प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग


प्रकरण २ रें.
विश्वोत्पत्तीपासून असुरराष्ट्रसंस्थापनकालापर्यन्त.

बाल्यावस्था व प्रौढावस्था:- मनुष्यप्राण्यामध्यें बाल्यावस्था व प्रौढावस्था यामध्ये ठळक फरकच नसतो; परंतु कित्येक जातींच्या किटकांमध्ये व जलस्थलचर प्राण्यांमध्यें हा फरक त्यांच्या शरीराच्या आकारामध्यें एकदम फेरबदल होऊन लक्षांत येतो. अंडे फुटून जें बेडकाचें पिल्लू बाहेर येतें त्याला पाय नसतात. पण एक लांब शेंपूटच त्यांऐवजीं असतें. परंतु पुढे कांही काळानें त्याला पाय फुटूं लागतात आणि शेपूट नाहीशी होत जाते; तोंडाचा व डोक्याचा आकारहि बदलतो आणि असे फरक होऊन प्रौढ बेडूक तयार होतो. गुडरनॅशनें असा शोध लावला कीं, बेडूक प्रौढदशेप्रत पोहोंचतांना हा जो फरक होतो तशा प्रकारची वाढ कंठग्रंथी (Thyroid gland) वर अवलंबून असते; सबब बेडकांच्या पिल्लांमध्यें शरीराची प्रौढावस्थादर्शक वाढ होण्यास त्या पिल्लांना कोणत्या तरी प्राण्याची कंठग्रंथी खाऊं घातली म्हणजे त्यांना आपल्या इच्छेनुसार प्रौढावस्था प्राप्त करुन देतां येतें. उलटपक्षीं त्यांच्या शरीरांतील ही कंठग्रंथी लहानपणींच काढून टाकल्यास हीं पिल्लें आकार मोठा झाला तरी कायमचीं बाल्यावस्थेतच राहतात. कंठग्रंथीमार्फत होणारी क्रिया आयोडाईन नामक निरिंद्रिय पदार्थानें घडवून आणतां येते. यावरुन असें दिसतें कीं, सदरहु शारीरिक फरक आयोडाईन या पदार्थाचा कांही संचय शरीरांत झाल्यानें होत असावा.