प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग
प्रकरण २ रें.
विश्वोत्पत्तीपासून असुरराष्ट्रसंस्थापनकालापर्यन्त.
मानववंशाचा विस्तार आणि विशिष्टीकरण.- मानवाचें मूलस्थान कोणत्या तरी संध्यां दिसणा-या भूभागावर किंवा लुप्त खंडांत असून तेथून तो सर्व खंडांत गेला व तेथील हवामानाप्रमाणें त्यांत फरक पडून चतुर्थ युगांत भिन्न वर्णांचे पूर्वज तयार होऊन हल्लीचे मूलवंश निर्माण झाले, म्हणजे मानवसदृश मर्कटापासून विकास पावलेल्या तृतीय युगांतील एकाच नमुन्यापासून विकास पावून चतुर्थ युगांतील अनेक भिन्न वशांचे पूर्वज तयार झाले हा विचार सर्वसामान्य आहे. ल्फावर व लिडेकर यांच्या मतानेंहि प्राथमिक मनुष्य सर्व एक असून सारखेच होते व भिन्न प्रदेशांत गेल्यामुळें त्यांत फरक पडत गेले. मात्र हे शास्त्रज्ञ तीन मानववंश मानून अमेरिकन लोकांस मांगोलियन वंशांत घालतात. पण मांगोलियन व अमेरिकन यांत बरेंच भिन्नत्व आहे. एकंदरिंत लिने यांचे कॉकेशियन, मांगोलियन, इथिओपियन अथवा शिद्दी, व अमेरिकन असे चार वर्ग एका मूलवंशापासून उत्पन्न झाले हे मत कीन यास ग्राहय दिसतें. बर्निअरनें प्रथम मूलवंशाचे चार वर्ग केले (१) श्वेत यूरोपीय (२) कृष्णवर्ण शिद्दी (३) पीतवर्ण आशियांतील मनुष्य व (४) लॅप. ब्लूमनबाक यानें पांच वर्ग केले (१) कॉकेशिअन (२) मांगोलियन (३) इथिओपिअन (४) अमेरिकन व (५) मॅले. क्यूव्हिएनें तीनच वंश मानिले. देव्हायरी याने दोनंच वर्ग केले व देमूले यानें सोळा वंश कल्पिले. यानंतरहि निरनिराळया शास्त्रज्ञांनी निरनिराळीं अनुमानें काढलीं व भाषाशास्त्रज्ञांनी तौलनिक अभ्यासानें हा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला. पुढें प्रिचर्ड व बफन यांनी मस्तकमापनशास्त्राच्या आधारानें तौलनिक अभ्यास करुन मानववंशस्त्राचा पाया घातला. या शास्त्रांतील शोध लावण्यांत ब्रोका, कात्रफाज, टापीनार्ड, हक्सले वगैरे अनेक शास्त्रज्ञ पुढें आले. यांनी केलेलीं निरनिराळीं वर्गीकरणें पसिद्ध आहेत ती करण्यांत त्यांनी कातडीचा वर्ण, केसांची रचना व कवटीचा आकार या गुणांस विशेष प्राधान्य दिलें आहे. या त-हेनें वर्गीकरण करुन (१) शिद्दी (२) मांगोलियन (३) अमेरिकन (४) कॉकेशियन असे चार मानववंश मानले आहेत त्यांचे वर्णन पुढे दिलें आहे.
१. शिद्दी अथवा इथिओपियन.- हा वंश मूलस्थानापासून जवळच आफ्रिकेंत व ऑस्ट्रेलियामॅलेशियाकडे गेला. ह्याचे प्रथम आफ्रिकेंतील व इंडो-ओशियानियांतील असे दोन वर्ग झाले. यापैकीं दुसरा नेग्रिटो नांवाचा असून तो प्राथमिक नमुन्याशीं जास्त लगत व ठेगणा आहे. हे नूतन अश्मयुगाच्या किंचीत् पूर्वी यूरोपमध्यें गेले. यांच्या पोटजाती म्हटल्या म्हणजे कांगो नदीच्या दक्षिणेस बटवा, बुशमन, हाटेंटाट, बंटू, डॅमेरा, कोराना, ग्रिका, गोनाका इत्यादि होत. यांमध्ये थोडाफार फरक असतो. कात्रफाज यानें नेग्रिटोव्याप्त प्रदेशांत हिंदुस्थानाचा समावेश केला आहे; पण द्राविड लोक हे नेग्रिटोंची पोटजात होऊं शकत नाहींत. याविषयीं प्रो. बोल म्हणतात ''माझ्या कित्येक वर्षांच्या प्रवासांत मद्रासचा उत्तरभाग, बंगाल व मध्यप्रांत यांमध्यें नेग्रिटो जातीच्या नमुन्याचा मनुष्य मीं कोठेंहि पाहिला नाहीं. कुरळया केसांच्या व्यक्ती क्वचित् आढळतात. परंतु यावरुन सर जार्ज कॅंबेल प्रमाणें हा नमुना नेग्रिटोचा अवशेष आहे असें म्हणण्यास मी तयार नाही.'' इंग्लंडचा वायव्य भाग, स्कॉटलंडचा पाश्चिमभाग व आयर्लंडचा पूर्वभाग यांत नेग्रिटोंची वस्ती होती असें कांही इंग्रज मानवशास्त्रज्ञ म्हणतात.
