प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग
प्रकरण २ रें.
विश्वोत्पत्तीपासून असुरराष्ट्रसंस्थापनकालापर्यन्त.
आयुर्मर्यादा:- प्राण्याची जिवंत राहण्याची क्रियाहि शरीरांतील रासायनिक प्रतिक्रियांच्या परंपरेवर अवलंबून असते. कित्येक वेळां असा प्रश्न विचारण्यांत येतो कीं, रोग व अपघात हे पूर्णपणे टाळून कोणा प्राण्याला अमर्याद आयुष्याचा उपभोग घेतां येणे शक्य आहे काय ? अशा प्रकारचा प्रयोग मनुष्यप्राण्यावर करणें अशक्य आहे. परंतु बॉगडॅनो या रशियन शास्त्रज्ञानें कीटकांवर प्रयोग करुन हा प्रश्न सोडविला आहे. त्यानें असें सिद्ध केले की 'मरणं प्रकृति:शरीरिणाम्,' म्हणजे कोणालाहि मृत्यु टाळतां येणें शक्य नाहीं; फक्त आयुर्मर्यादा वाढविणें किंवा कमी करणें ही गोष्ट स्वत:च्या आधीन असते. कोणतीहि रासायनिक क्रिया होण्यास सामान्यत: लागणारा काळ उष्णतामान १००नी कमी केल्यास दुप्पट किंवा तिप्पटहि अधिक लागतो. आणि जगण्याची क्रिया हीहि एक रासायनिक क्रियाच असल्यामुळें तिलाहि वरील नियम लागला पाहिजे. जंतुविरहित केलेल्या (Asceptic) माशांवर अशा प्रकारचे अनेक प्रयोग करण्यांत आले, त्यांत असें आढळून आलें कीं, उष्णतामान तेंच होतें तेव्हां सर्व माशा साधारणपणें सारख्याच वयोमर्यादेनंतर मरण पावल्या; परतु उष्णतामानांत फरक करतांच वयोमानांत पुढीलप्रमाणें फरक पडला:-
उष्णतामान सेंटिग्रेड | माशांचे अण्डोत्पत्तीपासून मृत्यूपर्यंतचें सरासरी वयोमान दिवस | |||
३०० | ... | ... | ... | २१.१५ |
२५० | ... | ... | ... | ३८.५ |
१५० | ... | ... | ... | १२३.९ |
१०० | ... | ... | ... | १७७.५ |
या आंकड्यांवरुन असे दिसतें कीं, रासायनिक प्रतिक्रियांच्या गतीवर उष्णतामानाचा ज्या प्रकारचा परिणाम होतो तशा प्रकारचाच उष्णतामानाचा परिणाम माशांच्या वयोमर्यादेवरहि होतो. दुर्दैवानें, आपलीं मानवशरीरें बरेंच कमी उष्णतामान झाल्यास जगूंच शकत नाहींत, हे खरें. तथापि अशा कमी उष्णतामानांतहि जगणें मनुष्यास शक्य झालें तरी तें आपलें जीवित आपणांस फार कंटाळवाणे व नीरस होईल; कारण बहुधा तशा स्थितींत सुख आणि दु:ख, आनंद आणि विषाद एतद्विषयक संवेदना फारच कमी अंशानें होऊं लागतील. जंतु विरहित माश्यांवर केलेल्या प्रयोगांनीं ही कल्पना साधार असल्याचें ठरलें कीं, जीविताची वयोमर्यादा शरीरांत चालू असलेल्या रासायनिक प्रतिकिया पूर्ण होण्यास लागणा-या काळाइतकी असते. या रासायनिक क्रिया म्हणजेच शरीरामध्यें अपायकारक द्रव्यांचा सांठा होणें, किंवा शरीराची तारुण्यावस्था असण्यास लागणा-या शरीरधातूंचाच हळूहळू नाश होणें, असा अर्थ असेल तर जिवंत राहण्याची जी क्रिया चालू असते तिचेच वार्धक्यविषयक दौर्बल्य व अखेरचा मृत्यु हे नैसर्गिक परिणाम होत, हे आपणांस सहज समजण्यासारखें आहे. तात्पर्य, जीवित म्हणजे दुसरें कांहीएक नसून रासायनिक प्रतिक्रियांची एक परंपरा होय; आणि सजीव सृष्टि ज्या भौतिक व रासायनिक शक्तींनीं नियंत्रित केलेली आहे, त्याच शक्तींनीं निर्जीव सृष्टिहि बद्ध आहे.