प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग

प्रकरण २ रें.
विश्वोत्पत्तीपासून असुरराष्ट्रसंस्थापनकालापर्यन्त.

जडापासून जीवोत्पत्ति.- जडापासून जीवोत्पत्ति कशी झाली याविषयीं विकासवाद्यांकडून समाधानकारक विवेचन झालें आहे असें मानण्यांत येत नाही. तथापि मधली सांखळी कांही अंशीं लागली आहे असेंहि कित्येक समजतात. या विषयावर प्रो. द. ल. सहस्त्रबुध्दे (शेतकी कॉलेज पुणें) लिहून पाठवितात:-

सजीव सृष्टि आणि निर्जीव सृष्टि यांचा परस्पर संबंध कोणत्या पकारचा आहे हा प्रश्न तत्ववेत्ते आणि भौतिकशास्त्रज्ञ यांच्या मनांत मनुष्यप्राणी रानटी स्थिति सोडून देऊन सुधारणेच्या मार्गास लागला तेव्हांपासून सारखा घोळत आहे. अलीकडील शास्त्रीय भाषेंत सांगावयाचें म्हणजे हा विषय रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र यांच्यामधील सरहद्दीवरचा आहे. एक काळ असा होता कीं त्या वेळीं वनस्पतिकोटि आणि प्राणिकोटि यांचाहि परस्पर कांही एक संबंध नाहीं असें मत प्रचलित होतें. परंतु अलिकडील पन्न्नास वर्षांत जीवशास्त्रज्ञांना असें सिद्ध करुन दाखवितां आलें आहे कीं, या दोन कोटींमध्यें अनेक बाबतींत सादृश्य आहे. त्यामुळें आतां आपणांस असें खात्रीपूर्वक म्हणतां येंतें कीं, प्राण्यांमध्यें इंद्रियद्वारा ज्या ज्या प्रतिक्रिया होत असतात त्या सर्व वनस्पतींमध्यें होऊं शकतात. उदाहरणार्थ, थंडीच्या योगानें वनस्पती गारठून जाऊन बधिर होतात, आल्कोहोल वगैरे मादक पदार्थानीं त्यांना कैफ चढतो, दुषित हवेमुळें त्या गुदमरुन जातात, अतिश्रमानें त्यांना थकवा येतो, ज्ञानशक्तिहारक औषधींनीं त्यांना गुंगी येते आणि विषाची बाधा झाल्यास मरण येतें. थोडक्यांत डॉ. सर जगदीशचंद्र बोस या हिंदी शास्त्रज्ञाच्या शब्दांत सांगावयाचें म्हणजे ''क्षोभशीलतेचे (Irritability)जे जे पकार प्राणिकोटीमध्यें दिसून येतात त्यांपैकी वनस्पतीमध्यें आढळून येत नाहीं असा बहुधा एकहि नाहीं.''

असाहि एक काळ होता कीं, त्या वेळीं सेंद्रिय संयुक्त पदार्थ व निरिंद्रिय संयुक्त पदार्थ (Organic and inorganic compounds) हेहि परस्पर अत्यंत भिन्न असतात असें मानीत असत. त्या वेळीं अशी समजूत असे कीं, वरील पदार्थापैकीं निरिंद्रिय संयुक्त पदार्थच कायते रासायनिक प्रयोगशाळेमध्यें तयार करतां येतात; आणि सेंद्रिय संयुक्त पदार्थ हे वनस्पतींच्या किंवा प्राण्यांच्या शरीरामध्येंच कायते विशेष प्रकारच्या चैतन्यशक्तीमुळें (Vital force) उत्पन्न होऊं शकतात, परंतु हा वाटत असलेला फरकहि आतां पूर्णपणें दूर झालूला आहे हेंहि आपणांस माहित झालेले आहे.

सजीव सृष्टी व निर्जीव सृष्टी यांमधील फरकांची जाणीव आज हजारों वर्षे मानवजातीला आहे. परंतु अलीकडे ज्या वेळीं प्राणिकोटि व वनस्पतिकोटि यांचा बराच निकट संबंध आहे असें, आणि सेंद्रिय संयुक्त पदार्थ तयार करण्यास कसल्याहि प्रकारच्या अदृश्य चैतन्यशक्तीची जरुरी लागत नाहीं असें सिद्ध करण्यांत आलें त्या वेळीं, जीवशास्त्रज्ञ आणि रसायनशास्त्रज्ञ यांच्या संयुक्त प्रयत्नांनी आणि सुधारत जात असलेल्या प्रयोगसाधनांच्या साहाय्यानें सजीव व निर्जीव सृष्टि यांमध्यें भासत असलेली भेदरुपी मोठी थोरली भिंतहि नाहींशी होईल, असें साहजिकच वाटूं लागलें; आणि चालू सालापर्यंतचे शोध लक्षांत घेतां ही भिंत सर्वस्वी नाहींशी झालेली नसली तरी ब-याच ठीकाणीं पाडण्यांत आलेली आहे असें दिसून येतें.

नागेली नामक सुपसिद्ध वनस्पतिशास्त्रज्ञ म्हणतो, ''ज्या अर्थी या भौतिक सृष्टीमध्यें सर्व वस्तूंचा परस्पर कार्यकारणसंबंध दिसून येतो, व ज्या अर्थी सर्व भौतिक व्यापार ठराविक सृष्टिनियमानुसार चाललेले आहेत, त्या अर्थी निरिंद्रिय द्रव्यांपासून उत्पन्न झालेले व शेवटीं त्याच निरिंद्रिय द्रव्यांमध्यें मिळून जाणारें सावयवी जीवहि निरिंद्रिय संयुक्त पदार्थापासून मूळ उत्पन्न झालेले असले पाहिजेत असें मानल्याशिवाय विकासविषयक सिध्दान्त पूर्णपणानें सिद्ध झाला असें म्हणतां येणार नाहीं,''