प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग
प्रकरण २ लें.
विश्वोत्पत्तीपासून असुरराष्ट्रसंस्थापनकालापर्यन्त.
जड द्रव्य, सौरसमुच्चय आणि पृथ्वी.- पृथ्वीवर मनुष्य प्राणी उत्पन्न होण्यापूर्वी देखील पृथ्वीचा इतिहास मोठा आहे. पृथ्वी उत्पन्न झाली कशी, ती आकाशांत परिभ्रमण करुं लागण्यापूर्वी ज्या साहित्याचें पर्यवसान पृथ्वी या विकासांत झालें तें साहित्य उर्फ जड माल कोणत्या स्थितींत होता, पृथ्वी आणि इतर ग्रह हे सौरसमुच्चयांतून बाहेर पडले काय, या त-हेचे प्रश्न विचारांचा विषय झाले आहेत. पृथ्वी आणि इतर ग्रह हे जर सौरसमुच्चयांतून बाहेर पडले असले तर सौरसमुच्चय दुस-या कोणत्या तरी ता-यापासून उत्पन्न झाला नसेल काय? असला तर हे तारकापुंज तयार होण्यापूर्वी त्यांची काय स्थिति होती? याविषयींचा अभ्यास ज्योति:शास्त्र आणि तद्विषयक पदार्थविज्ञानशास्त्रादि शास्त्रें यांमध्यें समाविष्ट होतो. विश्वांतील सर्व जड वस्तूंची म्हणजे कोट्यवधि खस्थ ज्योतींची उत्पत्ति कशी झाली, त्यांचा लय कसा काय होईल इत्यादि गोष्टींचा शास्त्रीय विचार हा विश्वोत्पत्तिशास्त्रविषयक अगर ज्योति:शास्त्र- विषयक होईल.
कांहीं जड सृष्टींतून तारकायुक्त सृष्टि उत्पन्न झाली असो अगर नसो पण जे अनेक तारे अगर ग्रह आकाशांत दिसतात त्यांचा एकमेकांशीं संबंध काय तो पहाणें, तारे किती आहेत त्यांची मोजदाद करणें हा तारकाविकासकालाच्या पुढच्या कालाचा अभ्यास होय. हा ज्योति:शास्त्राचा भाग होय.
या अभ्यासापुढचा अभ्यास म्हटला म्हणजे एखाद्या खस्थ गोलाचा विशेष अभ्यास करणें. या अभ्यासामध्यें पृथ्वीच्या घटनेचा आणि इतिहासाचा अभ्यास येतो. यासच भूस्तरशास्त्र उर्फ जिऑलजी म्हणतात.
या अभ्यासांमध्यें आपणांस असें दिसून येतें कीं, आज आपण पृथ्वीच्या जड वस्तूचाच अभ्यास करतांना आपणांस प्राचीन चैतन्याचाहि अभ्यास याबरोबरच करावा लागतो. पृथ्वीच्या तलाच्या खालीं अनेक लुप्त चैतन्यांचें अगर ह्यात चैतन्यांच्या पूर्वरुपांचें अस्तित्व आढळून येतें. त्यांच्या योगानें आपणांस प्राण्यांचा आणि वनस्पतींचा इतिहास लिहितां येतो. वनस्पतिशास्त्र व प्राणिशास्त्र स्वस्थ गोलावरील सचेतन सृष्टीचे अभ्यास होत.
मनुष्योद्भवापूर्वी ज्या क्रिया झाल्या आणि ज्या ज्योति:शास्त्र, भूस्तरशास्त्र, प्राणिशास्त्र व वनस्पतिशास्त्र यांचा विषय आहेत, त्या क्रिया आणि त्यांचा इतिहास एका नियमांत आणण्याचा प्रयत्न झाला आहे त्या नियमास विकासवाद म्हणतात.