प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण १९ वें.
यूरोपांतील लहान राष्ट्रांपासून मोठ्या राष्ट्रांचा व प्रांतिक भाषांचा विकास

जर्मन लोक.- रो म न स त्ते खा ली.- ख्रि. पू. ५९ या वर्षी जुलियस सीझरला गॉलसा अधिकारी नेमलें तेव्हांपासून जर्मनीसंबंधाची प्रत्यक्ष माहिती आपणांस उपलब्ध होते. या काळापूर्वींहि दक्षिणेकडील संस्कृतीशीं जर्मनींचा संबंध येत होता असा पुरावा सापडतो. रोमन लोकांत पहिले ट्यूटन लोक भेटले ते डेन्मार्कमधील किम्ब्री व ट्यूटनी हे होत. या लोकांनीं इलिरिया गॉल व इटली या मुलखांवर ख्रि. पू. २ -या शतकाच्या अखेरीस स्वारी केली. सीझर गॉलमध्यें आला त्या वेळेस आजच्या जर्मनीच्या पश्चिमभागांत गॉलिश जातींचा ताबा होता. गॉल व जर्मन यांच्यामध्यें -हाइन नदी हीच सरहद्द होती. ख्रि. पू. ७२ या वर्षीं जर्मनांनीं आजचा आल्सेस प्रांत घेऊन तेथे वसाहत केली होती. सीझरच्या वेळेला गॉल लोकांवर जर्मन लोक सरहद्दीच्या सर्व बाजूंनीं स्वा-या करून त्यांनां जेरीस आणीत होते. सीझरला या जर्मनांवर अथवा त्यांनीं हांकलून लावलेल्या गॉल लोकांवर कित्येक वेळां चढाई करावी लागली.

ब्रुक्टेरी, चटी, चेरूस्की या जाती नीरो क्लॉडियसाला ख्रि. पू. १२ च्या नंतर शरण आल्या.

टायबेरिअस यानें इ. स. ५ या वर्षी चौसी, लांगोबडीं या जाती पादाक्रांत केल्या. आणि -हाइन व एल्ब यांच्यामधील प्रदेशांत रोमन पलटणी सरंक्षणार्थ ठेवल्या.

याच सुमाराला रोमन आरमार जटलंडपर्यंत गेलें व त्यानें त्या मुलखांतील किंब्री, चारुद व इतर जाती यांनां नांवाला जिंकलें.

आगस्टसच्या कारकीर्दींत जर्मनीमध्यें ज्या जाती राहत असल्याचें माहीत आहे त्या जाती येणेंप्रमाणे:- -हाइनच्या पश्चिमेला गॉलिश जाती होत्या. यांत महत्त्वाची जात म्हणजे ट्रेव्हेरी लोकांची. मोसेलच्या खो-यांत ही जात राहत होती. आल्सेसच्या दक्षिणेस रौरासी ही जात, ट्रेव्हेरी जातीच्या दक्षिणेस मेडिओमॅट्रिसी व पश्चिमेस सेक्वानी हे होते. ट्रेव्हेरी आपणांस जर्मन म्हणवीत. नर्व्ही व दुस-या बेल्जममधील जातींहि स्वतःस जर्मन म्हणवीत. जर्मनी हें नांव गॉलिश आहे, व ते प्रथम केल्टिक जाती -हाइनच्या पूर्वेस राहत त्यांनां लावलें जात असून पुढें ट्यूटॉनिक जाती त्यांच्या जागीं आल्या तेव्हां त्यांनां लावण्यांत आलें असें दिसते.

