प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण १९ वें.
यूरोपांतील लहान राष्ट्रांपासून मोठ्या राष्ट्रांचा व प्रांतिक भाषांचा विका
वरील प्रकरणांत सांगितलेल्या घडामोडी होत असतांच यूरोपमध्यें दुसरीहि एक महत्त्वाची क्रिया चाललेली होती. ती क्रिया म्हटली म्हणजे यूरोपखंडांत जे भिन्न भिन्न मानववंशाद्भव लोक समूह होते व भिन्न भिन्न भाषा बोलणारे संघ होते त्यांमध्यें व्यवस्थित समाजघटनेचा व राष्ट्रीय आकांक्षांचा विकास होत होता ही होय. आज आपणांस जीं मोठमोठीं बलिष्ठ राष्ट्रें यूरोपांत प्रामुख्याने कार्ये करतांना दिसतात व आज यूरोपमधील ज्या भाषांमध्यें प्रचंड ग्रंथसमूह दृष्टीस पडतात ती राष्ट्रें व त्या भाषा यूरोपीय इतिहासाच्या मध्ययुगाच्या सुमारास अगदी बाल्यावस्थेत होत्या. तरी त्यांचा विकास कोण कोणत्या पाय-यांनीं कोणत्या काली होत गेला त्याचा इतिहास आपणांस समजावून घेतला पाहिजे म्हणून यूरोपीय इतिहासाचें कथासूत्र थोडावेळे बाहूस ठेऊन आपण या राष्ट्रांच्या व भाषांच्या विकासाकडे वळूं.
यूरोपच्या विकासाचा इतिहास समजून घ्यावयाचा म्हणजे आज दिसणारी राष्ट्रें कशी तयार झाली आणि त्यांचा विकास कसकसा होत गेला हें समजून घ्यावयाचें यूरोपमध्यें ख्रिस्ती शकाच्या प्रारंभाच्या सुमारास हजारों राष्ट्रस्वरूपी जाती असाव्यात कांहीं इतस्ततः संचार करणा-या, कांहीं स्थानबद्ध व संस्कृतिविकासक्षम आणि कांहीं आपलें राज्य स्थापून आपल्या सत्तेचें जाळें पसरविण्यास उद्युक्त अशा दिसतात. या अनेक राष्ट्रांवर उर्फ राष्ट्रजातींवर रोमचे साम्राज्य पसरलें होतें आणि कांहीं त्याच्या बाहेर होत्या. रोमच्या साम्राज्यानें आणि रोमन ख्रिस्ती संप्रदायानें लॅटिन भाषेचा प्रसार चोहोकडे केला. कालांतरानें रोमचें साम्राज्य म्हणजे केंद्रवर्ती शक्ति मोडकळीस आली तेव्हां स्थानिक सत्ता महत्त्व पावली. चोहोंकडचे लोक अधिकाधिक बलिष्ठ होत गेले. कांहीं ठिकाणी लॅटिन भाषा पसरली होती परंतु अनागरांच्या बोलीमध्यें अनेक स्थानिक फरक उत्पन्न होत गेले होते. या स्थानिक फरकांचीं कारणें दोन आहेत एक तर रोमचें साम्राज्य निरनिराळ्या काळीं निरनिराळ्या ठिकाणीं पसरलें आणि त्या निरनिराळ्या काळीं तें पसरलें त्या वेळेस लॅटिन भाषेचें निरनिराळें स्वरूप होतें, यामुळें निरनिराळ्या स्वरूपाच्या भाषा निरनिराळ्या ठिकाणीं स्थापन झाल्या. दुसरें फरकाचें कारण हें की प्रत्येक ठिकाणची भाषा तेथील देश्य जातींनी घडविलेल्या संस्कारामुळें व नंतर होणा-या दुस-या भाषांच्या आघातामुळें निराळी झाली.
