प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग

प्रकरण २ रें.
विश्वोत्पत्तीपासून असुरराष्ट्रसंस्थापनकालापर्यन्त.

जातीचें सामाजिक स्थान व त्याचें ऐतिहासिक महत्त्व.- जेव्हां एखदा मोठा प्रदेश दोन निरनिराळया जातींनीं व्यापिला असेल आणि त्या दोन जातींपैकीं एक जात सामाजिक उच्चपदावर असेल तेव्हां अशी कल्पना करतां येईल की जेतृवर्ग उत्तरकालीन होय.

या प्रकारच्या विचारपद्धतीनें मानवी प्राण्याच्या संचारांचा इतिहास लिहितां येण्याजोगा आहे; परंतु या पकारचा इतिहास लिहिण्याचा अचाट परिश्रम अद्यापि कोणीं केला नाहीं. भूस्तरशास्त्रामध्यें देखील पृथ्वीचा साकल्यानें इतिहास अजून लिहिला गेला नाहीं. पुष्कळ ठिकाणचे भूस्तर अभ्यासिले गेले आहेत पण सर्व जगाच्या भूपृष्ठाचे साकल्यानें ऐतिहासिक वर्णन देणारा शास्त्रज्ञ अजून निघाला नाहीं. त्या प्रकारचा प्रयत्न मनुष्यप्राण्याच्या इतिहासास अत्यन्त अवश्य आहे. त्याशिवाय मनुष्यप्राण्याचे निरनिराळया थरांत सांपडणारे अवशेष आणि सध्यांचे विस्तरण यांची संगति लागणार नाही व यासाठीं मनुष्याच्या या मधल्या लाखों वर्षांच्या इतिहासाचा अभ्यास करण्यास आज आरंभ झाला आहे असें देखील म्हणतां येत नाहीं. प्राचीन मनुष्येतिहासाचें साहित्य येणेप्रमाणें.

(१)    पृथ्वीच्या अनेक थरांत सांपडणा-या मनुष्यांचे अवशेष, आणि त्यांची निरनिराळया काळच्या मनुष्यकल्प प्राण्याशीं तुलना.
(२)    भाषासाहित्य आणि त्यावरुन निघणारे मनुष्यभ्रमण विषयक सिध्दांत
(३)    मनुष्याच्या प्रयत्नामुळें भोंवतालच्या पाशवी आणि वानस्पत्य सृष्टीवर झालेले परिणाम.
(४)    मनुष्याचें आनुवंशिक स्वरुप.

यांपैकी पहिलें साहित्य म्हणजे मनुष्यप्राण्याचे अवशेष हें वस्तुविरहित क्वचित् सांपडतें. त्यांच्याभोवतीं कांही हत्यारें, ग्राम्य पशूंचे अवशेष वगैरे सांपडतात. आणि त्यांवरुन कांही माहिती उपलब्ध होते.

भाषेचें साहित्य दोन त-हांनी उपयोगी पडतें. एक तर अनेक भाषांच्या सादृश्यविसादृश्यावरुन व विकासावरुन मनुष्याचीं नातीगोतीं समजतात, आणि त्या भाषेंतील शब्दसंग्रहावरुन संस्कृतीविषयीं अजमास करता येतो.

मनुष्याचें आनुवंशिक स्वरुप त्याचा इतिहास ठरविण्यासाठीं कितीसें उपयोगांत आणावयाचें हा एक प्रश्न आहे.

शरीरलक्षणांवरुन मनुष्याचें वर्गीकरण पुष्कळदां करण्यांत येतें. हे वर्गीकरण तपासतांना नेहमीं हें लक्षांत ठेवलें पाहिजे कीं वर्गीकरण हें ध्येय नसून मनुष्याच्या वांशिक इतिहासाचें तें केवळ साधन आहे. शरीरलक्षणांचा जे लोक अभ्यास करतात त्यांची आपल्या साहित्याचा गौरव करुन भाषाशास्त्रास कमी महत्व द्यावें अशी बुद्धि होते. भाषाशास्त्रज्ञांची शरीरलक्षणांस महत्व कमी देण्याची बुद्धि होते. परंतु मानवेतिहासशास्त्रास दोहोंचीहि जरुर आहे.

मानवशास्त्रज्ञांमध्यें शरीरलक्षणशास्त्रज्ञांचें आणि भाषाशास्त्रज्ञांचें एकमेकांशीं तंटा करण्याचें काम नाहीं. इतिहास लिहितांना शरीराच्या ठेवणीपेक्षां भाषांनीं केलेली लोकव्याप्ति हीच जास्त उपयोगी होईल. भाषेनें विशेष लोकसमुच्चय व्यापावा याला कारणें दोन असणार. एक तर वांशिक कारण आणि दुसरें राजकीय कारण. भाषा दोन क्रियांचा बोध करील. ती विशिष्ट प्रदेशांतील लोक एका वंशांतील होते असें म्हणेंल किंवा एका राज्यछत्राखालीं होते असें दाखवील. म्हणजे ती वांशिक समुच्चय किंवा राजकीय समुच्चय पण कोणता तरी निश्चित समुच्चय दाखवील. तो समुच्चय कोणत्या काळाचा हें ठरविणें हें पुढील काम आहे. शरीरलक्षणें वांशिक समुच्चय फार तर दाखवितील, किंवा एकस्थानमूलकता म्हणजें एकपरिस्थितिपरिणाम दाखवितील.

इतिहासाचा मुख्य प्रश्न हा आहे कीं, कोणत्या काळांत आणि कोणत्या स्थळांत शरीरलक्षणदृष्टसमुच्चय बसवितां येतो हें पहाणें. भाषेच्या दृष्टीनें जे समुच्चय दिसतात त्यांचे देखील कालस्थलनियमन करणें अवश्य आहे. शरीरलक्षणें राजकीय समुच्चयाचीं घोतक नाहींत. या इतक्या गोष्टी पक्या लक्षांत ठेवल्या म्हणजे वंशविषयक इतिहासामधील गोंधळ बराचसा कमी होईल.