प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण १९ वें.
यूरोपांतील लहान राष्ट्रांपासून मोठ्या राष्ट्रांचा व प्रांतिक भाषांचा विकास

जाती व राष्ट्रें.- उग्रियन शाखेच्या ओस्टियाक, वोगल व हंगेरियन अशा तीन उपशाखा आहेत; व या तीनहि उपशाखांमध्यें कमी अधीक उच्च प्रकारची संस्कृति दिसून येते.

ओस्टीयाक.- हे लोक, प्राचीन रानटी व्याध व कोळी या जातीचे आहेत. हल्लींची यांची वस्ती ओबीच्या तीरावर व टोबोलस्क प्रांतांत आहेत. प्राचीनकाळीं, युरलपर्वताच्या यूरोपीय मुलखांतील पर्म प्रांतांत ते हळूहळू पसरले. येनिसी शाखेचे ओस्टीयाक लोक हे फिनोउग्रिअन शाखेच्या लोकांपेक्षां निराळे आहेत. हे ओस्टियाक लोक अद्याप मूर्तिपूजक असून ओबीनदीची ते पूजा करतात.

वोगल.- यूरलच्या दोन्ही बाजूला आढळून येणारी व पूर्वीं वोलोग्डाच्या हद्दीपर्यंत पसरलेली, एक रानटी जात आहे. ओस्टीयाक व वोगल या लोकांच्या भाषा बहुतेक सारख्याच आहेत पण पश्चिम व पूर्व फिन्स लोकांच्या भाषेहून निराळ्या आहेत.

मग्यार अथवा हंगेरियन.- अशी एक दंतकथा आहे की निम्रॉडला ह्यूनियार आणि मग्यार नांवाचे दोन मुलगे होते. त्यांची लग्नें अँलन्स नांवाच्या राजाच्या मुलींशीं झालीं व हे दोन जवळ जवळ सारख्या राष्ट्राचे पूर्वज बनले. अर्थात बायबली उत्त्पत्ति तत्त्वज्ञानापेक्षां जास्त महत्त्व असल्या माहितीत देतां येत नाहीं. हूण व मग्यार, ह्या टर्की व फिनोउग्रियन गुणधर्मानें युक्त अशा मिश्र जाती होत्या असेंहि म्हणण्यास जागा आहे. यांची भाषा फिनोउग्रिअन आहे परंतु हंगेरियन या शब्दाची पूर्व पीठिका पाहूं लागल्यास अनउगर ह्या शब्दावरून तुर्की संबंध आढळून येतो व मग्यार व हूण या लोकांच्या लष्करी वृत्तीकडे पाहिल्यास हा संशय दृढ होतो. चीनच्या सरहद्दीजवळच्या लोकांत हिउंगनु असा एक प्रयोग आढळतो पण हल्लीं आतां विद्वानांनीं असें ठरविलें आहे कीं, हल्लीच्या हंगेरियन लोकांच्या पूर्वजांच्या जाती, काकेशसच्या उत्तरेकडील टेरेक क्यूबन प्रदेशांत बनल्या असून तेथें उग्रिअन व तुर्की रक्ताचें मिश्रण बनून, उग्रिअन लोकांची भाषा व तुर्कीं आचारविचार या मिश्रणांत राहिले. शिवाय इराणी व काकेशसच्या जवळ असलेल्या अनेक जातींचा यांच्यावर परिणाम झाल्यावांचून राहिला नाहीं. हूण व मग्यार हे पश्चिमेकडे हळू हळू सरकत चालले. पण हूण लोकांनीं ५ व्या शतकांत यूरोपवर स्वारी करून पुष्कळ देश जिंकला असून सुद्धां त्यांनीं कायमची वस्ती कोठेंहि केली नाहीं. पण मग्यार लोक मात्र डॉनच्या तीरापाशीं कित्येक शतकेंपर्यंत राहिले. अशी दंतकथा सांगतात कीं रानटी जातीच्या त्रासामुळें त्यांनां लेबेडिया प्रांत सोडावा लागला व सात ड्यूकांच्या नेतृत्वाखालीं ते पश्चिमेकडे सरकले. इ. स. ८८४-९५ या अवधींत त्यांनीं हंगेरी हा प्रांत जिंकला, व या जिंकलेल्या पहिल्या मुलखांचा राजा 'अर्पाद' या नांवांनें संबोधला गेला. अकराव्या शतकांत मग्यार लोक ख्रिस्ती धर्माचे व रोमन चर्चचे अनुयायी झाले. त्यांनीं, आपली पूर्वींची शरीररचना जवळ जवळ लुप्त करून टाकली आहे. पण त्यांनीं आपली भाषा कायम ठेवली आहे; शिवाय त्यांच्यामध्यें, पूर्वींच्या ज्या घोड्यावर बसण्याचा शोक वगैरे संवई होत्या, त्या अद्याप दृष्टीस पडतात.

