प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग
प्रकरण २ रें.
विश्वोत्पत्तीपासून असुरराष्ट्रसंस्थापनकालापर्यन्त.
जीवोत्पत्तीपासून मानवविकासापर्यंत.- चैतन्याचा अभ्यास म्हणजे जीविशास्त्र उर्फ बायालजी होय. या शास्त्राचे प्राणिशास्त्र, वनस्पतिशास्त्र इ. प्रकारचे विभाग करण्यांत येतात.
प्राणिशास्त्र अशा त-हेनें प्राण्यांची मांडणी करुं शकतात कीं, एका प्राण्यापासून दुसरा प्राणी अगदीं थोडा फरकलेला, दुस-यापेक्षां तिसरा थोडा फरकलेला. याप्रमाणें प्राणिकोटींत एकत-हेची सोपानपरंपरा आहे, हें सिद्ध होईल. म्हणजे आजचे अनेक अतिविकसित प्राणी-उदाहरणार्थ मनुष्य, हत्ती, साप, देवमासा या सर्वांचें मूळ एकच होतें आणि त्या मूळापासून पावलेले हे निरनिराळे विकास आहेत.
प्राणिशास्त्रामध्यें सूक्ष्मापासून जे अनेक निरनिराळे सावयव विकास दिसतात त्यांच्या व सूक्ष्मांच्या मधल्या पाय-या कांही प्रचलित सृष्टींत आहेत आणि कांही गत सृष्टींत सांपडतात. भुस्तरशास्त्रांतर्गत प्राणिशास्त्र आणि वनस्पतिशास्त्र येथें कामास येतें.
विकासवादामध्यें जी कृति नेहमीं होत असते म्हणून गृहित धरलें आहे ती कृति म्हटली म्हणजे सदृशापासून विसदृश जगाची उत्पत्ति आणि निरवयव स्थितीपासून सावयव स्थितीची उत्पत्ति. याप्रकारची किया जीवद्रव्यावर होऊन एकमेकांपासून भिन्न आणि सावयव असे अधिकाधिक प्राणी निर्माण होत गेले. याच क्रियेने मनुष्यप्राणी विकास पावला असावा, असें समजतात. विकासवादाला जे मुख्य आधार समजले जातात ते येणेंप्रमाणें:-
(१) भू स्त र शा स्त्रां ती ल आ धा र - पृथ्वीच्या निरनिराळ्या काळाच्या दर्शक अशा थरांमध्यें निरनिराळ्या विकासाचे प्राणी सांपडतात. अगदीं प्राचीन थरांमध्यें अगदीं कमी विकसित प्राणी व वनस्पती सांपडतात. अधिक अर्वाचीन थरांमध्यें अधिक विकसित प्राणी सांपडतात. वगैरे.
(२) प्रा णि शा स्त्रां ती ल आ धा र - अस्तित्वांत असलेल्या प्राण्यांमध्यें कमी विकसितापासून अधिक विकसित अशी प्राण्यांची परंपरा लावतां येते.
(३) ग र्भ शा स्त्रां ती ल आ धा र- मनुष्याच्या गर्भामध्यें जो विकास दृष्टीस पडतो तो त्याच्या पूर्वीच्या पाय-या दर्शवितो. शास्त्रज्ञांची अशी समजूत आहे कीं. अधिक विकसित अशा प्राण्यांच्या भ्रूणोत्तर बनावटीमध्यें तो प्राणी ज्या पूर्वरुपांतून विकसित होत गेला त्या पूर्वरुपाच्या पाय-या दृष्टीस पडतात. म्हणजे मनुष्य आणि कुत्रा यांचे गर्भ अतिशय पूर्वावस्थेत सारखेच असतात, आणि एकाला क्रमानें कुत्रेपणा येतो आणि दुस-यास क्रमानें मनुष्यपणा येतो.
येथें हेंहि सांगितलें पाहिजे की, विकासवादाच्या सिद्धयर्थ गर्भशास्त्रांतील पुरावा म्हणून जो मांडण्यांत येतो तो ज्या समजुतीच्या आधारावर मांडण्यांत येतो त्या समजुतीवर शास्त्रज्ञांचा पूर्वीइतका विश्वास राहिला नाहीं.