यावरुन इंडो ओशियानिक नेग्रिटो ही शब्दयोजना गाळून टाकून ओशियानिक नेग्रिटो असें म्हटलें पाहिजे, यांचा मूळचा पिवळा रंग जाऊन काळा किंवा गहिरा तपकिरी रंग आलेला आहे. हल्लीं हे अंदमान, मलय द्विपकल्प, फिलिपाहन बेटें व न्यू गिनी या प्रदेशांत सांपडतात. मलय द्वीपकल्पांतील नेग्रिटोंमध्यें मर्कटसदृशत्व सर्वांत अधिक दिसतें.
आफ्रिकेंतील शिदयांपेक्षां ओशियानियांतील शिद्दी जास्त ठेंगणे असतात, त्यांचे नाक मोठें असतें व मुद्रा सौम्य असते. या दोन शाखांत पूर्वेकडील शाखा जास्त बुद्धिवान् आहे, व स्वत:च सुधारणा करुन घेण्यास पात्र आहे; पण शिद्दी ही जात परकीय मिश्रणाशिवाय सुधारणें अशक्य आहे असें कीनचें मत आहे पण त्यास श्वेतवर्ण कॉकेशन व कृष्णवर्ण शिद्दी यांचें मिश्रण होऊन उत्तम प्रजाउत्पन्न होईल किंवा नाहीं याविषयीं शंका आहे.
यांची आजपर्यंत सुधारणेमध्यें फारच अल्प प्रगति झाली आहे. अमेरिकेंतहि उपाहारगृहांतील नोकराच्या वरच्या पायरीवर हे फारसे गेलेले नाहीत.
शिद्दींचे भाषेच्या तत्त्वावर सुदानी व बांटू असे दोन विभाग करितात. सुदान हें शिद्दी वंशाचें मूलस्थान मानतात व येथें पूर्ण शिद्दिीवंशाचा नमुना आढळतो. परंतु सुदानमध्यें मिश्र जातीहिं आढळतात त्या: तुकूलअर, सोनरे, सुदानी, हौसा, बोर्नू, बधिरमी, साबा, बासे, बारिआ, शांगाला इत्यादि होत.
सुदानच्या दक्षिणेस बंटूंचा प्रदेश आहे. येथेहि कांही शुद्ध शिंद्दी जमाती आहेत. मिश्रबंटूंमध्यें झुलू-काफीर ही जात विशेष प्रागतिक दिसते. परकीयांच्या स्वा-यांमुळें यांत बरेंच मिश्रण झालें आहे.
ओशियानियांतील शिद्दी लोकांतहि प्राचीन कालीं दळणवळण सौकर्यामुळें आफ्रिकेपेक्षांहि जास्त संमिश्रण झालें आहे.
नेग्रिटोशिवाय इतर ओश्यिानियांतील शिद्दीचे दोन वर्ग करतां येतील. एक ओशियानियांतील लहान बेटांत राहणारे व दुसरे टॅसमानियांत राहणारे मिश्र शिद्दी. पहिल्या वर्गास पाप्युअन म्हणतात. हा नमुना ब-याच बाबतीत आफ्रिकन शिदयांशीं जुळतो पण कांही बाबतीत भिन्न आहे. यांची मूळ भाषा मलायी-पॉलिनेशिअन ही असून यांच्या पोटजातींत इच्या शाखा प्रचलित आहेत. याशिवाय मादागास्करमधील मलायी-मलागासी, पूर्वद्वीपसमूहांतील मलायी, मॅलेनोशियांतील शिद्दी यांच्या भाषाहि हिच्याच शाखा आहेत. ही भाषा कॉकेशिअन वंशापैकी पॉलिनेशिअन लोकांनी या लोकांवर नूतन अश्मयुगांत इकडे येऊन लादलीं असें मत आहे.
ऑस्ट्रेलियांत दोन नमुने मानावे लागतात. यांचा मूळवंश शिद्दी असावा. येथील शिद्दी सामान्यत: इतर शिद्यांपमाणेच आहेत. ऑस्ट्रेलियांत न्यूगिनी व मॅलेशिया यांमधून पाप्युअन आले असें रे. मॅथ्यु याने सिद्ध केलें आहे. नंतर येथून ते टॅसमानियांत गेलें. यांत कांही हिंदुस्थानांतून आलेल्या द्राविडांचेहीं मिश्रण झाले आहे. तसेंच मॅले लोकांचेहि मिश्रण झाले असलें पाहिजे. द्राविड हे काकेशिअन वंशाचे मानले पाहिजेत. टॅसमानिअन लोकांची संस्कृति युरोपीय पुरातन अश्मयुगीन संस्कृतीच्या बरोबरीची आहे. हे 'अश्मयुगाचे जिवंत नमुने आहेत' असें प्रो. टायलर म्हणतो.