प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग
प्रकरण २ रें.
विश्वोत्पत्तीपासून असुरराष्ट्रसंस्थापनकालापर्यन्त.
मानवाचें प्राचीनत्व व भूस्तरशास्त्रविषयक सिद्धांत.- भुस्तरशास्त्रवेत्ते पृथ्वी थंड झाल्यापासून आतांपर्यंतचा काल १० कोटी वर्षे मानतात, पदार्थविज्ञानशास्त्रानुयायी ज्योति:शास्त्रज्ञ २ कोटी वर्षे मानतात. दोहोंतील मध्यम मान धरल्यास ५ कोटी येतील. यांतील चार युगांचा परस्पर सापेक्षकाल, प्रथमयुग शें. ७९; द्वितीय युग शें. १४; तृतीय युग शें. ६ व चतुर्थ युग शें. १ असा येतो.
तृतीय युगांत मगर, कांसवे व हल्लीचे बहुतेक सस्तन प्राणी होते. प्रथम गिबनसारखे मर्कट होते, नंतर ड्रायोपिथिकस मर्कट होते व त्यानंतर मानवसदृश मर्कट विकास पावले व त्यांपासून आद्य मनुष्य पुढील युगांत विकास पावला. या युगांत आयर्लंड व अमेरिका जोडलेलीं होतीं. या युगाचा कालावधि ३० लक्ष वर्षांचा आहे.
चतुर्थ युगांत जमीन व पाणी हीं हल्लींच्या ठिकाणींच होतीं उत्तरगोलार्धांत दोन तीन हिमयुगें अनुभूत होऊन त्या हिमयुगांच्या दरम्यान उष्ण असे हिमयुगांतरकाल (मध्यकाल) होते. या हिमयुगांच्या अनुषंगानें अनेक ठिकाणीं जमीन उन्नत होऊन नवीन प्रदेश उत्पन्न झाले.
या कालांत पुरातन अश्मयुगांतील मनुष्य सर्व प्रदेशांवर पसरलेला होता. त्याची कलांमध्ये थोडीशी प्रगति झाली होती.
नंतर हिम नाहीसे होऊन नुतन अश्मयुगांतील मनुष्य द्दग्गोचर होतो व तो बराच सुधारलेला दिसतो. पूर्व गोलार्धांत त्याची प्रगति विशेष होऊन तो कांस्य, लोह, ताम्र या धातूंचीं कामें करुं लागला. या युगाचा कालावधि ६ लक्ष वर्षाचा आहे.
यानंतरचा आधुनिक काल असून याचा अवधि शास्त्रज्ञ १० हजार वर्षाचा धरतात.
हि म यु ग.- हिमंयुगापूर्वी मनुष्यसदृश प्राणी ड्रायोपिथिकस वगैरे तृतीय युगाच्या मध्यास दृष्टीस पडतात. त्याच वेळीं मनुष्याचा पूर्वज अधिष्ठित केला पाहिजे.हिमकाल हा डॉ. कोलच्या मतानें गणिताधारानें २ १/२ लक्ष किंवा १० लक्ष वर्षापूर्वीं सुरु झाला असला पाहिजे. पैकीं २ १/२ लक्ष हा काल ग्राहय दिसत नाहीं, व हिमकालापूर्वी मनुष्याचें अस्तित्व दृष्टीस पडतें. यावरुन दोन हिमयुगें व मध्यंतरी हिमयुगांतर उष्णकाल मानावा लागतो. याखेरीज इंग्लंडमधील शीत व उष्णकटीबंधांतील प्राण्यांचें समकालीन अस्तित्व अतर्क्य होतें. उष्ण प्रदेशांतील प्राणी स्थलांतर करितात अशीहि कल्पना मांडली गेली आहे तथापि या कल्पनेपेक्षां दोन हिमकालांमध्यें एक उष्ण हिमांतरकाल होता ही कल्पना जास्त सयुक्तिक आहे. तसेंच नदीकांठचे पुरलेले अवशेष कोणत्या कालचे हें ठरवितांना वरील मातीच्या थराप्रमाणेंच खालील नदीच्या खोलीचाहि विचार केला पाहिजें.
आ द्य मा न व.- बहुतेक शास्त्रज्ञ दोन हिमयुगांतील उष्णकालांत कमींत कमी ५ लक्ष वर्षापूर्वी मानव होता असें धरतात, व तृतीय युगांत मानवसदृशमर्कटापेक्षां जास्त विकास झाला नव्हता असें म्हणतात.
