प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग

प्रकरण २ रें.
विश्वोत्पत्तीपासून असुरराष्ट्रसंस्थापनकालापर्यन्त.

केवल सांनिध्यविकारी बाहय व अन्तस्थ पदार्थ- (Catalytic Agents व Enzonies):- येवढ्याशा लहान गोलकामध्यें अनेक अत्यंत गुंतागुंतीच्या व दीर्घकाल टिकणा-या रासायनिक क्रिया चालू असतात हें पाहिलें म्हणजे खरोखर मोठें आश्चर्य वाटतें. गोलकांतील जीवनरस व त्यांचीं कार्ये यांचे अत्यंत काळजीपूर्वक परीक्षण चालू आहे व त्यावरुन आतापर्यंत आपणांस येवढें समजून आलें आहे कीं, ज्या पुष्कळशा क्रिया अदृश्य शक्तीच्या योगानें होतात अशी पूर्वी समजूत होती त्या बहुतेक अगदीं सामान्य सृष्टिनियमानुसार वास्तविक घडत असतात असें सिद्ध करतां येतें. कित्येक द्रव्यें अशीं आहेत कीं, त्यांच्यांतील रासायनिक आकर्षणानें होणा-या परिणामाशिवाय त्यांच्यांत अशी एक शक्ति असते कीं, त्यांच्या केवळ सांनिध्यामुळें शेजारच्या इतर पदार्थामध्यें परस्पर संयोगीकरण किंवा पृथकरणाची क्रिया होते; आणि तीं द्रव्यें स्वत: अबाधित राहतात. उदाहरणार्थ, सल्फ्युरिक अ‍ॅसिड स्वत:मध्यें कांहीएक फरक न होऊं देतां स्टार्चची साखर बनवूं शकतें. अशा प्रकारचीं कार्ये करणारी दुसरीं अनेक द्रव्यें आहेत. त्यांना सांनिध्यविकारी पदार्थ (Catalytic Agents) म्हणतात. अशा द्रव्यांचा अत्यंत अल्प अंशसुद्धां दुस-या पदार्थाच्या मोठया सांठयामध्यें फरक घडवून आणूं शकतो. आणि हेच गोलकामधील सांनिध्यविकारी पदार्थ (Catalytic Agents or Enzomes), जे पुष्कळसे फरक अदृश्य चैतन्य शक्ति घडवून आणते अशी समजूत होती, ते फरक घडवून आणीत असतात.