेच्या दृष्टीनें जो मनुष्य ज्या वर्णाचा आहे त्याच वर्णाचे संस्कार होत आहेत काय?

हे दोन प्रश्न वांरवार उपस्थित होतात, आणि त्यांस उत्तर जेव्हां असमाधानकारक येतें तेव्हां चातुर्वर्ण्यसंस्थापनेचें प्रयोजन उत्पन्न होतें.

वर सांगिल्यापैकीं पहिला प्रश्न जेव्हां प्राचीन काळीं उपस्थित झाला तेव्हां त्याच्या निराकरणासाठीं व्रात्यस्तोमादि संस्कार उत्पन्न झाले. ते मुसुलमानी राज्य सुरू झाल्यापासून प्रचारांत दिसत नाहींत. चातुर्वर्ण्याबाहेरील वर्ग वाढत आहे आणि समाजांत विशिष्ट वर्णाची क्रिया करणारांस त्या वर्णाचे संस्कार नाहींत असें झालें आहे. चातुर्वर्ण्यांकित समाजामध्यें जेव्हां क्रियामूलक वर्ण आणि संस्कारमूलक वर्ण यांत द्वैत उत्पन्न झालें तेव्हां वर्णव्यवस्था बिघडली. ती वर्णव्यवस्था पुन्हां स्थापन कशी काय करावयाची हा प्रश्न आहे.