प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण १९ वें.
यूरोपांतील लहान राष्ट्रांपासून मोठ्या राष्ट्रांचा व प्रांतिक भाषांचा विकास
बाल्कन द्वीपकल्पांतील लोक.- या प्रदेशांत तुर्क लोक १४ व्या किंवा १५ व्या शतकांत आले. परंतु १९ व्या शतकामध्यें तुर्की अंमलाखालून जो प्रदेश गेला त्या प्रदेशांतील मुसुलमानी लोकसंख्या हळू हळू कमी होत गेली व अद्यापिहि कमी होत आहे. सध्यां फक्त बल्गेरियामध्यें ईशान्य भागांत व अँड्रिआनोपलपासून काळ्या समुद्रापर्यंतच्या प्रदेशांत यांची वस्ती आहे. एकंदर तुर्कांची संख्या १८,००,००० पेक्षां जास्त नाहीं. स्लाव्ह लोकांची संख्या एक कोटि आहे. यांत सर्बोकट व बल्गर लोकांचाहि अन्तर्भाव होतो. सर्बोक्रोट लोक कार्पेथियन पर्वतामधून ७ व्या शतकांत आले. यांची संख्या ५६,००,००० आहे. बल्गर लोक हे स्लाव्ह आणि उर्गो फिनिश लोकांच्या मिश्रणानें उत्पन्न झालेले आहेत. त्यांची वस्ती मुख्यतः बल्गोरियामध्यें आहे. रूमन किंवा व्लाच जात ट्रन्सिल्व्हॅनिया, दक्षिण हंगेरी, बेस अरेबिया वगैरे प्रांतांत आहे, पण त्यांची बाल्कन द्वीपकल्पांतील संख्या फार लहान आहे. यांची कांहीं वस्ती मासिडोनिया, अल्बेनिया, उत्तर ग्रीस व सर्व्हिया आणि बल्गेरियामध्यें थोडीशी आहे. आल्बेनियन हे प्राचीन इलिरियनलोकांचे वंशज आहेत ते मॉटिनिग्रोच्या दक्षिण सरहद्दीपासून ग्रीसच्या उत्तर सरहद्दीपर्यंत पसरले आहेत. प्राचीन काळीं आशियामायनरमधून आलेले ग्रीक लोक या द्वीपकल्पांत फार प्राचीन काळापासून आहेत. ते ग्रीस व त्या सभोंवतालच्या प्रदेशांत वस्ती करून आहेत. आर्मेनियन, यहुदी व जिप्सी लोकांचीहि तुरळक वस्ती आहे.
भाषा:- तुर्की सत्तेखालीं असतांना ग्रीक व तुर्की या भाषांनां महत्त्व होतें. परंतु इतर भाषाहि जीव धरून होत्या. हल्लीं निरनिराळे लोक आपआपल्या जातीची भाषा बोलतात. यामुळें तुर्की, ग्रीक, सर्व्हिअन, बल्गेरियन, अल्बेनियन इत्यादि भाषा त्या त्या लोकांत अस्तित्वांत आहेत.
