प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग
प्रकरण २ रें.
विश्वोत्पत्तीपासून असुरराष्ट्रसंस्थापनकालापर्यन्त.
(अनादिकाल-ख्रि. पू. ८०००.)
मानवेतिहासाच्या मर्यादा व साधनें.- इतिहासाचा विषय मनुष्यप्राण्याच्या जगावरील एकंदर हालचालीचें ज्ञान होय.
प्रत्येक देशांत इतिहासज्ञानाची सुरुवात मनुष्यानें आपल्या कालांतील गोष्टी लिहून किंवा इतरांस सांगून रक्षण करुन ठेवल्यानें होते. पैतृक परंपरा लेखाच्या द्वारें नेहमींच उपलब्ध होतात असें नाहीं. जगांतील अनेक राष्ट्रांपैकीं फारच थोडया राष्ट्रांची स्वकालीन इतिहास लिहून ठेवण्याइतकी प्रगति झाली होती. प्रत्यक्ष इतिहासलेख लिहिले गेले नसले तरी इतिहासोपयोगी ग्रंथ प्रत्येक संस्कृतींत आढळतात. प्रत्येक लोकांची काव्यें व स्तोत्रें त्यांच्या इतिहासाचीं साधनें आहेत. काव्यांखेरीज इतर अवशेष देखील इतिहासदायक असतात.
अर्वाचीन इतिहाससंशोधक, वाड्·मयरुपी व वस्तुरुपी अवशेष किंवा अव्याहत चालू असलेल्या परंपरा व रीतिभाती यांवरुन इतिहास लिहिण्याचा प्रयत्न करतो.
या प्रकारचें साहित्य देखील फारच थोडया कालाचा आणि फारच थोडया राष्ट्रांचा इतिहास देऊं शकते. ज्या राष्ट्रांचे लेख किंवा इतर प्राचीन काळचे वस्तुस्वरुपी अवशेष उरले आहेत अशीं राष्ट्रे फारच थोडी. ज्यांचे कोणत्या तरी पकारचे अवशेष दहा हजार वर्षांइतके. जुने श्ल्लिक आहेत अशी राष्ट्रे अगर संस्कृति आज आपणांस ठाऊक नाहींत. चार हजार वर्षांइतके जुने ज्यांचे अवशेष शिल्लक आहेत अशी राष्ट्रे अगर संस्कृति हातांच्या बोटांवर मोजतां येतील इतक्याच आहेत.
अनेक राष्ट्रें व जाती याविषयीं माहिती आपणांस गेल्या शतकांतच प्राप्त झाली आहे.
इतिहासलेखनाची सामान्य पद्धति अशी आहे की, जितक्या प्राचीन काळांची आपणांस माहिती आहे तितक्या प्राचीन काळापासून सुरुवात करुन आजच्या काळापर्यंत कथासूत्र ओढीत आणावयाचें. ही पद्धति नेहमी शक्य असतें असें नाही. कारण जितका काळ जुना तितका तो अधिक अस्पष्ट असतो. आणि तो अस्पष्ट असल्यामुळें उत्तरकालीं कथासूत्रास सुरुवात करुन जितकें पाठीमागें जातां येईल तितकें जावें या पकारची पद्धति अमलांत आणावी लागते. इसवी सनाच्या प्रारंभींचा काल घेतला तरी आपणांस त्या वेळच्या फारच थोडक्या राष्ट्रांची माहिती आहे. सहारा वाळवंटाच्या दक्षिणेकडील आफ्रिकेच्या भागाची आणि अमेरिका व सैबिरिया या प्रदेशांतील राष्ट्रांची दोन हजार वर्षांपूर्वीची माहिती आपणांस कांहींच नाही असें म्हटल्यास चालेल. मनुष्य प्राण्याचा जगभर विस्तार या कालाच्या पूर्वी कित्येक शतकें झाला होता याविषयी आज कोणास शंका नाहीं.
मनुष्यप्राण्याची वसती किती वर्षें होती याविषयीं आज आपली कल्पना पुष्कळ विस्तृत झाली आहे. लाखों वर्षे मनुष्यप्राणी जगावर आहे असें शास्त्रज्ञांचे आज मत झालें आहे. या लाखों वर्षांचा इतिहास कसा लिहावयाचा हें मोठें कोडें आहे. भूस्तरशास्त्र, वनस्पतिशास्त्र, प्राणिशास्त्र, भाषाशास्त्र इत्यादि शास्त्रांच्या साहाय्यानें ही मधली खळगी भरण्याचा प्रयत्न होत आहे. या प्रयत्नाचें फल येथें देण्यास अवकाश नाहीं; पण या शास्त्रांचा मनुष्येतिहासाशीं संबंध कसा काय पोंचतो हें दाखविलें म्हणजे इतिहासशास्त्राची व त्या शास्त्राच्या संवर्धनार्थ असलेल्या साहित्याची आपणांस कल्पना येईल.
विश्वांतील मानवोत्पत्तिपूर्व क्रिया व त्यांचा कालक्रम.- प्रथमत: शास्त्रज्ञांमध्यें जें इतिहासविषयक तत्वज्ञान प्रचलित आहे त्याचा उल्लेख केला पाहिजे.