मा न व व म र्क ट.- मनुष्याचें मानवसदृश मर्कटाशीं पुढील बाबतींत साम्य आहे. (१) शरीराची सामान्य रचना (२) पुच्छाचा अभाव (३) हात व पाय यांची स्पष्ट दिसणारीं अवयवाचीं चिन्हें (४) दांतांची रचना (५) कांनांचीं पाळें (६) मेंदूची रचना (७)हायॉइड नांवाचें हाड (८) सदृश यकृत व कीकम. पुढील बाबतींत भेद दिसतो. (१) मानवसदृश मर्कटांचा मेंदू लहान असतो व मेंदूची पेटी लहान असते (२) मनुष्याच्या पाठीचा कणा डोकें वर राहण्याकरितां विशिष्ट त-हेचा केलेला असतो (३) मनुष्याचे पाय हाताच्या मानाने लांब असतात. (४) पायाचा अंगठा मनुष्यामध्यें लांब असतो. (५) मनुष्याचें नाक स्पष्ट वर आलेलें व उन्नत असतें. (६) मनुष्याचे दांत सारखे जुळलेले असतात व सुळे स्पष्ट व निराळे असतात. (७) मनुष्याची हनवटी स्पष्ट दिसते (८) मनुष्याच्या सर्व अंगावर केश नसतात (९) मनुष्याचा आवाज स्पष्ट असून शब्दोच्चारण भाषा उत्पन्न होईल असें असतें.
मा न वा चें मु ल स्था न व प्र सा र:- मागें मनुष्य एक प्राण्यापासून झाला अगर दोन प्राण्यांपासून झाला यावर मतभेद आहे असें सांगितलें. कीन एकच मानवकल्प प्राण्यापासून मनुष्य विकासला असें समजतो. त्याच्या मतानें तृतीय युगांतील मानवाचा पूर्वज एकच होता तेंव्हां त्याचें मूलस्थानहि एकच असलें पाहिजे. त्या वेळीं आफ्रिका व न्यूझीलंड ही एकमेकांस जोडलेली होती, यूरोप व आफ्रिका हीं भूमध्यसमुद्रामध्यें जमीन असल्यामुळें जोडलेलीं होतीं. अमेरिका व आशिया यांमध्येंहि संबंध होता यामुळें तत्कालीन मानवाचें परिभ्रमण सर्व खंडामध्ये होणें शक्य होतें. कात्रफाज हा वरील इंडो-आफ्रिकन खंड मानीत नाहीं व मानवाचें मूलस्थान मध्यआशियांतील पठार मानतो; पण त्या ठिकाणाहून मानवाचा सर्व खंडांत प्रवास होणें डॉ. कीनला असंभवनीय दिसतें.
मा न व, लि म र व म र्क ट:- मानवसदृश मर्कट व मानव यांमधील दुवा अद्यापि सांपडला नाहीं. हा कदाचित लुप्त झालेल्या खंडांत असेल. मादागास्करमध्यें कांही लिमर अद्यापि सांपडतात व त्यासभोंवतालच्या देशांत त्यांचे पूर्वज आढळतात. मानवसदृश मर्कटहि येथेंच सांपडतात व शिद्दीवंशाचे दोन पोटविभागहि येथेंच सांपडतात. तेव्हां मानवाचें मूलस्थान याच खंडांत मानलें पाहिजे, असें किनचें म्हणणें आहे; परंतु याविषयीं सर्व शास्त्रज्ञांचें एकमत नाहीं (पृ. ४३ विभाग पहिला पहा.) मानवाचा पूर्वज उष्णॠतूंत राहणारा, झाडांमध्यें वसति करणारा व केंस अंगावर असलेला असा होता व हेंच वर्णन लिमर यास लागू पडतें. शिदयाचा कृष्णवर्ण नैसर्गिक नसून हवामानामुळे प्राप्त झालेला अतएव कृत्रिम असावा; कारण कांही शिद्दी काळे नसून पिंवळे असतात, ऑस्ट्रेलियनांची मुलें जन्मत: पिंवळया व पिंगट वर्णाची असतात, तिबेटी लोकांचे केंस प्रथम पिंगट व नंतर काळे होतात.