  खालील प्रमाणें फिनीश लोकांच्या जाती आहेत.

पर्मियन व सीर्येनियन.- या लोकांची एकच जात मानतां येईल. या दोन्हीहि जाती आपल्यास 'कोमी' म्हणवून घेतात. व व्होटियाक लोकांच्या सारखीच भाषा बोलतात. ह्या जाती विशषतः पर्म, व्होलोग्डा व आर्चेंजल या प्रांतांत आढळून येतात; परंतु उरल पर्वताच्या सायबेरियाकडील बाजूला ते विशेषसे आढळून येत नाहींत. सीर्येनियन लोकांची मुख्य वस्ती पेचोरा वरील इष्मा या शहरांत आहे; व वरच्या कामा नदीच्या उजव्या तीरावरील रहिवाशांनां पर्मिअन हें नांव आहे. प्राचीन कालीं या दोन्हीहि जाती पश्चिमेकडे पुष्कळशा सरकल्या असें दिसतें. फिनीश लोकांच्या इतर जातीपेक्षां सीर्येनिअन लोक, बुद्धिमान् व उत्साही असून व्यापारासाठीं पुष्कळ ठिकाणीं प्रवास करतात. हे लोक बहुधा संकरवर्णाचे आहेत.

व्होटियाक.- व्हियाटकाच्या प्रांताच्या आग्नेय दिशकडे मुख्यतः वस्ती करणा-या सुमारे अडीच लक्ष लोकसंख्येचा व्होटियाक ही एक जात आहे. त्यांच्या भाषेकडे पाहिले असतां तार्तर व च्यूव्हशेस लोकांस पुष्कळच शब्द यांना उचलले आहेत असे दिसते. ते मानसाक अगर शारीरिक दृष्ट्या अशक्त असून त्यांचा स्वतःचा असा विशेष गुणधर्म दिसत नाही. ते स्वतःआपल्याला उर्टमुर्ट म्हणवून घेतात. सोळाव्या शतकाच्या सुमारास रशियाच्या हल्ल्यामुळे यांपैकीं कांहीं लोक युफाच्या राज्यांत आले आणि तो देश फार सुपीक असल्याकारणानें तेथें त्यांच्या शरीरांत चांगली सुधारणा झाली.

चेरेमिशियन.- हे स्वतःला मारी म्हणवून घेतात. हे काझानच्या शेजारी व्होल्गाच्या तीरावर रहातात. व्होल्गाच्या दक्षिण तीरावर रहाणारे लोक फार सशक्त असतात. शहरांच्या नांवावरून पहातां मॉर्डव्हिन लोकांनीं उत्तरेकडे व पुन्हा रशियाने लोकांनीं दक्षिणेकडे हांकल्यामूळे त्यांनीं हल्लींचीं जागा स्वीकारली आहे असे दिसते. त्यांच्या भाषेत व शरीराच्या ठेवणींत थोडें वैषम्य दिसते. त्यांच्या भाषेत व मॉर्डव्हिनिअन आणि पार्मिअन जातीच्या भाषेत साम्य आहे. ते सरळ व प्रामाणिक आहेत पण चलाख व बुद्धिमान नाहींत.

मार्डव्हिनिअन.- हे लोक मध्यव्होलगालगतच्या प्रांतांत विशेषतः निझनी, नोव्हगोरड, काझान, पेझा, टांबोव्ह, सिंबर्स्क, युफा, आणि ओरेबर्ग येथे पसरलेले आहेत. यांचे मुलूख तुटक पसरलेले असले तरी त्यांचा विस्तार फार मोठा आहे. पूर्वेकडील फिन्स लोकांत हेच प्रमुख आहेत व त्यांच्या एका दंतकथेंत त्यांची पूर्वीं एक राजधानी असून त्यांचा राजा तार्तार लोकांशी लढला असें लिहिलें आहे. सहाव्या शतकांत त्यांनां मॉर्डन असे संबोधण्यांत येत होते. परंतु हल्लीं तें आपल्याला मोक्षा अथवा इर्शा म्हणवून घेतात. त्यांचा मुलुख खूप जंगलमय आहे. त्यांची भाषां कांहीं अंशीं चेरेमिसिअन लोकांच्या भाषेशीं तर कांहीं अंशी फिनिश लोकांच्या भाषेशीं सादृश्य  दाखवले. तरी पण तिचे स्वतःचे कांहीं विशेष गुण आहेतच.