ख्रि. पू. पहिल्या शतकांत कोल्टिक लोकानां ट्यूटॉनिक लोकांनीं पश्चिमेकडे बरेच लांबवर दडपीत नेले होते. सीझरच्या वेळीं ही क्रिया चालू होती. दक्षिणेकडेहि असाच प्रकार चालू होता. आगस्टसच्या वेळी मार्कोमानी या ट्यूटॉनिक जातीनें बोहिमियांतून बोई लोकांनां घालवून दिलें. आजच्या बेडन व वर्टेम्बर्ग या ठिकाणांचा तांबा हेल्वेटी लोकांनीं याच वेळीं घेतला. व्होल्की टेक्टोसेजेस ही जात सीझरच्या वेळी जर्मनींत राहत होती. फ्रान्सच्या दक्षिणेंतील व्होल्की आरेकोमिसी आणि गॅलॅटियांतील टेक्टोसेजेस या जाती वरील जातींच्या शाखा असाव्या. व्होल्की टेक्टोसेजेस हे नांव सर्व ट्यूटॉनिक भाषांत केल्टिक आणि इटालियन जातींनां सर्वसामान्य म्हणून लावण्यांत येतें यावरून ट्यूटॉनिक जातींनां पहिली केल्टिक जात भेटली ती वरील जात असावी असा तर्क आहे. वेसरच्या खो-यांत ही जात राहत असावी. पश्चिम जर्मनीचा -हाइनच्या पूर्वेकडील बराच भाग पूर्वीं केल्टिक जातींनीं व्यापिलेला असावा. पूर्वभागीं कोटिनी नांवाचे गॉलिश लोक होते असा उल्लेख आलेला आहे. हे ओडरच्या खो-यांत वरच्या भागांत राहत होते. टासिटसनें ओसी नांवाची एक जात तेथेंच राहत होती असें म्हटलें आहे.

रो म न स त्ते नं त र चे ज र्म न.- आतां खास जर्मन लोकांसंबंधानें लिहावयाचें. स्ट्रासबर्ग व मेझ यांच्या दरम्यानच्या -हाइनच्या खो-यांत ट्रिबोक्सी, नेमेटीस, व्हांजिओनीस हे लोक राहत होते. थोड्या खालच्या प्रदेशांत बाइस बाडनजवळ माटिआसी आणि कोलोनजवळ यूबी लोक राहत होते. यांच्या खालीं सुगम्ब्री -हाइनच्या मुखप्रदेशांत वटावी व इतर लोक होते. रोमन लोकांची सत्ता या सर्व लोकांवर होती. यांच्या पलीकडे लहानच्या खो-यांत टेक्टेरी, रुहरच्या खो-यांत यूसीपेटीस, लिपी व एम्स खो-यांत ब्रुक्टेरी व अंप्सीवेरी होते. हासच्या खो-यांत चास्वारी, वेसरच्या खो-यांत वरच्या भागींचाहि होते. यांच्या वायव्येला मार्सी, वेसरच्या खो-याच्या मध्यभागीं चेरूस्की व खालीं अंग्रिवारी होते. -हाइनच्या मुखाच्या उत्तरेकडे समुद्रकिना-याच्या प्रदेशांत कानिनाफेटिस त्यांच्या पलीकडे फ्रिसी, पलीकडे चौसी याप्रमाणें वस्ती होती. आणखी जाती येणेंप्रमाणें:-

 

 सुएबिक, (यांत मार्कोमानी मुख्य)  एल्ब खोरें.
 क्वादी  एल्बच्या उगमाजवळ
 हर्मुंदूरी  सात खोरें
 सेम्नोनीस  साल व एल्ब यांच्या संगमाखालीं
 लांगो बार्डीं  सेम्नोनींच्या मुलुखाला लागून
 सॅक्सन  श्लेस्विग पश्चिम किनारा व शेजारचीं बेटें.
 अँग्ली  श्लेस्विगचा पूर्व किनारा.
 वारीनी अ. वानीं  मेक्लेनबर्गचा किनारा.
 रुगी  पोमेरानियाचा पूर्व भाग.
 बर्गडिओनी  ओडर खोरें, खालचा भाग.
 लुगी (हेच नंतरचे व्हँडल लोक यांपैकीं सिलिंगीलोक पुढें स्पेनमध्यें
प्रसिद्ध झाले.)
 ओडर खोरें, वरचा भाग.
 गॉथ  विस्तुला खोरें मध्यभाग.
 गालिंदी (प्रशिअन) ईस्टी   
(प्रशियन अ.इस्थोनिअन या ट्यूटॉनिक नव्हत्या)
 खालचा भाग.
 स्लॅव्हॉनिक (वेनेटी)  विस्तुलेच्या पूर्वेस.

