प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण १९ वें.
यूरोपांतील लहान राष्ट्रांपासून मोठ्या राष्ट्रांचा व प्रांतिक भाषांचा विकास

फ्रान्समधील लोक.- गॉलचे अगदीं पहिले रहिवासी कोण हें नक्की समजण्यास मार्ग नाहीं. भाषाभिज्ञ, पुराणवस्तुशास्त्रज्ञ, मानववंशशास्त्रज्ञ या जुन्या रहिवाशांविषयीं माहिती काढण्याचा यत्न करीत आहेत. एवढे खरे की, या प्राचीन जातींनां इतर जातींनीं जिंकले असलें तरी त्यांचा कांहीं सर्वस्वी नायनाट झाला नाही. त्यांचें रक्त आजच्या फ्रेंच लोकांत आहे. या जातींचे अवशेष कृतिरूपानें डोंगरांतून खोदलेल्या लेण्यांत व तेथील चित्रांत, श्मशानांतून मिळणा-या शस्त्रांत व भूषणांत वगैरे आजहि मिळतात. आयबेरिअन व लिगुरिअन हे लोक या वरील जातीनंतरचे. यांजबद्दलची माहिती मिळते. पिरीनीज पर्वताच्या दोन्ही बाजूंनां राहणारे बास्क लोक हे आयबेरिअन जातीचे होत. लिगुरिअन लोक हे उत्तर इटाली व फ्रान्सचा आग्नेय व मध्यप्रदेश यांत वस्ती केलेला इंडो यूरोपियांचा जो समूह त्याचे वंशज असावे. ख्रि. पू. ७ व्या शतकांत या लिगुरिअनांनीं मार्संलस शहरीं फिनिशियन लोक आले त्यांस वस्तीस जागा दिली. या लिगुरिअन व आयबेरिअन पूर्व वस्तींवर पुढें गॉल अथवा केल्ट लोकांनीं विजय मिळवून आपली छाप बसविली. आणि यानंतर रोमन राज्य या ठिकाणीं झाले. ख्रि. पू. ६ व्या शतकांत केल्ट लोक डान्यूबपासून निघाले व त्यांनीं हळूहळू जिब्राल्टरपर्यंतचा मुलुख व्यापला पुढें एक दीड शतकानें उत्तरेकडून बेल्जीलोक व दक्षिणेकडून आयबेरिअन लोक यांच्या स्वा-या होऊं लागून केल्ट राज्य हळू हळू अस्तंगत झालें व रोमन लोकांनां या ठिकाणीं सत्ता प्राप्त झाली.

सीझरच्या 'कॉमेंटरीज' मध्यें गारोनच्या दक्षिणेस अँक्विटानिअन लोक, गारोनपासून सीन व मार्नपर्यंत केल्ट लोक, व सीनपासून -हाइनपर्यंत बेल्जी लोक होते असें वर्णन आहे. या तीन जातींच्या नांवांखाली येणा-या अर्धगली जाती पुष्कळच होत्या. यांच्या भाषा व चालीरीती भिन्न होत्या (पृ.११-१९ पहा)

रोमन राज्य असतां केव्हां किम्ब्रि व ट्यूटॉन तर केव्हां व्हेकाटिस वगैरे रानटी लोकांच्या स्वा-या गालॅवर होत होत्या.

 इ. स. च्या ५ व्या शतकाच्या आरंभास रोमन साम्राज्यास उतरती कळा लागून त्या शतकाच्या अखेरीपावेतों तें लयास गेलें. या अवधींत फ्रान्समध्यें ज्या रानटी जाती वस्तीस आल्या त्या काळ्या समुद्राच्या आसमंताद्भागांतील व्हँडाल लोक व अँलनी लोक, जर्मन लोक, व्हिसिगॉथ लोक, जर्मनींतील फ्रँक, -हाइनवरचे रिपुएरियन, सेलियन वगैर. रोमन साम्राज्याच्या लयानंतर शार्लमानच्या वेळेपर्यंत नव्या (७६८-८१४) स्पेनमधील मुसुलमान, हंगेरीचे अव्हार, स्लाव्ह लोक, डेनलोक या सर्वांचा फ्रान्सशीं संबंध आला. व या सर्वांच्या मिश्रणानें हल्लींची फ्रान्सची लोकवस्ती बनलेली आहे.