 लॅप.- हे नॉर्वे, स्वीडन, आणि फिनलंडमध्यें आढळून येतात. यूरोपमधील ते अत्यंत खुजे लोक आहेत. त्यांच्यातील पुष्कळ लोक रानटी असून रेनडिअर नांवाच्या हरणांचे कळप बाळगतात व डोंगरांत राहतात. परंतु कांहीं लोक व्याधाचा अथवा कोळ्याचा धंदा करतात. प्राचीन काळापासूनच हे लोक चेटुक करण्याबद्दल प्रसिद्ध आहेत.

एस्थोनियन.- हे लोक एस्थोनिया नावांच्या रशियाच्या प्रांतातील शेतकरी आहेत. १८१७ पर्यंत ते गुलाम होते. पण त्यानंतर त्यांची गुलामगिरींतून सुटका झाली. फिन्स लोकांची हे शाखा आहेत. परकी लोकांना एस्ट या नांवानें ते माहीत आहेत. परंतु हें नांव वास्तवीक पाहतां दुस-या जातीचे आहे. ते स्वतःला मामेस (अनागर लोक) असे म्हणवून घेतात व आपल्या देशाला रवामा अथवा विरोमा असे म्हणतात त्यांच्या आसपास असणा-या रशियन व जर्मन लोकांशी संबंध आल्यामुळें ते जास्त सुधारलेले आहेत.

लिव्होनियन:- पश्चिम लिव्होनिया आणि उत्तर कुर्लंडच्या प्राचीन फिनेश भाषा बोलणा-या जातीचे हे लोक असावेत असा तर्क आहे. हल्लींच्या काळी लेट लोकांत ते फार मिळून गेले आहेत व त्यांची भाषा कुर्लंडच्या आसपास दृष्टीस पडते. त्या भाषेचे लिव्होनियन हें नांव असून तिचें एस्थोनियन भाषेशी साम्य आहे.

व्होट.- हे दक्षिण चूड आणि वज्जलाइसेट या नांवानें हि प्रसिद्ध आहेत. सेट पीटर्सबर्गच्या आसपासच्या ईग्रियाचे मुलुखांतील रहिवाशी असावेत; परंतु उत्तरेकडून कॅरेलियन व रशियन लोकांच्या झालेल्या हल्ल्यामुळें ते कमी झाले. ११ व्या शतकांत त्यांचा उल्लेख आढळतो व हल्ली त्यांची वस्ती इंग्रियाच्या ईशान्येला आहे.

व्हेप्स:- यांनां उत्तरवासीय चूड असेहि म्हणतात. ह्यांचे व एस्थोनियन लोकांचे साम्य आहे. व्होट लोकांपेक्षां हे लोक संख्येने जास्ती आहेत. ते तिखव्हिनस्क प्रदेशांत व ओल्ड नोव्हगोरोड प्रांतांत आढळून येतात. ते प्राचीन काळीं व्होलोग्डा प्रांतांत पसरलेले दिसतात. भाषाशास्त्राच्या दृष्टीने व्होट व व्हेप्स यांचे एस्थोनियनशीं फार साम्य आहे.

फिन:- हे लोक या सर्व शाखेमध्यें वरिष्ठ आहेत. ते हल्लीं फिनलंडच्या परगण्यांत व त्याच्या आसपासच्या ओलोनेटझ, व्हर, सेन्टपाटर्सबर्ग या प्रांतांत आढळून येतात. प्राचीन काळीं कैनुलायझेट नांवाची त्यांची उपशाखा स्वीडनमध्यें आढळून आली होती. व यामुळें स्वीस लोक यांनां व्हन असें म्हणत व हल्लीं या लोकांचे मुख्यतः दोन वर्ग आहेत. फिनलंड परगण्याच्या दक्षिण व पश्चिम भागांत रहाणारे टाव्हास्टलॅडर अगर हॅमॅलायसेट व पूर्वेकडे व उत्तरेकडे आढळणारे कॅरेलियन अथवा कर्जालायसेट हे होत.

या परगण्यांतील दोन्ही प्रकारचे पण विशेषतः हॅमॅलायसेट लोकांवर स्वीडिश लोकांच्या चालीरितीचा परिणाम फार झाला आहे. स्वीडिश रक्त यांच्यामध्यें मिसळलेलें आहे. भाषेंत स्वीडिश शब्द फार आहेत. सार्वत्रिक ख्रिस्ती धर्म प्रस्तृत आहे. शहरांतील आणि वरच्या दर्जाचे लोक आचार विचारांत मुख्यतः स्वीडिश लोकांप्रमाणेच आहेत. हल्लीं या सर्व लोकांनां रशियन आचार विचारांचा परिचय करून देण्याचा व ह्या विचारांचे बनवण्याचा प्रयत्न चालला आहे. फिन लोकांचे तत्सदृश जातींशी जरी गुणधर्माच्या बाबतींत फार साम्य असलें तरी एकंदरींत ते फार बुद्धिमान व सुधारलेले आहेत. त्यांच्यामधील काव्यांचा व गोष्टींचा संग्रह करण्यांत आला आहे. त्यांत १८३५ मध्यें रचलेले लोन्राटचे काव्य 'कालेवाला' हे फार प्रसिद्ध आहे. राष्ट्रभाषांचा अभ्यास हेल्सिंगफोर्स येथे चालू झाला आहे. अनेक संस्था स्थापन झाल्या आहेत व अनेक शोध लावलेले आहेत. फिनिश लोकांनीं ही शास्त्रविषयक चळवळ मोठ्या नेटानें चालविली आहे तरी यांत देखील स्वीडिश वाङ्मयाचें वर्चस्व दिसून येतें. या मुख्य भाषेशिवाय त्यांची दुसरी महत्त्वाची भाषा म्हणजे सॅव्हॉलॅक्सची भाषा होय.

