प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण १९ वें.
यूरोपांतील लहान राष्ट्रांपासून मोठ्या राष्ट्रांचा व प्रांतिक भाषांचा विकास

ग्रीसमधील लोक.- ग्रीसमध्यें मुख्यत्वेंकरून तीन जातींची वस्ती आहे. त्या जाती ग्रीक, अल्बेनियन व व्लाच या होत. ग्रीक जात ब-याच जातींच्या मिश्रणानें बनलेली आहे. ही जात मूळ कोणत्या वंशापासून निघाली याबद्दल पंडितांमध्यें: बराच वादविवाद झालेला आहे. तथापि हे लोक आपण प्राचीन होमरच्या युगांतील ग्रीक लोकांचे वंशज आहों असा अभिमान बाळगतात. परंतु फायलमेरेयर नांवाच्या ग्रंथकारानें असें प्रतिपादन केलें आहे कीं, ८ व्या शतकांत जी स्लाव्ह लोकांची धाड या देशांत आली तिनें मूळच्या ग्रीक लोकांपैकीं जे थोडेफार त्या वेळीं शिल्लक राहिले होते त्यांस जवळ जवळ पूर्णपणें आत्मसात् केले. म्हणजे सध्यांचे ग्रीक हे बायझंटाइन संस्कृतीचे स्लाव्ह लोक होत. या देशांतील पुष्कळ स्थळांत स्लाव्ह भाषेंतील नांवें आहेत. व मोरियामध्यें १५ व्या शतकापर्यंत एक स्लाव्ह भाषेचीच पोटभाषा चालत होती या गोष्टीवरून वरील अनुमानास बळकटी येते. तथापि ग्रीक संस्कृतीचा परिणाम या देशांत अबाधित राहिला असला पाहिजे व तसा व तो दिसतो; या वरून तसा परिणाम घडवून आणण्यास त्यांची संख्याहि बरीच असली पाहिजे. गॉथ लोकांनीं ख्रि. श. २६७ व ३९५ मध्यें ज्या स्वा-या केल्या त्यांचा मानववंशशास्त्रदृष्ट्या फारसा परिणाम झालेला दिसत नाहीं. त्याप्रमाणें यूरोपीय मध्ययुगांत फ्रँक, व्हेनिशिअन, तुर्क इत्यादि लोकांच्या स्वा-यांचेहि विशेषसे परिणाम दिसत नाहींत. यावरून ग्रीस मधील बायझंटाइन साम्राज्याच्या आरंभींच्या दिवसांत जी लोकवस्ती होती तिचेच वंशज मुख्यतः सध्यांचे ग्रीक असावेत असें कांहीचें म्हणणें आहे. परंतु ग्रीसमध्यें प्राचीनकालापासून असलेल्या निरनिराळ्या राष्ट्रकांतील अन्तःकलहामुळें इराणी लोकांस शौर्यानें तोंड देणारे जुने ग्रीक लोक रोमन सत्तेच्या प्रारंभींच बहुतेक नष्टप्राय झालेलें होते. स्पार्टन लोकांनीं फ्लॅटिअन्सचा नाश केला, अथीनिअन लोकांनीं मेलिअन्स लोकांस पिलापोनिशन युद्धांत नामशेष केलें, त्या युद्धानंतर अथेन्समध्यें अनेमू लोकांस कायदेबाह्य करून ठार करण्यांत आलें, लोकपक्षानें कॉर्सिरिअन सत्ताधिका-यांस नाहींसें केलें, अलेक्झांडरनें थीबन लोकांची कत्तल केली, ममिअसनें कॉरिथिअन लोकांस कंठस्नान घातलें याप्रमाणें ग्रीक शहरांतील प्रजेवर अनेक प्रसंग गुजरले. अर्थात् वेळोवेळीं गुलाम, शत्रुपक्षाचे लोक, त्यांचे वंशज वगैरेंची लोकसंख्येंत भर पडत गेली. गुलामांपैकीं बरेचसे लोक ग्रीकच असत. कारण एखादें शहर पडलें म्हणजे त्यांतील तरूणांची कत्तल केली जात असें व बायकापोरांस गुलाम म्हणून विकीत. प्राचीन कालीं खुद्द आटिका प्रांतांत एकंदर लोकसंख्येपैकीं चारपंचमांश लोक गुलाम होते व बाकीच्या लोकांपैकीं निम्मे परकीय लोक होते. रोमन सत्तेच्या कालात तर गुलामांची संख्या अतोनात वाढली त्यामुळें शेतकरी वर्ग जवळ जवळ नाहींसा झाला, जे स्वतंत्र ग्रीक होते ते शहरांत राहूं लागले व सर्व शेती गुलामांकडून करून घेऊं लागले. प्लुटार्कनें लिहिलें आहे कीं, ख्रिस्ती शकाच्या पहिल्या शतकांत ग्रीसमध्यें ३,००० सैनिक (होपलाइट) जमा करितां येईनात. प्राचीन ग्रीक वंशाचे नमुने आतां फक्त आर्केडिया, एजिअन बेटें व क्रीट बेटांत आढळतात.

आल्बेनियन लोकांची वस्ती मुख्यतः आटिका, मेगारिस, बिओशिया, लोक्रिस, यूबिया व अँड्रॉस या प्रांतांत व सालामीस, हैड्रा, स्पेत्सी, पोरोस व एजिनाचा कांहीं भाग इतक्यांत आढळते. हे आपणांस श्क्यीपेतर म्हणवितात व ग्रीक लोक त्यांस अर्बनिताइ असें म्हणतात. हे टोस्क वंशाचे आहेत. हे या प्रांतांत १४ व्या शतकांत आले. यांच्या प्रसारास तुर्कांनीं प्रतिबंध केला. हे आपलीच भाषा बोलतात व त्यांच्या चालीरीतीहि भिन्न आहेत. यांनीं स्वातंत्र्याच्या युद्धांत फार महत्वाची कामगिरी बजावली.

व्लाच लोक आपणांस अरोमनि (रोमन) म्हणवितात. यांची वस्ती पिंडस, थेसलीचा डोंगराळ प्रांत, ओथ्रिस, ओएटा, बिओशियाचे डोंगर, इटोलिया, अकरनॅनिया वगैरे प्रांतांत आहे. हे पशुपालन व माल नेण्याआणण्याचा धंदा करितात. हे मूळचे या प्रांतांतील लोक असून त्यांनीं रोमन सत्तेच्या कालात त्यांची संस्कृति स्वीकारली व पुढें रानटी लोकांच्या व स्लाव्ह लोकांच्या टोळ्या येऊं लागल्या तेव्हां ते डोंगरांत पळून गेले. याचे पूर्वीं मोठा व लहान वालाचिया असे दोन प्रांत होते. यांच्यापैकीं शहरात राहणा-या लोकांनीं ग्रीक राहणी उचलली आहे व ते व्यापारांत तरबेज असतात. परंतु डोंगरांत राहणा-या जाती अजून परिभ्रमणवृत्तीनें राहतात. व त्यांनीं आपली लॅटिन भाषा व आपल्या चालीरीती वगैरे कायम ठेवल्या आहेत.