प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण १९ वें.
यूरोपांतील लहान राष्ट्रांपासून मोठ्या राष्ट्रांचा व प्रांतिक भाषांचा विकास

कास्टिलिअन.- मध्य स्पेन सर्व आणि सोळाव्या शतकापासून स्पॅनिअर्ड लोकांनीं आशिया व अमेरिकाखंडात वसाहती केलेला मुलुख यांजमध्यें ही भाषा चालते. स्पेनचें जे सामान्य लोकांचें अथवा अनागार लॅटिन त्याची एक शाखा कास्टिलिअन व दुसरी पोर्तुगीज-गॅलिशिअन हिस्पनिक रोममधून या दोन भाषा निघाल्या व तिसरी कॅशान ही गॅलोरोमनमधून निघाली. इटालिअन जितकी लॅटिनच्या जवळ आहे तितकीच कास्टिलिअनहि कांहीं बाबतींत लॅटिनच्या जवळ आहे. इतर बाबतींत ती प्राव्हेन्शल भाषेइतकी दूर गेलेली आहे हिच्या पोटभाषा अस्तुरिअन, नव्हारीज - अँरागोनीज, अँडालुशिअन, लिओनीज या आहेत.