कॅरेलियन:- हे लोक जरी फिन लोकांपेक्षां निराळे आहेत तरी त्यांनां फिनमध्यें गणण्यांत येते. त्यांच्यावर स्वीडिश लोकांपेक्षां रशियन लोकांच्या आचारविचारांचा परिणाम फार झाला आहे. परंतु ते ज्या भागांत रहातात त्यांतील बराच भाग मागासलेला असल्यामुळे यूरोपियन सुधारणेचा त्यांनां फारसा संसर्ग झाला नाहीं. हे फिन लोकांपेक्षां दांडगे, धाडसी, विनोदी पण किंचित हट्टी लोक आहेत. त्यांची एकंदर लोकसंख्या २,६०,००० असून त्यांपैकीं ६३,००० ओलोनेटझ व १,९५,००० व्हर आणि नोव्होगोराडमध्यें आहेत. ते रशियन चर्चचे अनुयायी आहेत. फिन हे प्राटेस्टंट आहेत. तसेंच कॅरेलियन लोक कॅलूगा, यरूस्लाव्ल्हल, व्हलॅडिमिर, व्होलोग्डा आणि टांबोव्ह येथें असल्याचा पुरावा सापडला आहे.

सामोइड.- या लोकांचा फिनोउग्रियन जातींत समावेश करून घ्यावा किंवा न घ्यावा याबद्दल वादविवाद चालू आहे. युरलच्या दोन्ही बाजूला असणा-या व्हाईट आणि कारा समुद्राच्या हद्दीवर असणा-या निर्वृक्ष जंगलांत हरणांच्या कळपानिशी फिरणारे हे रानटी लोक आहेत. संस्कृतींत व आचारांत त्यांचें व फिनो उग्रियन लोकांचें साम्य आहे; व यासाठीं त्यांचा यांतच समावेश केला आहे.

याशिवाय अनेक जातींचा यांत समावेश करण्यांत यावा असा वाद आहे पण त्यांपैकीं पुष्कळ जाती निर्मूळ झाल्या असल्यामुळें आणि कांहींनीं आपल्या भाषा बदलल्यामुळें थोडेंसें कठिण काम झालेलें आहे.

बल्गेरियावर स्वारी करण्यापूर्वीं व्होल्गानदीवर वसती करणारे मूळचे बल्गोरियन लोक जवळ जवळ मग्यार लोकांप्रमाणेंच होते असें दिसतें. मध्ययुगामध्यें, दक्षिण रशियामध्यें व कास्पियन समुद्रावर रहाणारे स्वाझार हे फिनो उग्रियन होते की तुर्क होते याबद्दलचा वाद चालला आहे. हीच स्थिति अव्हार व पेचेनेग लोकांसंबंधींहि आहे. लष्करी संघ जातीसंकर वगैरे मध्यएशियामध्यें वारंवार होत असल्यानें नेहमीं भाषेमध्यें बदल होतो व त्यामुळें भाषा निश्चित नसते.

हल्लींचे तार्तर भाषा बोलणारे बष्कीर, मेशेचेर, आणि टेप्टर हे मूळचे फिन लोक असावेत असा तर्क आहे. व तीच स्थिति चुव्हाशेंच्या बाबतींत आहे. सायोट नांवाची अप्रसिद्ध जात देखील मूळवी फिनो उग्रियन वर्गाची असावी.

चूड हें नांव वास्तविक व्हेप्सर अगर व्होट लोकांनां लावलें पाहिजे. आज हा शब्द सर्व फिनोउग्रियन जातीला लावण्यांत येतो. कांहीं रशियन प्राच्य संशोधक, ह्या नांवाचा पर्मिअन शाखेला लावण्यांत उपयोग करतात.

याप्रमाणें सध्यांच्या यूरोपीय लोकसमजाचे घटक आहेत. आतां आपण यूरोपीय इतिहासाचें कथासूत्र पुढें चालवुं.