प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण १९ वें.
यूरोपांतील लहान राष्ट्रांपासून मोठ्या राष्ट्रांचा व प्रांतिक भाषांचा विकास

फिनो उग्रिअन.- फिनोउग्रिअन हे यूरल अलटेक शाखेच्या भाषेचें अथवा भाषा बोलणा-या वंशाचें नांव आहे. या नांवापैकीं पहिला भाग, त्याच्या शेजारच्या लोकांनीं, बालटिक समुद्राच्या पूर्व किना-यावर रहाणारे जे रहिवाशी त्यांनां दिला आहे. कदाचित् टॅसीटस व टॉलेमी यांनीं वर्णन केलेले फेनिलोक व हे लोक एकच असावेत. कदाचित् झाडांत रहाणारे हे लोक असावेत यास्तव यांनां फेन नांव पडलें असावें. फिन आणि फिनिश हा शब्द फिनलंडच्या रहिवाशांनाच लावतात असें नाहीं. तर रशियांत यांच्यासारख्याच ज्या जाती आहेत त्यांनां लावतात. या दृष्टीनें पाहिलें असतां, एस्थोनियन, लॅप्स, चेरेमीस आणि मॉर्रडविनस व पर्मिअन जाती देखील फिन्सच आहेत. परंतु ओस्टियाक, वोगल, आणि मग्यार लोक उग्रिअन या शाखेचे आहेत.

फिनो उग्रिअन हें नांव भाषेवरून पडलें असल्यामुळें विशिष्ट शरीरचना व विशिष्ट चालीरीतीचें दर्शक हें नांव नाहीं. तरीपण भाषेचा प्रश्न सोडून दिला तर हंगेरीयन लोकांशिवाय इतर फिनोउग्रिअन लोक एकवर्गी आहेत यांत शंका नाहीं. ते अगदीं रानटी अवस्थेंतले आहेत; त्यांनीं कोठें शौर्यहि दाखवलें नाहीं. व त्यांनां राजकीय संघटनेचीहि शक्ति नाहीं. जे यूरोपीअन लोकांच्या चालीरितीपासूनच अलिप्त आहेत, त्यांची रहाणी अगदीं साधी असून त्यांच्यामध्यें पितृसत्ताक राज्यपद्धति अस्तित्वांत आहे.

यांचें राहण्याचें मुख्य ठिकाण रशिया आहे. बाल्टिक पासून सायबेरियापर्यंतच्या जंगलांत व विशेषतः सरोवरें व नद्या यांच्या कांठीं ह्यांची वस्ती असते. त्यांच्या ठिकाणीं राजकीय सत्ता नसल्याने त्यांनां फारसें महत्त्व नाहीं. पण रशियाच्या उत्तर, मध्य व पूर्व प्रांतांमध्यें यांची फार संख्या आहे. महारशियन व लघुरशियन यांच्यामध्यें जो फरक दृष्टीस पडतो तो फिनिशरक्ताच्या भेसळीचा परिणाम होय.

फिनोउग्रिक जाती शरीरानें फार बळकट, ठेंगू अगर मध्यम बांध्याच्या व चपट्या असतात. यांची कातडी, पांढरट, डोळे घारे व निळे, केंस थोडे, व दाढी फाच कमी असते. यांच्यामध्यें मानसिक अगर शारीरिक उत्साह यावा तितका दिसून येत नाहीं. ते, मंद आळशी, संशयी, खुनशी, मलूल असे दिसतात. उलटपक्षीं ते, उद्योगी, शांत, विश्वासूक, प्रामाणिक व सत्कार करणारे असतात.