सध्यांच्या राष्ट्रघटनेचा इतिहास पाहिला असतां आपणांस त्यांत दोन निरनिराळ्या क्रिया आढळून येतात. एक क्रिया म्हटली म्हणजे विशिष्ट भाषेची विशिष्ट प्रदेशावर व्याप्ति व दुसरी क्रिया म्हणजे विशिष्ट भाषेनें व्याप्त झालेल्या प्रदेशामध्यें ज्या शासनसंस्था निर्माण झाल्या असतील त्यांपैकीं एकीचा इतरांवर जय होऊन भाषाक्षेत्र आणि शासनसत्ता यांमध्यें स्थापन झालेलें जवळ जवळ ऐक्य. अर्थांत राष्ट्रघटनेचा इतिहासांत दोन मुद्दयास महत्त्व येतें. (१) ज्यानें पुढें भाषाक्षेत्र सबंध व्यापलें अशा त्या भाषाक्षेत्रांतील विजयी संस्थानाचा भाषाक्षेत्र व्यापीपर्यंत झालेला इतिहास. हा राजकीय इतिहासाबरोबर दिलाच आहे. (२) पूर्वपरंपरागत भाषेपासून संबंध तुटून आजची अर्वाचीन भाषा आत्मवर्धनसंमुख झाली त्या क्रियेचा इतिहास.
यूरोपास जें तत्त्व लागू करावयाचें तेंच हिंदुस्थानाच्या इतिहासासहि अंशानें लागू करतां येईल. १० व्या शतकांपर्यंत आजच्या देशी भाषांचें अस्तित्व यूरोपांतल्याप्रमाणें आपल्या कडेहि (तामिळ सोडून) दिसून येत नाहीं.
वरील विधानाची सत्यता प्रत्येक देशांतील लोक व तेथील भाषांचा इतिहास यांची संगति लावतांना स्पष्ट होते. यासाठीं यूरोपांतील प्रत्येक देशाची भाषाविषयक व लोकविषयक पहाणी करूं. भाषेचा विकास व विशेष प्रदेशाचा इतिहास यांचाहि प्रस्तुत प्रसंगी विचार होईल.
प्रत्येक देशांतील राष्ट्रीयकरणाची क्रिया स्पष्ट करण्यासाठीं प्रत्येक देशांतील जनताघटकांचा व पूर्व कालीन भाषांची हिशोब घेतला पाहिजे.
इटली स्पेन पोर्तुगाल व फ्रान्स हीं सदृश भाषांची राष्ट्रें आहेत. त्याप्रमाणेंच जर्मन, स्वीड, नार्वेजिअन, डच व डेन ही ट्यूटानिक वर्गांत मोडणा-या सदृश्य भाषांचीं राष्ट्रें आहेत या दोहोंमधील दुवा इंग्लंड हा आहे. म्हणजे इंग्लडची भाषा जरी मूळची ट्यूटानिक आहे तरी तीवर लॅटिन भाषेचा व फ्रेंच भाषेचा संस्कार बराच आहे.
साम्राज्य जेथें स्थापन झालीं तेथें राष्ट्रीय संस्कृतिविकास बंद पडला आणि राष्ट्रीय भावना चांगली रुजली नाहीं, तथापि राष्ट्राचें पृथकत्व नष्ट झालें नाहीं तर जेव्हां जेव्हां साम्राज्य दुर्बल होऊं लागलें तेव्हां राष्ट्रीकरण जोरानें प्रदीप्त झालें. ही गोष्ट गेल्या महायुद्धांत आस्ट्रिया व रशिया या साम्राज्यांचा चुराडा झाल्यानंतर आपणांस आज डोळ्यांसमोर दिसत आहे. रोमन साम्राज्यामुळें रोमन प्रांत झाले त्यामुळें अनेक विस्कळीत राष्ट्रें एका नांवानें बोधलीं गेली, आणि पुढें साम्राज्य दुर्बल झाल्यानंतर प्रांत राष्ट्रे होण्याच्या मार्गास लागले. हे विकासनियम पुढील प्रत्येक देशाच्या भाषा व लोक यांच्या इतिहासानें स्पष्ट होतील.