प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण १९ वें.
यूरोपांतील लहान राष्ट्रांपासून मोठ्या राष्ट्रांचा व प्रांतिक भाषांचा विकास
या प्राचीन लोकांचा इतिहास.- ऑस्ट्रियांतील साम्राज्याचें मूळ डॅन्यूब नदीच्या दक्षिण तीरावर एन्स नदीच्या पूर्वेकडील लहानशा प्रांतांमध्यें आढळतें. याची स्थापना ख्रि. श. ८०० च्या सुमारास स्लाव्ह लोकांच्या स्वा-यांपासून फ्रँकिश राज्याचें संरक्षण करण्याकरितां झाली. त्या वेळीं या राज्यांतील प्रदेशाची पूर्वपश्चिम लांबीं अवघी ६० मैल होती. परंतु यामध्यें पूर्वेकडील बराच मोठा प्रदेश येतो अशी समजूत असल्यामुळें व जर्मनीच्या तो पूर्वेकडे असल्यामुळे त्यास ऑस्टेरिक म्हणजे पूर्वेकडील साम्राज्य असे नांव मिळालें. या नांवाचा उल्लेख प्रथमतः ख्रि.श. ९९६ मधील एका दस्तऐवजांत आढळतो. या राज्याची हळूहळू वाढ होऊन सध्यांचे ऑस्ट्रोहंगारीचें साम्राज्य तयार झालें. या साम्राज्यावर बबेनबर्ग आणि हॅप्सबर्ग हीं घराणीं आजपर्यंत एकापाठीमागून एक होऊन गेलीं.
याप्रदेशाच्या दक्षिण भागांत ख्रिस्तीशकस्थापनेपूर्वीं तैरिस्की या नांवाची एक केल्टिक जात रहात होती. यांनांच पुढें नोरिसि असें म्हणत. यांनां रोमन लोकांनीं ख्रि. पू. १४ मध्यें जिंकलें होतें. यांच्या प्रदेशाचा पुढें पॅनोनिया आणि नॉरिकम या प्रांतांत समावेश झाला आणि रोमन सत्तेखाली बिंडोबाना (सध्यांचे व्हिएन्ना) या शहरास बरेंच महत्त्व आलं. डॅन्यूब नदीच्या उत्तरतीरावर मार्कोमानी व क्वादी जातीचे लोक राहत असत. त्यांचीं रोमन लोकांशीं वारंवार युद्धें होत. पुढें रोमन सत्तेच्या -हासकालीं हा प्रदेश हूण वगैरे उत्तरेकडील लोकांनीं व्यापला. ख्रिस्ती शक ५९० च्या सुमारास डॅन्यूब नदीच्या दोन्ही तीरांवर या प्रदेशांत स्लोव्हेन किंवा कोरूतेन नांवाच्या स्लाव्ह जातीच्या लोकांची वसती होती. हे त्या वेळीं सामोयाच्या. सत्तेखाली असत व पुढें आवार लोकांच्या सत्तेखाली गेले. ख्रि. श. ७९१ मध्यें शार्लमान राजानें यांच्यावर स्वारी केली व पुढें लवकरच सर्व आवार लोक फ्रँकिश साम्राज्यांत सामील झाले. ९ व्या शतकामध्यें फ्रँकिश सत्ता नष्ट झाली आणि पुढें मोरेव्हिअन, मग्यार उर्फ हंगेरिअन इत्यादि लोकांनीं एकामागून एक येऊन त्या सत्तेचा मागमूस नाहींसा केला.