प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण १९ वें.
यूरोपांतील लहान राष्ट्रांपासून मोठ्या राष्ट्रांचा व प्रांतिक भाषांचा विकास
जाती व राष्ट्रें.- उग्रियन शाखेच्या ओस्टियाक, वोगल व हंगेरियन अशा तीन उपशाखा आहेत; व या तीनहि उपशाखांमध्यें कमी अधीक उच्च प्रकारची संस्कृति दिसून येते.
ओस्टीयाक.- हे लोक, प्राचीन रानटी व्याध व कोळी या जातीचे आहेत. हल्लींची यांची वस्ती ओबीच्या तीरावर व टोबोलस्क प्रांतांत आहेत. प्राचीनकाळीं, युरलपर्वताच्या यूरोपीय मुलखांतील पर्म प्रांतांत ते हळूहळू पसरले. येनिसी शाखेचे ओस्टीयाक लोक हे फिनोउग्रिअन शाखेच्या लोकांपेक्षां निराळे आहेत. हे ओस्टियाक लोक अद्याप मूर्तिपूजक असून ओबीनदीची ते पूजा करतात.
वोगल.- यूरलच्या दोन्ही बाजूला आढळून येणारी व पूर्वीं वोलोग्डाच्या हद्दीपर्यंत पसरलेली, एक रानटी जात आहे. ओस्टीयाक व वोगल या लोकांच्या भाषा बहुतेक सारख्याच आहेत पण पश्चिम व पूर्व फिन्स लोकांच्या भाषेहून निराळ्या आहेत.
मग्यार अथवा हंगेरियन.- अशी एक दंतकथा आहे की निम्रॉडला ह्यूनियार आणि मग्यार नांवाचे दोन मुलगे होते. त्यांची लग्नें अँलन्स नांवाच्या राजाच्या मुलींशीं झालीं व हे दोन जवळ जवळ सारख्या राष्ट्राचे पूर्वज बनले. अर्थात बायबली उत्त्पत्ति तत्त्वज्ञानापेक्षां जास्त महत्त्व असल्या माहितीत देतां येत नाहीं. हूण व मग्यार, ह्या टर्की व फिनोउग्रियन गुणधर्मानें युक्त अशा मिश्र जाती होत्या असेंहि म्हणण्यास जागा आहे. यांची भाषा फिनोउग्रिअन आहे परंतु हंगेरियन या शब्दाची पूर्व पीठिका पाहूं लागल्यास अनउगर ह्या शब्दावरून तुर्की संबंध आढळून येतो व मग्यार व हूण या लोकांच्या लष्करी वृत्तीकडे पाहिल्यास हा संशय दृढ होतो. चीनच्या सरहद्दीजवळच्या लोकांत हिउंगनु असा एक प्रयोग आढळतो पण हल्लीं आतां विद्वानांनीं असें ठरविलें आहे कीं, हल्लीच्या हंगेरियन लोकांच्या पूर्वजांच्या जाती, काकेशसच्या उत्तरेकडील टेरेक क्यूबन प्रदेशांत बनल्या असून तेथें उग्रिअन व तुर्की रक्ताचें मिश्रण बनून, उग्रिअन लोकांची भाषा व तुर्कीं आचारविचार या मिश्रणांत राहिले. शिवाय इराणी व काकेशसच्या जवळ असलेल्या अनेक जातींचा यांच्यावर परिणाम झाल्यावांचून राहिला नाहीं. हूण व मग्यार हे पश्चिमेकडे हळू हळू सरकत चालले. पण हूण लोकांनीं ५ व्या शतकांत यूरोपवर स्वारी करून पुष्कळ देश जिंकला असून सुद्धां त्यांनीं कायमची वस्ती कोठेंहि केली नाहीं. पण मग्यार लोक मात्र डॉनच्या तीरापाशीं कित्येक शतकेंपर्यंत राहिले. अशी दंतकथा सांगतात कीं रानटी जातीच्या त्रासामुळें त्यांनां लेबेडिया प्रांत सोडावा लागला व सात ड्यूकांच्या नेतृत्वाखालीं ते पश्चिमेकडे सरकले. इ. स. ८८४-९५ या अवधींत त्यांनीं हंगेरी हा प्रांत जिंकला, व या जिंकलेल्या पहिल्या मुलखांचा राजा 'अर्पाद' या नांवांनें संबोधला गेला. अकराव्या शतकांत मग्यार लोक ख्रिस्ती धर्माचे व रोमन चर्चचे अनुयायी झाले. त्यांनीं, आपली पूर्वींची शरीररचना जवळ जवळ लुप्त करून टाकली आहे. पण त्यांनीं आपली भाषा कायम ठेवली आहे; शिवाय त्यांच्यामध्यें, पूर्वींच्या ज्या घोड्यावर बसण्याचा शोक वगैरे संवई होत्या, त्या अद्याप दृष्टीस पडतात.