प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग
प्रकरण २ रें.
विश्वोत्पत्तीपासून असुरराष्ट्रसंस्थापनकालापर्यन्त.
इतिहाससाधनांचे महत्वमापन.- वर सांगितलेल्या कालाचा इतिहास जमविण्यास जीं आतांपर्यंत साधनें उपलब्ध आहेत त्या साधनांमध्यें भाषाशास्त्र अधिक महत्वाच्या अधिक पाय-या सांगेल अशी आमची समजूत आहे. शरीरलक्षणें कांही पुरावे देईल आणि अत्यंत प्राचीन काळापर्यंत देखील संशोधकास नेईल तथापि मनुष्याची परिभ्रमणें आणि विविधकालचे त्याचे समुच्चय यांवर प्रकाश पाडण्यास शरीरलक्षणशास्त्र असमर्थ आहे. पण या शास्त्राचाहि उपयोग आहे. आजच्या पुराव्यावरुन इतिहास लिहावयास कोणत्या गोष्टी अधिक कालपर्यंत टिकतात आणि कोणत्या गोष्टी कमी कालपर्यंत टिकतात हें पाहिलें पाहिजे, आणि त्यावरुन कोणत्या पुराव्यास महत्व द्यावयाचें हें ठरविलें पाहिजे. आम्ही भाषाशास्त्रास फार महत्व देतों. ते देण्याची कारणें येणेंप्रमाणेः-
(१) निरनिराळया भाषांच्या रुपांत साहित्य फार विपुल आहे. आज सुमारें पांचशेंपेक्षां अधिक भाषा बोलल्या जात आहेत.
(२) लोकांची भाषा अजीबाद बदलणें ही गोष्ट फार कठिण जाते. पोषाख बदलतील, खाण्याचे पदार्थ आणि वेळा बदलतील, शासनसंस्था बदलतील, निवासस्थान बदलेल पण भाषा बदलणें म्हणजे अन्य भाषास्वीकार होणें त्याहून कठिण जाईल. कांही लहान सहान भाषा बोलणा-या लोकांचा सदृश भाषा बोलणा-या व अधिक महत्वाच्या लोकांशी संबंध आला म्हणजे दुर्बलांच्या भाषेचा सहज लोप होतो. परंतु विसदृशांशी संबंध आला म्हणजे भाषेचा लोप एकाएकीं होत नाही हें अनेक राष्ट्रांच्या इतिहासावरुन दिसतें. राजकीय वर्चस्वामुळें केवळ भाषा बदलल्या असें दिसून येत नाहीं. भाषेची वाढ खुंटली असेल पण भाष नष्ट होत नाहीं. कदाचित् एखादी भाषा बोलणारे लोक ज्या स्थानावर असतील त्या स्थानावर अन्य भाषा बोलणारे लोक येऊन त्यांचे संख्याधिक्य झालें तर स्थानिकांची भाषा नष्ट होईल; परंतु आपणांस वांशिक इतिहास लिहितांना अधिक-संख्याक लोकांकडे लक्ष द्यावें लागतें आणि त्या स्थानीं असलेल्या लोकांचें पितृत्व शोधावयाचें असेल तर भाषेच्या साहाय्यानें संख्याधिक्य असलेल्या लोकांचेंच पितृत्व आपणास शोधून मिळणार, व एखाद्या स्थानावरुन ओळखल्या जाणा-या लोकांच्या इतिहासार्थ तेंच आपणांस इष्ट आहे. निग्रोंची भाषा अमेरिकेंत बदलली म्हणून भाषा लवकर बदलतें असें म्हणतां येणार नाहीं. निग्रोची भाषा ज्या परिस्थितींत बदलली ती परिस्थितीच विलक्षण होती. निग्रो अगोदर निरनिराळया ठिकाणांपासून विकत घेतले होते त्यामुळें त्यांच्या भाषा मुळांतच एक नव्हत्या, आणि त्यांच्यामध्यें विवाहसंस्था गो-यांनी टिकूं दिली नाहीं. मग गृहसंस्था कशी टिकेल ? वाटेल तो निग्रो वाटेल त्यास विकावयाचा आणि गुलामांची पैदास मालकास हवी असेल त्याप्रमाणें करण्यासाठी वाटेल तो पुरुष व वाटेल ती स्त्री यांचा संयोग घडवावयाचा या प्रकारच्या परिस्थितींत कोणतीहि भाषा टिकणें अशक्य आहे. जेथें लोकांचें समुच्चयरुपानें अस्तित्व आहे तेथें ते अल्पसंख्यांक असूनहि त्यांची भाषा टिकते हें यूरोपांतील जिप्सी, पेनसिल्व्हॅनियांतील डच आणि लुइझियानांतील- फ्रेंच आणि विस्कान्सिनच्या पूर्वभागांतील जर्मन लोकांच्या उदाहरणावरुन दिसून येईल. तामिळ देशांत शेंकडों वर्षे राहिलेल्या आणि कोणत्याहि बाहय बाबतींत तामिळ लोकांपासून अभिन्न दिसणा-या सौराष्ट्रांची स्थिति पाहिली तर आपणांस असें दिसून येईल कीं, त्यांची भाषा जर निराळी नसती तर त्यांस आपण भिन्न आहें याची आठवणच राहिली नसती. यहुदी लोक व पारशी लोक यांची भाषा गेली हें प्रमाण पुष्कळदां पुढें आणण्यांत येतें, पण त्यांची कथा निराळी आहे. एक तर आज ज्यू म्हणून जे लोक म्हणवून घेतात त्या सर्वांची एक