आगस्टसच्या वेळीं मार्कोमानी जर्मनीचा राजा मारोबोडुअस हा सर्वांत अधिक प्रबळ होता. याची सत्ता हर्मुंदुरी खेरीज करून सर्व सुएबिक जातींव होती. तशीच पूर्व जर्मनीतील लुगी व गॉथ धरून बहुतेक सर्व लोकांवर त्याची सत्ता होती. इ. स. १७ सालीं चेरुस्की लोकांचा मुख्य अर्मीनिअस याजशीं त्याचें युद्ध झालें व त्यांत त्याचा पराजय झाला. पुढें दोन वर्षांनीं तो पदच्युत झाला. पुढें हर्मुंदुरी, व त्यानंतर क्वादी लोकांमधील राजा प्रमुख झाला. इ. स. २८ या वर्षीं फिशन लोक रोमविरुद्ध उठले. इ. स. ४७ या सालीं ते पुनःशरण आले तरी क्लॉडिअरसनें आपलें सैन्य लवकरच काढून घेतलें. पुढील पहिल्या शतकाच्या अखेरीपर्यंतच्या धामधुमींत सुएबी, चट्टी, हर्मुंदुरी, चेरुस्की चौसी, अम्पसीवारी अंग्रीवारी ब्रुक्टेरी व रोमन लोक यांची नांवें पुनः पुनः येतात. या शतकाच्या अखेरीस चौसी व चट्टी हे लोक सर्वांत अधिक प्रबल झाल्याचें दिसतें.

श र्ल मा न च्या का ला प र्यं त.- १६६-१८० या कालांत मार्कोमानिक युद्ध झालें. या युद्धांत सुएबिक जाती व सर्माशिअन इयाझिग लोक रोमन लोकांशीं लढले.

तिस-या शतकाच्या प्रारंभीं अलामानी जातींत अधिक चळवळ दिसते. याच वेळेला आग्नेय दिशेकडे गॉथ लोक गडबड करूं लागले व लवकरच रोमला त्यांनीं सळो कां पळो करून सोडलें. हेसली जातीचे लोक २८९ चे सुमारास पश्चिमेकडील समुद्रावर आलेले दिसतात. सॅक्सन लोकांच्या दर्यावरील स्वा-या याचे पूर्वीं नुकत्याच सुरू झाल्या होत्या. २५० चे सुमाराला फ्रँक हें नांव प्रथम ऐकुं येतें. वायव्येकडील जर्मन जातीचें हे सामुच्चयिक नांव असावें.

चवथ्या शतकांत फ्रँक व अलामानी या जाती पश्चिम जर्मनींत सर्वांत प्रमुख दिसतात. या शतकाच्या मध्याचे सुमारास सॅक्सन लोकांनीं वायव्य जर्मनीचा बराच भाग जिंकून घेतला. तिस-या शतकाच्या अखेरीस बर्गांडिअन लोक मेन नदीच्या खो-यांत आले व त्यांनी तेथें वस्ती केली. चवथ्या शतकाचे मध्याचे सुमारास गॉथ लोक पूर्व जर्मनींत सत्ताधारी झाले. यांचा राजा हर्मनारिक मेल्यानंतर गॉथ लोकांची सत्ता हूण लोकांकडे गेली. हे हूण लोक पूर्वेंकडून आले. हे आले त्यामुळें पूर्व जर्मनींत फारच गोंधळ उडून लोक आपापली वस्ती सोडून गेले. कोणी कार्पाथिअन व रायसेन गॅबर्ज पर्वतांच्या दक्षिणेस राहावयास गेले. गॉथ जातीचे गेपिड लोक व रूगी लोक यांत होते.

पश्चिमेकडे अलामानी व बाइओराइ (बव्हेरिअन लोक, हे मार्कोमानींचे वंशज) या जातींनी ५ व्या शतकाच्या प्रारंभीं नोरिकम व व्हिडेलेशिआ या रोमन प्रांतांत प्रवेश केला ४०६ सालीं व्हँडाल लोक व सुएबि आणि ट्यूटने तर अलानी यांनीं -हाइन ओलांडून गॉलवर स्वारी केली. ४३५-४५, या सालांत बर्गडियन लोकांचा आटिलानें निःपात केला. यांचे राहिलेले लोक नंतर गॉलमध्यें वस्ती करून राहिले. याच सुमारास फ्रँक लोक बेल्जममध्यें शिरून तेथें सत्ता धरून बसले. ४५३ मध्यें आटिला मेल्यानंतर हूण सत्ता खालावली.

