प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग
प्रकरण २ रें.
विश्वोत्पत्तीपासून असुरराष्ट्रसंस्थापनकालापर्यन्त.
मनुष्यभ्रमणाचा इतिहास.- मानवकल्प प्राण्यापासून मानवविकास झाल्यानंतर मनुष्यांचा जो इतिहास आपणांस दृष्टीस पडतो तो रचतांना ज्या गोष्टी आपणांस पहावयाच्या त्यांमध्यें मनुष्यभ्रमणाचा इतिहास ही एक होय. हा इतिहास पहातांना आपणांस एक गोष्ट लक्षांत ठेवली पाहिजे. आजची पृथ्वीवरील जमीन आणि पाणी यांची विभागणी आजच्यासारखीच कित्येक हजार किंवा लाख वर्षांपूर्वी नव्हती. भ्रमणाचा इतिहास शोधतांना जी प्रमाणें संशोधक घेतात त्यांमध्ये वनस्पति व पशु यांच्या गृहयीकरणाचा इतिहास, भाषा, निवासस्थान यांसारख्या अनेक गोष्टींचा अन्तर्भाव होतो.
भाषेचा इतिहास आणि मानववंशाचा इतिहास हे सारखेच काय? एक भाषा जेव्हां अनेक लोकांमध्ये पसरते तेव्हां ते लोक त्या भाषेचेंच होते असें धरावयाचें काय? वंश आणि भाषा यांचा संबंध जर ऐक्याचा नसेल तर भाषांच्या तत्वावर इतिहासाचे भाग पाडावयाचे यांत अर्थ काय ? असे प्रश्न उत्पन्न होतात. यासाठी भाषा आणि लोकसमुच्चय यांतील संबंध स्पष्ट केला पाहिजे.
एक भाषा जगांतील दुस-या लोकांवर लादली जाते आणि या क्रियेनें भाषांचा प्रसार होतो याला उदाहरणें पुष्कळ आहेत. आज अमेरिकेंतील निरनिराळया भाषा बोलणारांचे वंशज इंग्रजीच बोलतात. आज ज्यांच्या पूर्वजांची भाषा इंग्रजी भाषेहून निराळी होती अशा लोकांचेंच अमेरिकेंत संख्याधिक्य सांपडेल. तथापि अमेरिकेंत सध्यां जशी परिस्थिति आहे तशी जगांत पूर्वी कधीं होती किंवा नाही याची शंका आहे. (१) आज पोट भरण्याचें साधन जमिनीशिवाय अन्य प्रकारचें पुष्कळ असतें, नवीन येणा-या मनुष्यांनी जुटीनें प्रदेश जिंकून जुटीनें राहणें अवश्य होत नाही. नवीन येणारीं माणसें मजूर म्हणून इकडेतिकडे पसरतात. (२) आजच्या शासनसंस्था मजबूत असल्यामुळें नवीनांस स्वारी करणें आणि जमीन काबीज करणें शक्य नाहीं (३) सार्वत्रिक शिक्षणपद्धतीमुळें नवागतास स्थानिक जनतेंमध्यें विलीन होणें व महत्वास पोचणें शक्य होतें. या प्रकारच्या परीस्थितीमुळें पैतृकभाषात्याग जितका आज सुलभ व सुखावह होतो तितका पूर्वी होत नसे. पूर्वीच्या काळांत एका जातीनें दुसरीची भाषा घेणें ही क्रिया आज अमेरिकेंत जितकी जलद होते तितकी जलद होत नसावी हें उघड आहे.
(१) प्राणी व वनस्पती यांच्या गृह्यीकरणाच्या इतिहासाचें महत्त्व.- गृह्यीकरण झालेल्या वनस्पतींचा व पशूंच्या प्रसाराचा इतिहास मानवेतिहासार्थ महत्वाचा आहे. पुष्कळदां आपणांस असें दिसून येंतें कीं एखादी वनस्पति ज्या ठिकाणीं पिकविली जाते त्या ठिकाणची ती मूळची नसून कोठून तरी बाहेरुन आलेली असावी. ती जर स्थानिक असेल तर आपणांस तीच वनस्पति वन्य स्वरुपांत त्या ठिकाणावरच दिसेल एवढेंच नव्हे तर तें वन्य स्वरुप ज्या इतर वन्य वनस्पतींशीं संबंद्ध असेल त्या वन्य वनस्पतींची समृद्धि आपणांस आसपास सांपडेल: म्हणजे आंबा हें जर फळ हिंदुस्थानांतीलच असेल तर आंब्याच्या रानवट जातीहि आपणांस येथेंच सांपडतील आणि आंबा ज्या वनस्पतिवर्गांत मोडतो त्या वर्गांतील इतर वनस्पती देखील वन्य अगर गृहय स्थितींत आपणांस या देशांतच सांपडल्या पाहिजेत. तसेंच गाय हिंदुस्थानांतील जर स्थानिक असेल तर गोसदृश दुसरे प्राणी आपणांस येथें सांपडले पाहिजेत किंवा गाईचें वन्य स्वरुप आपणांस येथें दृष्टीस पडलें पाहिजे. तसें स्वरुप दिसलें नाही तर तेवढयानेंच गाय येथील स्थानिक नाहीं असें मात्र सिद्ध होत नाहीं. कां कीं, ज्या पशुचें गृह्यीकरण अशक्य होईल तो पशु संहारुन टाकावयाचा हाहि मानवस्वभाव आहे. तथापि गोसदृश वन्य स्वरुप जर दुसरीकडे कोठें सांपडत असेल तर त्याचें तेथें अस्तित्व गाईच्या स्थानिकत्वास विरोध करील. गृह्यीकरणाचा इतिहास हा मनुष्याच्या भ्रमणावर थोडा बहुत प्रकाश पाडील.
(२) भाषेच्या भौगोलिक स्थानाचें इतिहासमहत्व.- मनुष्यभ्रमण अजमावण्याची दुसरी पद्धति येणेंप्रमाणें. उदाहरणार्थ आफ्रिका खंड घ्या. आफ्रिका खंडामध्यें केप् टाऊन्पासून सहाराच्या वाळवंटापर्यंत गेलें असतां आपणांस निरनिराळया भाषांचे पट्टे आढळतात. आफ्रिकेच्या दक्षिणभागाकडून मनुष्यभ्रमण झालें अशी कल्पना करतां येत नाहीं. कारण दक्षिणेकडे विस्तीर्ण समुद्र आहे. मानवी प्राण्याचा संचार उत्तरेकडून दक्षिणेकडे आहेत त्यांचे आगमन अगोदर झालें व जे उत्तरेकडे आहेत त्यांचे आगमन नंतर झालें. तसेंच एखादे विशिष्ट लोक भोंवतालच्या लोकांच्या संस्कृतीहून निराळे आणि भाषेनेंहि भिन्न व दुर्गम स्थळीं असले तर अशी स्वाभाविक कल्पना होते कीं दुर्गम जागीं असलेले लोक आसपासच्या सखल प्रदेशांतील लोकांपेक्षा त्या प्रदेशांत अगोदर आले असावेत, आणि त्या प्रदेशांत आलेल्या नवीन लोकांनी जुन्यांस सखल प्रदेशांतून हांकून दिल्यामुळें त्यांस दुर्गम जागीं जावें जागलें असावें.