प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण १९ वें.
यूरोपांतील लहान राष्ट्रांपासून मोठ्या राष्ट्रांचा व प्रांतिक भाषांचा विकास
हंगेरींतील प्राचींन लोकांचा इतिहास - सध्यां ज्या प्रदेशास हंगेरी म्हणतात तो प्रदेश इ. स. ८९५ पर्यंत स्लाव्ह लोकांच्या ताब्यांत होता. त्या वर्षीं मग्यार राज्याचा संस्थापक अर्पाद यानें त्यांच्यावर वेरेझ्का खिंडीतून आपल्या रानटी लोकांसह स्वारी करून दहा वर्षांच्या आंत मूळचें स्लाव्ह राज्य पूर्णपणें आपल्या कबज्यांत घेतलें. त्याप्रमाणेंच त्यानें दक्षिणेकडील प्रांतांतील बल्गेरियन, सर्ब, क्रोट, आवार वगैर लोकांवर लवकरच आपली सत्ता स्थापित केली. ही अनार्य जात मध्येंच आल्यामुळें पूर्वेकडील व पश्चिमेकडील तसेंच दक्षिणेकडील व उत्तरेकडील स्लाव्ह लोकांमध्यें कायमचें अंतर पडलें. यामुळें स्लाव्ह लोकांच्या पश्चिमेकडील शाखेवर लवकरच ट्यूटानिक संस्कृतीचा पगडा बसला अर्पाद राजा इ. स. ९०७ मध्यें मरण पावला. याच्या नंतर गादीवर बसलेल्या दोन राजांच्या कारकिर्दींत मग्यार घोडेस्वार सर्व यूरोपभर इतस्ततः धिंगाणा घालीत होते. त्यांनीं थुरिजिया, स्वाबिया, बव्हेरिया वगैरे प्रांतांत शिरून जर्मन लोकांचा लेकफेल्ड येथें पराजय केला (इ. स. ९०८-९१०) पुढें इ. स. ९३३ मध्यें पराभूत जर्मन राजा पहिला हेनरी यानें सैन्य उभारून मग्यार लोकांचा गोथा आणि रीड येथें पूर्ण मोड केला. तेव्हां ते इतर प्रांतांकडे वळले. त्यांनीं -हाइन ओलांडून लोथरिंजिया प्रांत उध्वस्त केला. त्यांनीं पूर्वेकडील साम्राज्यावर चाल केली व कॉन्स्टंटिनोपलपासून खंडणी घेतली. ९४३ त त्यांनीं इटलींत प्रवेश केला व ९५५ त बर्गंडीवर स्वारी केली. अखेरीस ओटो (पहिला) यानें त्यांचा ऑग्सबर्ग जवळ पूर्ण पराजय करून त्यांची कत्तल केली (९५५). त्यांपैकीं फक्त सातजण वांचले पण तेहि वाटेंत गुलाम म्हणून विकले गेले. या वेळेपासून त्यांनीं मुलुखगिरी करण्याचें सोडून दिलें.