बाल्कन द्वीपकल्पांतील लोकांचा इतिहास.- स्लाव्ह लोकांच्या टोळ्या या द्वीपकल्पांत ख्रिस्ती शकाच्या तिस-या शतकांत येण्यास सुरूवात झाली. व त्या यापुढें चार शतकेंपर्यंत एकामागून एक येतच होत्या. त्या वेळीं बायझंटाइन साम्राज्याचा या द्वीपकल्पावर अंमल होता. थ्रेस, इजिरिया वगैरे प्रांतांतले लोक लॅटिन भाषा बोलूं लागले होते. कांहीं थ्रेसमधील लोक डोंगरांत जाऊन राहिले होते. व त्यांचें बरेच दिवस पुढें इतिहासांत नांवच ऐकुं येत नव्हतें. यांचेच वंशज व्लाच या नांवानें प्रसिद्धीस आले. आल्बेनियामध्यें तेथील इलिरियन लोकांनीं कांहीं दिवस डोंगराळ मुलखाचा आश्रय करून आपली भाषा व जात कायम राखली आणि पुढें या आगंतुकांस हांकून दिलें. ग्रीक लोक किना-यांचा व बेटांचा आश्रय करून राहिले. या प्रदेशांत अनेक ग्रामनामें स्लाव्ह भाषेंतील आढळून येतात. ६ व्या शतकांत स्लाव्ह लोकांनीं मोरिया प्रांतांत प्रवेश केला, व तेथें १५ व्या शतकापर्यंत एक स्लाव्ह भाषेचीच पोटभाषा प्रचारांत होती. ७ व्या शतकामध्यें सर्बोक्रोट लोकांनीं वायव्येकडील क्रोएशिया, सर्व्हिया, बोस्त्रिया, हर्जेगोविना, माँटिनीग्रो व उत्तर आल्बेनिया या प्रांतांत प्रवेश केला. त्यांनीं मूळच्या इलीरियन लोकांस हांकून दिलें. अगर आपल्यांत मिसळून टाकलें. त्यांचे वंशज सध्यां मोरलॅक किंवा मब्रोव्लॅच नांवानें ओळखिले जातात. ७ व्या शतकाच्या अखेरीस तुराणी वंशांतील बल्गर लोकांनीं डॅन्यूब नदी उतरून मोएशिया व थ्रेस प्रांतांतील स्लाव्ह लोकांवर आपला अंमल बसविला व पुढें त्यांस आपणांत मिसळून घेतलें. झार क्रुम (८०२-८१५) याच्या नेतृत्वाखालीं त्यांनीं अँड्रियानोपल व मध्यमासिडोनियावर स्वारी केली, व सिमिअनच्या कारकीर्दींत (८९३-९२७) त्यांची सत्ता अँड्रिआटिक समुद्रापासून काळ्या समुद्रापर्यंत पसरली होती. ९७१ मध्यें 'पहिलें बल्गेरियन साम्राज्य' जॉन झिमिसेस या बादशहानें नष्ट केलें; परंतु बल्गेरियन सत्ता पुनः ऑचरिडा येथील शिशमन घराण्यानें स्थापन केली. पुढें हें पश्चिम बल्गेरियन साम्राज्यहि लवकरच लयास गेलें.
व्लाच लोकांनीं प्रथम दहाव्या शतकामध्यें मासिडोनिया व पिंडस प्रांतांत आपली सत्ता स्थापन केली. या प्रदेशास त्या वेळीं ग्रेट वालाचिया म्हणत. सर्व्हिअन लोकहि स्टीफन नेमन्या (११६९-११९५) याच्या निशाणाखालीं एक होऊन आपली सत्ता स्थापन करण्याच्या उद्योगास लागले. दुसरें बल्गेरियन किंवा बल्गरो व्लाच साम्राज्य इव्हा व पीटर असेन नांवाच्या दोन भावांनीं ११८६ मध्यें त्र्नोव्हो नांवाच्या शहरीं स्थापन केलें. १३३० मध्यें सर्व्हिअन लोकांनीं बल्गेरियनांची सत्ता नष्ट करून आपली स्थापन केली. सर्व्हियन लोकांपासून अल्बेनियन लोकांनीं लवकरच सर्व सत्ता हिरावून घेतली. मध्यंतरीं बोस्त्रियन लोकांनीं त्न्क्तो (१३५३-१३९१) नांवाच्या राजाच्या हाताखालीं आपली सत्ता थोडा वेळ स्थापन केली; परंतु निरनिराळ्या संस्थानांच्या आपसांतील वैमनस्यामुळें सर्व राज्यें तुर्की सत्तेस बळी पडलीं. तुर्कांनीं हळू हळू आपली सत्ता सर्व द्वीपकल्पावर स्थापन केली व १४५३ मध्यें कान्स्टंटिनोपल घेऊन वायझंटाइन साम्राज्य नामशेष केलें. त्यांची सत्ता सुलेमांन याच्या कारकिर्दींत (१५२०-१५६६) कळसास पोंचली. पुढें १६८३ मध्यें त्याच्या व्हिएन्ना येथील झालेल्या पराभवापासून तीस हळु हळु उतरती कळा लागली व अठराव्या शतकाच्या उत्तरार्धांत निरनिराळें स्वतंत्र पाशा उत्पन्न झाले.