हिब्रू भाषा कधींच नव्हती, त्यांच्या भाषा भिन्न भिन्न होत्या, आणि त्यामुळे ग्रांथिक भाषा तेवढी शिल्लक राहिली. पारशांची गोष्ट अशी झाली कीं, ते जेव्हां हिंदुस्थानांत आले तेव्हां त्यांची भाषा आणि त्यांच्या पैतृक ग्रंथांची भाषा एक नव्हती, एवढेच नव्हे तर पैतृक ग्रंथांच्याच भाषा अनेक होत्या, आणि त्यांनी इराण ज्या कालीं सोडला त्यानंतर इराणचीच भाषा रुपांतर पावली आणि ते इकडे आले त्यावेळेस त्यांची संख्या फारच थोडी होती. त्यामुळें त्यांस स्थानिक भाषेचा स्वीकार करावा लागला शिवाय त्यांच्या आगमनाला आज बाराशें वषें झालीं हेंहि लक्षांत ठेविलें पाहिजे. शिवाय हेंहि लक्षांत बाळगिलें पाहिजे कीं, ते शुद्ध गुजराथी बोलत नसून गुजराथींचा एक अपभ्रंश बोलतात. त्यांना अजून 'ळ' उच्चारतां येत नाहीं. जेव्हां एखादे लोक आपली भाषा रक्षण करण्यास समर्थ असत नाहीत तथापि ते जुटीनें राहिलेले असतात, तेव्हां त्यांची भाषा स्थानिक न होतां पैतृक व स्थानिक यांच्यामधील कोणतातरी अपभ्रंश असतो. जिप्सींनीं आपली भाषा जिवंत ठेविली आणि पारशांनी मरुं दिली या वरवर दिसणा-या स्थितीचें अधिक खोल अवलोकन केलें असतां असें दिसून येईल कीं पारशांस जिप्सींपेक्षां परदेशवास जास्त घडला. पारशांचा संबंध शहरांत जास्त आला आणि त्यामुळें त्यांचे सामाजिक पृथक्त कमी राहिलें. आणि जिप्सींच्या भाषेचा जिप्सीपणा रक्षण होणें आणि पारशांच्या भाषेचा पारशीपणा जाणें यांमध्यें फार मोठें अंतर नाहीं, म्हणजे स्वभाषारक्षणाच्या कामामध्यें जिप्सी पारशांपेक्षा फारसे अधिक यशस्वी झाले नाहींत. जिप्सींनीं आपल्या भाषेची वाक्यरचना अगदीं बदलून टाकून इंग्रजी भाषारचना घेतली आहे हें पहिल्या भागांत (पृ. २४९) दिलेल्या त्यांच्या भाषेंतील उता-यावरुन लक्षांत येईल. जेव्हां आपण आपल्याच भाषेंत अनेक परके शब्द घुसडूं लागतो तेव्हां आपल्या भाषेचा आपलेपणा वाक्यरचनेवरुनच सिद्ध होतो. आज आपण जेव्हां प्रचलित मराठी उर्फ घाणेरडें मराठी बोलतों तेव्हां आपण आपली वाक्यरचना व इंग्रजी शब्द यांचे मिश्रण वापरतों. उदारहरणार्थ, 'डिफेडेंठने अफिडाविट फाइल केलें नाही' अशा त-हेची भाषा आपणांस कोर्टांत नेहमी ऐकूं येते. तिला आपण मराठीच म्हण 'पटेल हॅज नॉट मेड पक्का बंदोबस्त' हे इंग्रजी वाक्य आहे. या दृष्टीनें पाहतां जिप्सींची भाषा स्थानिकच आहे म्हणजे जिप्सींनीं स्थानिक भाषा घेऊन आपले शब्द पुष्कळ वापरले असे होईल. पारशांनी यापेक्षां अधिक कांही निराळें केलें नाही. नवागतांची भाषा स्थानिक भाषेचें अपभ्रष्ट स्वरुप होतें, पण जातिभिन्नत्वाने भिन्न राहते; याला आणखी उदाहरण म्हटलें म्हणजे जर्मनीमधील व रशियांतील ज्यूंचें होय. यांची भाषा यिडिश आहे. ही भाषा जर्मन असून हिब्रू लिपींत लिहिली जाते आणि तीत हिब्रू शब्द पुष्कळ असतात. हिंदीचें हिंदुस्थानी हें जसें अपभ्रष्ट स्वरुप त्याप्रमाणे जर्मन भाषेचें यिडिश हें अपभ्रष्ट स्वरुप होय. माळव्यांत भिल्ली आणि कोरकू म्हणून ज्या भाषा आहेत आणि यवतमाळकडे जी गोंडी सांपडते त्या माळवी व मराठी भाषांची अपभ्रष्ट स्वरुपें होत. जेंव्हा दोन भिन्न भाषांचा संनिकर्ष होतो तेव्हां बलवान भाषेची रचना कायम राहते आणि दुर्बल राष्ट्र ती रचना घेतें व शब्द तेवढे आपले ठेवते असें दिसतें.
(३) भाषाशास्त्राच्या अभ्यासानें मनुष्यसमुच्चयांचे साहचर्यं, वियोग आणि भ्रमणें यांचा पत्ता लागतो. एखादी भाषा त्या भाषेशीं विसदृश अशा भाषांनी व्यापिलेल्या प्रदेशांत दिसली तर ती तेथें नवीन आली असावी आणि त्या भाषेच्या नात्यागोत्याचा भाषा जेथें असतील तेथून ती किंवा तिचें पूर्वरुप गेलें असावें अशी कल्पना होते. भाषेच्या शब्दसंग्रहाच्या अभ्यासानें ती भाषा बोलणा-यांच्या संस्कृतीची व्यापकता समजते.