प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग

प्रकरण २ रें.
विश्वोत्पत्तीपासून असुरराष्ट्रसंस्थापनकालापर्यन्त.

मांगोलियन मानववंश.- या वंशाचें मूलस्थान मध्य आशिया हें होय. इंडोआफ्रिकन खंड अस्तित्वांत होतें त्या काळीं हिमालयाची अधिकतम उंची २०००० फूट होती. तिबेट जलमय होतें त्यामुळें मध्य आशियांत तृतीय युगांत मनुष्यास येणें सुलभ होतें. कात्रफाजच्या मतें मांगोलियन मनुष्य शिद्यापेक्षांहि मूलपूर्वजाच्या जास्त जवळ आहे. मर्कटसदृशत्वाचीं चिन्हें शिद्यामध्यें कवटीचा आकार, पुढे आलेला जबडा, आजानुबाहू व पायाची अतिशय पातळ पोटरी ही आहेत. यावरुन तो वंश प्रथम विकास पावला असें निश्चितपणें मानतां येईल किंवा नाही याबद्दल संशय आहे. म्हणूनच भिन्नवंशाची स्वतंत्र रीतीनें समकालीन उत्पत्ति मानणे सयुक्तिक आहे, कारण प्रत्येक वंशांत मूळ पूर्वजाचे कांही विशिष्ट गुण असतातच. मांगोलियन वंशाचें पृथक्त्व, कातडीचा पिवळा वर्ण, रुंद व चपटे चेह-याचे अवयव, पुढच्या बाजूस वर आलेलें गालाचें व लहान गालाचें हाड, लहान व मध्यम लांबीचें नाक, मध्यमप्रक्षेपण असलेला जबडा, रुंद डोकें, भ्रूतोरणिका व भ्रूमध्यकूर्च अपूर्ण वाढलेला, खोल गेलेले व बदामाच्या आकृतीचे डोळे, डोळयाच्या आंतील कोंप-यावरील घडी व बाहेरची बाजू उठावून दिसणारी या गोष्टींत आहे.

अमेरिकन शाखा विभक्त झाल्यानंतर मूल मांगोलियन वंश सर्व आशियाभर पसरुन नंतर मॅलेशियांत गेला व नूतन अश्मयुगांत त्यानें युरोपांत प्रवेश केला. कॉकेशन वंशहि याच वंशाप्रमाणें दूरवर पसरल्यामुळें त्याचें अनेक ठिकाणी मिश्रण झालें आहे. या मिश्रणाचीं उदाहरणें मलेशियांतील इंडोनेशियन, मेसापोटेमियांतील अक्कड, हिंदुस्थानांतील कांही द्राविड, फिन व तुर्क ही आहेत. अशा मिश्र जातीचें वर्गीकरण जो अंश जास्त प्रमाणांत असेल त्यावरुन अगर भाषेच्या साहाय्यानें करावें लागतें.

या वंशाचे दोन मुख्य विभाग मांगोलोतार्तर व इंडोचायनीज असे आहेत. या वंशाविषयीं ऐतिहासिक माहिती अक्कड लोकांच्या बाबिलोनियन सामाज्यपासून मिळूं लागतें.

मंगोलो- तार्तर या शब्दापेक्षां मंगोलोतुर्क हा शब्द अधिक सार्थ आहे. याच अर्थी उरल अलताइक हा शब्द कांही शास्त्रज्ञ वापरतात. चेंगिझखान यानें तार्तार व मोंगल लोकांस एकत्र करुन त्यांचे एक राष्ट्र बनविलें व पुढें त्यांनी १४५३ मध्यें  कान्स्टँटिनोपल घेऊन तुर्की साम्राज्य स्थापन केलें.

फिनिश.- हे लोक मांगोलियन आहेत की कॉकेशियन आहेत याबद्दल वाद आहे. यूरोपांतील फिन लोकांचे कॉकेशियन लोकांशीं बरेंच मिश्रण झालें आहे पण त्यांची भाषा उरल अलताइक भाषेची शाखा असल्यामुळे ते मंगोलवंशाचेच असले पाहिजेंत. सायबेरीयांतील लोक व सामोयिड यांत सर्व चिन्हें मांगोलियन वंशाची आहेत. उग्रियन, व्होगल व ओस्तिअ‍ॅक यांचे कांही गुणधर्म भिन्न आहेत. लॅप व बाल्टीक फिनिश जातीत इतर जातीच्या मिश्रणानें कांही फरक झाले आहेत.

अ‍ॅव्हर, मग्यार व बुल्गार.- अ‍ॅव्हर, मग्यार व बुल्गार या तीन फिनोतार्तार जाती असून त्यांत फार फरबदल झाले आहेत. अ‍ॅव्हर हे कॉकेशनशी तादात्म्य पावले. मग्यार लोकांनी आपली फिनो तुर्की भाषा कायम राखली पण त्यांची चेहरेपट्टी बदलली. बुल्गार लाकांनी स्लाव्ह भाषा स्वीकारली पण त्यांत कांही फिनो- तुर्की गुणधर्म शिल्लक आहेत.

ओस्मानली तुर्क या जातीतहि मंगोलियन गुणधर्म मिश्रणामुळें बरेच नष्ट झाले आहेत; परंतु त्यांची भाषा उरल-अलताइक भाषेची शाखा आहे. ते सायबेरियांतील अमूर नदीपासून बॉस्परसपर्यत पसरले आहेत.

कोरिओ- जपानी ही शाखा फार प्राचीन काळीं मूलवंशापासून निराळी झाली. भाषेच्या दृष्टीनें हे मंगोलियन वंशाचेच आहेत. कोरियन लोकांत श्वेत व पीत वर्णाचें मिश्रण आहे आणि जपानी लोकांत श्वेत, पीत व कपिश वर्णाचें मिश्रण आहे. त्यांच्या भाषा उरल-अलताइक भाषेच्याच शाखा असून फिनोउग्रियनशीं सदृश आहेत.