प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग
प्रकरण २ रें.
विश्वोत्पत्तीपासून असुरराष्ट्रसंस्थापनकालापर्यन्त.
एक महत्वाचा प्रश्न.- सजीव व निर्जीव सृष्टीमध्यें एक मोठा फरक असून तो शिरो टॅशिरो या शास्त्रज्ञानें आपल्या 'जीवाचें रासायनिक लक्षण' या नांवाच्या पुस्तकांत पुढें मांडला आहे. त्या पुस्तकांत ग्रंथकार म्हणतो, 'जिवंत राहण्याची जी प्रतिकिया चालू असते तिच्याबरोबर सर्वत्र काळी व प्रत्येक ठिकाणी एक रासायनिक स्थित्यन्तर घडून येत असतें. प्राणी, वनस्पति, वाळलेलीं बीजें, मज्जातंतू वगैरे सजीव सृष्टीला कोणत्याहि रीतीनें उत्तेजित केल्यास या सजीव पदार्थामधून कर्ब वायु एकदम बाहेर पडतो व हेंच सजीवतेचें रासायनिक लक्षण होय.
या प्रकारचें रासायनिक स्थित्यन्तर निर्जीव सृष्टीमध्यें कोठं चालू असल्याचें दाखविण्यांत आलें नाहीं. परंतु यासंबंधानें सुद्धां लवकरच ग्राहय असे स्पष्टीकरण पुढें आल्यावांचून राहणार नाहीं, अशी आशा वाटते. जोंपर्यंत भौतिक व रासायनिक शास्त्राच्या नियमांनी या गोष्टीचा उलगडा झाला नाहीं तोपर्यंत हें कोडें सुटलें नाहीं असेंच वाटत राहील; तथापि एकदां यासंबंधांतलें अज्ञानपटल दूर केलें गेलें. म्हणजे मग मात्र इतकें साधें कोडें आपणांस सोडवितां आलें नाहीं, याबदल आपणाला आश्चर्य वाटेल.
असो; याप्रमाणें सजीव व निर्जीव सृंष्टीमधील भेदरुपी भिंत नाहींशी करण्याचे प्रयत्न चालू असून त्यांना आतांपर्यत बरेंचसें यशहि आलेलें आहे. तथापि अद्याप हा प्रश्न पूर्णपणें सुटण्यास वाटेंत पुष्कळ अडचणी आहेत. शिवाय निर्जीवांतूनच सजीव सृष्टि उत्पन्न झाली व ती सर्व एकजातीय म्हणजे समान गुणधर्मानींच युक्त आहे, असें सिद्ध झालें तंरी पुढें 'आत्मा' म्हणजे काय आहे, हा अत्यंत अवघड प्रश्न शिल्लक राहतोच. सजीव व निर्जीव यामध्यें फार मोठा फरक आहे असें सकृद्दर्शनीं आपणांस वाटतें; पण वास्तविक अत्यंत साध्या स्वरुपाचा जीव व मनुष्यप्राणी यामध्येंच अत्यन्त मोठें अंतर आहे. म्हणून जीवशास्त्रांतील विकासतत्वानुसार साध्या एकपेशीमय किटकापासून पुढें अनंत प्राणिजाती निर्माण होत होत अखेर मनुष्यजातींतील न्यूटन, नेपोलियन, किंवा व्यास, विश्वामित्र झाले म्हणजे अत्यंत क्षुद्र कृमिकीटक व न्यूटननेपोलियनसारखे महापुरुष हे एकाच जातीचे जीव होत, असें कबूल करणें ज्यांना जड वाटत नाहीं, त्यांना तरी स्फटिकापासून साधा सेंद्रिय जीव उत्पन्न झालेला आहे असें मानण्यास अवघड जाण्याचें कारण नाहीं. निर्जीव व सजीव यामध्यें दिसत असलेला फरक दूर होण्याच्या मार्गाला लागलेला आहे आणि तो यथावकाश खास दूर होणार; आणि आजपर्यंत ज्यांना आपण अद्भुत किंवा कल्पित गोष्टी म्हणून मानीत होतों त्या सृष्टिनियमानुसारच सारच घडत आहेत, व सजीव आणि निर्जीव अशा एकंदर सर्व सृष्टींतील मूलभूत द्रव्य एकच आहे. आणि सर्वत्र विविधता दिसत असली तरी विश्वांतील सर्व पदार्थ मूळ एकजातीयच आहेत, असें सिद्ध होणार अशीं चिन्हें स्पष्ट दिसत आहेत.
प्रोफेसर सहस्त्रबुध्दे यांच्या वरील लेखाचा मथितार्थ असा कीं ज्या अर्थी सजीवाचे जीवत्व दाखविणारे गुणधर्म निर्जीवांतहि आढळतात, आणि ज्या अर्थी जे जीव शुक्रक्षेपामुळें उत्पन्न होतात त्यांची उत्पत्ति कृत्रिम उपायांनी करतां येते आणि ज्या अर्थी बाल्य, तारुण्य आणि वार्धक्य या अवस्था म्हणजे केवळ रासायनिक क्रियांची परंपरा आहेत, आणि ज्या अर्थी प्रस्तुत रासायनिक क्रिया कृत्रिम उपायांनी लौकर घडवून आणतां येतात किंवा त्या थांबवितां येतात त्या अर्थी जड आणि सचेतन यामध्यें अनुल्लंघनीय विरोध नाही.