६ व्या शतकांत प्रमुख जाती दिसतात त्या फ्रँक, फ्रिशन सॅक्सन, अलामानी, वव्हेरिअन, लांगोबर्डी, हेरुली, वार्नी. डेन लोकांचे नांव इलेस्विग प्रांतांत याच काळीं प्रथम ऐकू येतें. ऑस्ट्रो गॉथ लोकांचा राजा थिओडोरिक याने ६ व्या शतकाच्या आरंभीं व्हिसी गॉथ लोकांचे संरक्षणार्थ क्लॉव्हिसविरूद्ध थुरिंगी व्हेरुली व वार्नी यांजशीं कूट करण्याचा यत्न केला. परंतु हेरुली लोकांचा राजा लवकरच मारला गेला व त्यांची सत्ताहि त्याबरोबर लयास गेली. ५३१ त थुरिंगीचें राज्य फ्रँकिश राजानें धुळीस मिळविलें.

६ व्या व ७ व्या शतकांत सॅक्सन लोकांवर मधून मधून फ्रँक लोकांची सत्ता होती परंतु शार्लमेनच्या कारकीर्दीपर्यंत फ्रँक लोकांनीं त्या लोकांनां पूर्णपणे अंमलाखाली आणले नव्हतें. ६ व्या शतकाच्या मध्यानंतर लवकरच अव्हार लोकांनीं फ्रँक राज्यावर स्वारी केली. अव्हार लोकानंतर स्लाव्ह लोक आले व त्यांनीं एल्स्टर खो-यांत वस्ती केली. ६ व्या शतकाच्या अखेरीपावेतों एल्बचें सर्व खोरे स्लॅव्हानिक झालें. एल्बच्या मुखाजवळचा प्रदेश मात्र सॅक्सन राहिला. सालच्या पूर्वेस सॉर्ब लोक, त्यांच्या पलीकडे डालेमिन्सी आणि सिडस्ली लोक होते. सॅक्सन लोकांच्या पूर्वेस एल्ब खो-यांत पोलाव लोक आणि त्यांच्या पलीकडे हेवेली लोक होते मेक्लेनबर्गमध्यें वार्नाबी व पूर्व हॉल्स्टाइनमध्यें ऑबोट्रीटी व वाग्री लोक होते. वार्नाबीच्या पूर्वेस लिउटीसी हे ओडरपर्यंत वसले होते व त्या नदीच्या पलीकडे पोमेरानी होते. ओडरच्या दक्षिणेस मिल्सिएनी व लुसीसी होते. पोलोनी लोक विस्तुला खो-यांत मध्यभागीं होते. खो-याच्या खालच्या भागांत प्रुसी व लिथुआनी या प्रशिअन जाती होत्या.

या वेळेपासून आयडर जवळच्या डॅनिश हद्दीपर्यंत राहण्या-या उत्तरेकडील ट्यूटानिक लोकांनां सॅक्सन म्हणण्याचा प्रघात पडला. फ्रिशिअन लोकांनां जिंकण्याचें काम फ्रँक लोकांनीं ६८९ चे सुमारास सुरू केलें तें शार्लमानच्या कारकीदीपर्यंत पुरें झालें. ७७२-७७३ या साली सॅक्सन लोकांचा मोठा पराभव झाला व या शतकाच्या अखेरीपावेतों शार्लमानचें राज्य डेन लोकांच्या हद्दीला जाऊन भिडलें. या सुमाराला जर्मनीचा सर्व ट्यूटॉनिक भाग शार्लमानच्या पूर्णपणे अंमलाखालीं आला होता.

जर्मन लोक हेरिस्टलचा पिपिन याच्या कारकीर्दींत व त्याचा मुलगा व नातु यांच्या कारकीर्दींत ख्रिस्ती झाले. शार्लमानच्या सत्तेखालीं जर्मनी एकराष्ट्र होण्याच्या मार्गास लागला.