प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण १९ वें.
यूरोपांतील लहान राष्ट्रांपासून मोठ्या राष्ट्रांचा व प्रांतिक भाषांचा विकास
स्पेनमधील लोक.- आयबेरिया द्वीपकल्पांत अगदीं पूर्वकाळी कोणते लोक राहत होते ते संशोधकांस अद्यापि नीट कळलेलें नाहीं. रोमन लोकांचा या द्वीपकल्पांशीं ख्रि. पू. ३ -या शतकांत संबंध आला. या लोकांनीं तेथें तीन जाती आढळल्याचें लिहून ठेवलें आहे. (१) आयबेरिअन लोक, पूर्व, उत्तर व दक्षिण भागांत (२) केल्ट लोक वायव्य भागांत (३) केल्टिबेरिअन लोक मध्य भागांत. रोमन लोकांच्या सत्तास्थापनेनंतर इटालियन लोक व रोमन साम्राज्य लयास गेल्यानंतर जर्मन सत्ताधीश झाले तेव्हां जर्मन लोक स्पेनमध्यें वस्तीला आले. वसाहतीला आलेल्यांची संख्या मात्र अजमासानेंहि सांगतां येणें शक्य नाहीं.
फीनिशिअन लोक व्यापारी या नात्यानें ख्रि. पू. ११ व्या शतकापासूनच स्पेनमध्यें येऊं लागले. कार्थेज हें जें आफ्रिकाखंडांतील मोठें फिनिशियन नगर त्याच्या भरभराटीच्या वेळीं फिनिशियन लोकांचा स्पेनमधील व्यापार भरभराटींत आला.
रोमन लोकांचा डोळा स्पेनमधील लोकांवर व खाणींवर होतात. कार्थेजचा पाडाव रोमनें केला. त्यांनीं स्पेन हळूहळू जिंकलें. रोमचें राज्य स्पेनवर कमी अधिक प्रमाणांत ख्रि. पू. २०० ते इ. स. ४०६ पावेतों होतें. रोमन संस्कृति ब-याच स्पॅनिश लोकांनीं हळूहळू पत्करली (ख्रि. ७०-७४). या काळांत म्हणजे सिसरो व सीझर यांच्या वेळीं स्पेनच्या दक्षिण भागानें तरी रोमन संस्कृति आपलीशी केली होती. त्यांची बोली, त्यांचे वाङ्मय, त्यांच्या देवता, बहुतांशीं इटालियन झाल्या होत्या. रोमन राज्याच्या काळांत रोमन स्पॅनिश वाङ्मय पुष्कळ तयार झालें. पुष्कळ रोमन ग्रंथकार स्पॅनिअर्ड होतें. उदाहरणार्थ सेनेका, लुकन वगैरे.
रोमन राज्याचा नाश व्हँडाल, सुएबी, अलन या रानटी जातींनीं केला. व्हिसिगॉथ लोक रोमन लोकांचे मित्र म्हणून आले (इ. स. ४१२). ५८६-६०१ या काळांत स्पेनच्या राज्यांत ख्रिस्ती धर्म हा राजधर्म म्हणून स्थापण्यांत आला.
मुसुलमानांनीं ७११ त स्पेनवर स्वारी करून तो देश जिंकला. या मुसुलमानांत अरब, सीरियन व बर्बर जाती होत्या. यांच्या अमदानींत पुष्कळ लोक नांवाचे मुसुलमान झाले. पुष्कळांनीं डोईपट्टी देऊन आपला पूर्वींचा धर्म राखला. सरासरीनें १२५० पावेतों मुसुलमानी सत्ता स्पेनमध्यें कमी अधिक प्रमाणांत होती. यानंतर फक्त ग्रॅनाडांत मुसुलमान वस्ती राहिली.
ज्यू लोकांचीहि वस्ती स्पेनमध्यें पुष्कळ होती.
येणेंप्रमाणें आजच्या स्पॅनिश लोकांच्या रक्ताचा इतिहास सांगतां येईल. पोर्तुगीज जनतेचे घटकहि जवळजवळ या प्रमाणेंच आहेत.