प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण १९ वें.
यूरोपांतील लहान राष्ट्रांपासून मोठ्या राष्ट्रांचा व प्रांतिक भाषांचा विकास
डच भाषा.- रोमन लोक आजच्या हालंडला आले त्यावेळीं -हाइनच्या दक्षिणेस जर्मनेतर जात बेल्जम जातीशी जवळच्या नात्याची असून –हाइनच्या उत्तरेस उंच प्रदेशांतहि या जातीची वस्ती असावी. ते केल्टिक भाषा बोलत.
याच वेळीं गेल्डर्लंड, ओव्हरीसेल, युट्रेचचा कांहीं भाग, दक्षिण हॉलंड येथें लो फ्रँक भाषा प्रचारांत होती.
६ व्या शतकांत सॅक्सन लोक म्हणजे सध्याच्या उत्तर जर्मनीतील तेव्हांचे लोक यांनीं फ्रँक लोकांचा मुलुख घेतला. यामुळें फ्रँक लोक बेल्जन मुलखांत अधिकाधिक शिरूं लागले व त्यांनीं -हाइनच्या वॉल नांवाच्या फाट्याचे दक्षिणेकडील मुलुख काबीज केला. यावेळीं तेथें फ्रँक भाषा आली व केल्टिक भाषा अजीबात नाहीशी झाली. बट व लिंबुर्ग या ठिकाणी पूर्वीं केल्टिक भाषा होती. तेथें आतां फ्रँक भाषा आहेत.
गेल्डर्लंडचा कांहीं भाग इसेलचा पूर्वभाग व ओव्हरीसेल येथें आणि ड्रेन्ट व ग्रॉनिंगनचा कांहीं भाग येथें जुनी फ्रँक भाषा जाऊन सॅक्सन भाषा आल्या. कोठें जुन्यानव्यांचें मिश्रण रूढ झालें.
उत्तर हॉलंड या ठिकाणीं किना-याच्या प्रदेशांत फ्रिशिअन लोक आहेत. हे चौथ्या शतकांत फ्लँडर्सपर्यंत पसरले होते या फ्रिशिअन भाषेचें मिश्रण पूर्वीं फ्रिशिअन लोकांच्या सत्तेखाली असलेल्या मुलखांत आढळतें. फ्रीस्लंडमध्यें शुद्ध फ्रिशिअन भाषा सांपडते.
फ्रीस्लंड येथे हॉलंडी भाषा तेराव्या शतकापासून फ्रिशिअन भाषेंत मिसळूं लागल्याचें दिसतें. हॉलंडी व फ्रिशिअन यांच्या मिश्रणाची भाषा शहरांत उदयास आली तिचें नांव स्टाडफ्रिश. खेड्यापाड्यांतून जुनी फ्रिशिअन आहे तिला बोएरेन फ्रिशिअन म्हणतात.
१७ व्या शतकांच्या आरंभापासून हॉलंडी भाषेचें वर्चस्व सर्व देशभर पसरूं लागलें. प्रचलित वाङ्मय भाषा व हॉलंडी भाषा यांच्या मिश्रणानें एक स्वतंत्र लौकिक भाषा (बोलण्याची भाषा) उदयास आली. या मुखभाषेंत देशी भाषासंप्रदाय अंतर्भूत केले होते व वाङ्मयभाषेंतील मोडणीहि तिच्यांत अंशतः घेतली होती. परंतु देशी भाषा व लेखभाषा यांजहून ती निराळी व स्वतंत्र झाली. डच ग्रंथभाषा देश्य डच बोलीहून व डच संवादभाषेहून अगदीं निराळी पडण्याचें कारण तिच्या उत्पत्तीच्या इतिहासांत आहे. तो इतिहास येणेंप्रमाणें:-
ड च ग्रं थ भा षे चा इ ति हा स.- डच बोलींत लिहिलेलें पहिले कथानक 'सर्व्हेटिअस' हें होय या कथानकाचा कर्ता हेन्स्कि व्हान व्होल्डेक. कथानकाची भाषा मिडन फ्राँकिशसारखी आहे. या वेळीं बेल्जमच्या पश्चिमभागीं व्यापार बहुत होता. त्यामुळें बौद्धिक हालचालहि पुष्कळ झाली व तेथें वेस्ट लोफ्रँकिश भाषेंत बरेंच लिखाण सांपडते. या भाषेतील ग्रंथसमूहाला मिडलडच वाङ्मय म्हणतात. १२५४ त मिडलबर्गचा कायदा लिहिला गेला तो मध्य डच भाषेंतच आहे. प्रथम दक्षिणभागानें सर्व व्यवहारांत अग्रेसरत्व घेतलें होतें. पुढें उत्तरभाग अग्रेसर झाला व त्यांतील देश्य बोलीचा ग्रंथातून अंतर्भाव होऊं लागला. म्यूझ व -हाइन यांच्या उत्तरेकडे १३ व्या शतकापावेतों ग्रंथलेखन मुळींच नव्हतें म्हटलें तरी चालेल. चौदाव्या शतकांत दक्षिणेकडून पुरोहित वर्गानें व न्यायाधिकारी वर्गानें उत्तरेकडे ग्रंथभाषा आपल्याबरोबर नेली. ही भाषा अर्थातच तेथील देश्य बोलीहून बरीच निराळी होती. तेथील देश्य बोली फ्रिशिओ फ्रँकिश होती. दक्षिणेची ग्रंथभाषा थोडीफार उत्तरेकडील बोलीचा आपल्यांत समावेश करून घेऊन नेदर्लंडचा