प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण १९ वें.
यूरोपांतील लहान राष्ट्रांपासून मोठ्या राष्ट्रांचा व प्रांतिक भाषांचा विकास
इंग्लिश भाषा.- इंग्लिश भाषा ब्रिटनची मूळ भाषा नव्हे. रोमन लोकांनीं ब्रिटन जिंकलें त्या वेळीं मूळचे लोक ज्या भाषा बोलत होते त्या सर्व इंडोयूरोपियन अथवा इंडोजर्मन भाषावंशापैकीं केल्टिक कुलांतल्या होत्या. वेल्स, आयर्लंड स्कॉटिश हायलंड्स, आईल ऑफ मॅन, ब्रिंडिसि या ठिकाणीं सदरील जुन्या भाषा आधुनिक रूपांत अद्यापि कोठें कोठें चालू आहेत. ब्रिथॉनिक पोटभाषा वेल्श व कॉर्निश भाषाशीं संबद्ध असून ब्रिटनच्या अर्ध्याअधिक भागांत फोर्थ व क्लाइडपावेतों याच पोटभाषा बोलत. त्यांच्या पलीकडे व आयर्लंड व मॅनबेटामध्यें गोइडोलिक पोट भाषा बोलत. या दुस-या भाषांचे आयरिश व स्कॉटिश गॅलिकशीं नातें आहे.
इ. स. ४३-४०९ या मुदतींत रोमन लोकांचा ब्रिटनवर ताबा होता या कारणानें लॅटिनचा ब्रिटनमध्यें प्रचार झाला. ब्रिटनचा भाषाविषयक इतिहास गॉल स्पेन यांजसारखाच व्हावयाचा, पण ५ व्या व ६ व्या शतकांत ट्यूटन लोकांनीं ब्रिटनवर स्वा-या करून ताबा मिळविल्यानें निराळा प्रकार घडून आला. आंग्ल, सॅक्सन व त्यांचे स्नेही ट्यूटॉनिक कुळांतले होते. इंडोजर्मनिक (इंडोयूरोपियन) भाषावंशांतील ट्यूटॉनिक अथवा जर्मनिक कुळांपैकीं एक भाषा वरील लोक बोलत होते. हॉलंड, जर्मनी, डेन्मार्क, स्कँडिनेव्हियन द्विपकल्प आइसलंड व इंग्लंड आणि इंग्लंडच्या वसाहती या सर्व ठिकाणीं आज जी भाषा व जी लोकवस्ती आहे ती एकाच प्रकारची व जातीची आहे, म्हणजे या सर्व ठिकाणची भाषा ट्यूटन कुळापैकीं व लोकांची जात ट्यूटन आहे.
इंडोयूरोपियन भाषा बोलणारे लोक म्हणजे आर्यन लोक. यांचे मूलस्थान यूरोपांतच असावें असा एक पक्ष अलीकडे निघाला आहे. ट्यूटन लोक हे आर्यन लोकांपैकीं असून आंग्ल व सॅक्सन हे ट्यूटन अथवा जर्मानिक होते. ट्यूटन लोक कांहीं दिवस एकत्र राहून नंतर पांगले. त्यांच्या भाषेचे त्यांच्या पांगापांगीमुळें अनेक प्रकार झाले. या प्रकारांचे मोठे तीन वर्ग पडतात. हे वर्ग चवथ्या शतकांतच अस्तित्वांत आलेले दिसतात नॉर्थ जर्मानिक किंवा स्कँडिनेव्हियन, वेस्ट जर्मानिक अथवा लो आणि हाय जर्मन व ईस्ट जर्मानिक हे ते तीनवर्ग होत.
ऐतिहासिक कालाच्या आरंभी -हाइन नदीच्या आणि वेसर नदीच्या मुखाकडच्या भागांत व मुखाच्या आसपास तसेंच शेजारच्या बेटांत इंग्रजांचे पूर्वज जे आंग्ल व सॅक्सन लोक ते राहत असत. बीडनें केंट व आइल ऑफ वाइट येथें जूट (नीटा ईटा) लोक वस्ती करून राहिले असें लिहिलें आहे. हें जूट लोक पूर्वीं कोठें होते हे सांगतां येत नाहीं. जटलंडमध्यें ते होते हे म्हणणें साधार नाहीं. भाषेच्या दृष्टीनें पाहतां ते आंग्ल व ओल्ड सॅक्सन यांच्या मध्यें राहत असावे असें वाटतें.
