प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग

प्रकरण २ रें.
विश्वोत्पत्तीपासून असुरराष्ट्रसंस्थापनकालापर्यन्त.

मनुष्यप्राण्याचा इतिहास.- हा द्यावयाचा म्हणजे ज्या पूर्वीच्या परंपरांतून मनुष्योत्पत्ति झाली त्या परंपरा द्यावयाच्या आणि त्याच परंपरेचे इतर विकास द्यावयाचे. हे देणे म्हणजे प्राणिशास्त्र देणे होय. आणि हा विकास फार पूर्वीपासून द्यावयाचा म्हणजे वनस्पतिशास्त्रहि देणें होय.

मनुष्यप्राणी हा एका मानवकल्प पशूपासून निर्माण झाला कीं, त्याच्या भिन्न जाती मानवकल्प अनेक पशुंपासून निर्माण झाल्या याविषयीं आज एकमत नाहीं. या एकमताभावाची कारणे केवळ बौद्धिक नाहींत. तर राजकीय व सामाजिकहि आहेत. ज्या देशामध्यें वर्णद्वेष अधिक आहे त्या देशामध्यें अनेकवंशसंभवाची कल्पना अधिक जोरानें दिसते. अनेकवंशसंभवाची शक्यता म्हणून जी उल्लेखिली आहे ती येणेंप्रमाणें- कुत्रा हा श्वानकल्प एकच प्राण्यापासून झाला नसून दोन निरनिराळया प्राण्यांचें गृहयीकरण होऊन आज कुत्र्यांच्या जाती बनल्या आहेत असें कित्येंक समजतात. कांही कुत्रे लांडग्यांच्या गृह्यीकरणानें झाले तर कांही खोकडांच्या गृह्यीकरणानें झाले. मनुष्याचें तसेंच झालें नसेल कशावरुन ? सफेद अदमी जरा अधिक विकसलेल्या वानरापासून झाला असेल आणि काला अदमी त्याहूनहि कनिष्ठ अशा मर्कटापासून झाला असेल असें कित्येकांचें मत आहे. मनुष्यप्राण्याचा विकास कोठे तरी एके ठिकाणीं (एक वंशसंभवमत खरें धरुन चालल्यास) होऊन त्याचा प्रसार चोहोंकडे झाला आणि त्यानें अनेक संस्कृती निर्माण केल्या. या दीर्घ काळाचा इतिहास कसा जमवावयाचा ? आज आम्हांस तो सर्व इतिहास देणें शक्य नाहीं. तो जमविण्यास शरीरलक्षणें, भाषां, भौगोलिक स्थान, चालीरीती इत्यादि प्रकारचीं साधनें आहेत ती फार काळजीपूर्वक वापरलीं मात्र पाहिजेत. त्या साधनांनी इतिहास कसा जमविला जात आहे हे मात्र येथें दाखविलें जाईल.