पश्चिमभाग व बेल्जम येथें हळू हळू पसरली. पूर्व नेदर्लंडची न्यायभाषा लो जर्मनींतील भाषेसारखी होती. ई नदीच्या तटांवरील प्रदेशांत ग्रंथभाषा व देशबोली यांजमध्यें अशीच मोठी तफावत आढळून येते. व्हाँडेल या ग्रंथकाराच्या पहिल्या पहिल्या ग्रंथांत ब्रॅबंट येथील बोलीचें वर्चस्व दिसतें. १६२५ नंतर मात्र अँम्स्टर्डाम बोलीचा त्याचे ग्रंथांत अंतर्भाव झालेला दिसतो. ग्रंथभाषा ही दक्षिणेकडून उत्तरेकडे गेली. अँम्स्टर्डाम येथें तिच्यांत बदल बराच झाला व या फेरफारांसुद्धा ही भाषा १७ व्या शतकांत यूट्रेचच्या तहानंतर इतर प्रांतांत पसरली. १६ व्या शतकापावेतों उत्तरेस ग्रॉनिंगन व फ्रीस्लंड येथे सरकारी कागदपत्र व कायदे फ्रिशन अथवा सॅक्सोफ्रिशन बोलींत लिहीत असत. हॉलंडचा संबंध अधिकाधिक येत गेला त्याप्रमाणें सरकारी भाषेत हॉलंडी बोलीचा अंतर्भाव होत गेला. पूर्व प्रांतांत असेंच झालें. तरीपण १६२६ व १६३७ यांच्या दरम्यान बायबलचें अधिकृत भाषांतर 'स्टाटेनबिबेल' प्रसिद्ध होईपावेतों डच ग्रंथभाषा लोकांत फारशी प्रचार पावलेली नव्हती. या बायबलचा प्रचार वाढला तशी ग्रंथभाषा अधिकाधिक लोकप्रिय झाली व त्या योगें हॉलंडची भाषा धर्मवादाच्या द्वारा सर्व प्रांतांतून प्रचारांत आली. बायबलमधील पुष्कळशीं वाक्यें व शब्दसमूह देश्य बालींत रूढ होऊन बसले.
हालंड स्वतंत्र राज्य होईपावेतों बव्हेरियाचे सरदार व बर्गंडीचे उमराव या प्रदेशांत आळीपाळीनें जागजागीं सत्ता गाजवीत होते व त्यांच्या सत्तेमुळें एकदां जर्मन तर एकदां फ्रेंच भाषेचा पगडा या प्रदेशांत बसला होता. १६ व्या व १७ व्या शतकांतहि हॉलंडांतील भाषांत फ्रेंच व जर्मन भाषांतूनहि ब-याच शब्दांची व भाषासंप्रदायांची भरती झाली. पौरस्त्य भाषांतूनहि डच भाषेंत व्यापारी व वसाहती संबंधामुळें पुष्कळ शब्द आले. तसेंच १६ व्या शतकांत विद्वज्जनांची भाषा लॅटिन हिच्यांतून व १७ व्या आणि १८ व्या शतकांत कविमंडळांच्या वजनामुळें फ्रेंच भाषेंतून डच भाषेंत पुष्कळच शब्द घेतले गेले. या परकी शब्दांच्या विरूद्ध १६ व्या शतकांत व १७ व्या शतकांतहि लोकांनीं ब-याच निकरानें मोहीम चालविली होती. परंतु या मोहिमेपेक्षां १८ व्या शतकांतील प्रमुख वाङ्मयमंडळांनीं जी मोहीम केली तिचा विशेष उपयोग झाला व शुद्ध डच भाषेंत आपले विचार मांडण्याकडे लोकांची बरीच प्रवृत्ति झाली. अर्थात् शुद्ध डच वापरावयाचें म्हणून गद्य व पद्य लेखनासंबंधांत पुष्कळसे नियम घातले गेले. या नियमांमुळें डच ग्रंथभाषा ताठर व पेलावयास अवघड होऊन बसली. १९ व्या शतकाच्या उत्तरार्धापावेतों तिचा हा ताठरपणा गेला नाहीं. हॉलंड व बेल्जम यांचे ऐक्य घडून आल्यानंतर मात्र डच भाषेंत फ्रेंच शब्दांचे आधिक्य झाले. समाजांतील वरच्या वर्गांच्या बोलण्यालिहिण्यांत तरी फ्रेंच शब्द अधिक येतात.
डच भाषा हॉलंड व बेल्जमपैकीं फ्लँडर्स, अँटवर्ष, ब्रॅबंट, या ठिकाणीं आणि डच ईस्ट इंडिया व इंडीज या ठिकाणीं चालते. इंडियांत जवळ जवळ शुद्ध डच चालते परंतु वेस्ट इंडीजमध्यें तिच्यांत नीग्रो व इंग्रजी शब्द आणि प्रयोग शिरले आहेत. १७ व्या शतकांत हॉलंड व झीलंडमधील बरेच डच लोक जॉन. व्हान रिएबेक याच्या नेतृत्वाखालीं केप टाऊन (दक्षिण आफ्रिका) येथें जाऊन राहिले. पुढें तेथें फ्रेंच, पोर्तुगीज, मलायी व इंग्रज लोकहि हळू हळू आले. याप्रमाणें केंप कालनीमध्यें १८ व्या शतकाच्या पूर्वार्धांत साउथ आफ्रिकन डच नांवाची भाषा उत्पन्न झाली. या भाषेत मूळ भाग डच भाषेचा असून इतरांचे शब्द व प्रयोगहि तींत मिसळले आहेत.