ब्रिटनवर जे जर्मानिक लोक चढाई करून आले व ज्यांनीं ब्रिटन जिंकून तेथें राज्य स्थापलें. त्यांच्या भाषेचे अगदीं जुने नमुने घेतले तर त्यांत तीन स्पष्टपणें निराळे भाषावर्ग पडतात. ते येणें प्रमाणें:-
- नॉर्दंब्रिअन = उत्तरभाषा | |
१ अग्लिअन | - मर्सियन = मध्यांशभाषा |
२ सॅक्सन (= वेस्ट सॅक्सन) | दक्षिण भाषा |
३ केंटिश |
बीडनें ज्या तीन जाती आंग्ल, सॅक्सन व गीट ब्रिटनमध्यें राहत होत्या म्हणून लिहिलें आहे त्या जातींच्या ह्या तीन भाषा असाव्या असें मानण्यास पुष्कळ जागा आहे. व या जाती या तीन वेगळ्या भाषा ब्रिटनमध्यें येण्यापूर्वींच बोलत असाव्या असेहि दिसतें.
नॉर्दंब्रियाच्या एंगल अथवा आंग्ल लोकांमध्यें वाङ्मयाचा प्रथम उदय झाला. व प्रथम आंग्ल किंवा इंग्लिस प्रांतभाषेंत देश्य ग्रंथरचना झाली या कारणानें लॅटिन वगैरे परकीय भाषांपासून वेगळ्या अशा ज्या देश्य भाषा त्या सर्वांनां 'इंग्लिश' भाषा असें सामान्य नांव पडलें. आंग्लनंतर वेस्ट सॅक्सन ही वाङ्मयरचनेची भाषा झाली व आंग्ल भाषा मागें पडली तरी वेस्ट सॅक्सनला 'इंग्लिस' असेंच नांव राहिलें. आज या जुन्या भाषेला अंग्लो - सॅक्सन म्हणतात. हें नांव १६ व्या १७ व्या शतकांतील भाषांपंडितांनीं त्यांच्या वेळच्या इंग्रजीपासून आलफ्रेंड व इल्फ्रिकच्या वेळचे इंग्रजी वेगळें आहे हें दर्शविण्याकरितां ते जुनें इंग्रजी अँग्लो सॅक्सन म्हणजे अँग्लोसॅक्सन लोकांचें व नवें इंग्रजी इंग्लिश असें नामकरण केलें. या पंडितांनां इंग्लिश व अँग्लोसॅक्सन या भाषा निराळ्या वाटत होत्या या दोन भाषांत नाते आहे, जुनींतूनच नवी भाषा हळू हळू उदयास आली ही गोष्ट अलीकडील पंडितांनीं सिद्ध केली. जुनींतून नवी उदयास आली ती क्रमानें आली व या विकासक्रमाच्या पाय-या व त्याचे कालविभाग येणेंप्रमाणें.
जुने इंग्लिश अ.अँग्लोसॅक्सन | इ. स. | ११०० पावेतो |
सांक्रमणिक जुनें इंग्लिश (सेमिसॅक्सन) | इ. स. | ११००-१२५० |
आरंभींचे मध्यकाल इंग्लिश | इ. स. | ११५०-१२५० |
सामान्य | इ. स. | १२५०-१४०० |
उत्तरकालीन सांक्रमणिक मध्यकाल इंग्लिश | इ. स. | १४००-१४८५ |
आरंभीचें आधुनिक अ.ट्यूडर इग्लिश | इ. स. | १४८५-१६११ |
१७ वें शतक सांक्रमणित आधुनिक | इ. स. | १६११-१६८८ |
आधुनिक अथवा चालू इंग्लिश | इ. स. | १६८९ नंतरचें |