प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण १९ वें.
यूरोपांतील लहान राष्ट्रांपासून मोठ्या राष्ट्रांचा व प्रांतिक भाषांचा विकास
पोर्तुगीज लोक.- पोर्तुगीज लोक हे पुष्कळ जातींचे घटक एकत्र होऊन बनलेले आहेत. आयबेरियन लोक हे पोर्तुगीजांचे अगदीं मूळचे पूर्वज होत. उत्तर पोर्तुगालमधील शेतकरी वर्ग व थोडा फार इतरत्रचाहि शेतकरी वर्ग स्वभावानें, शरीरबलानें, व भाषेनें गॅलिशियन व अस्तुरियन स्पॅनिअर्ड लोकांशीं निकट बांधलेला आहे. उत्तरेकडील पोर्तुगीज लोक गॅलिशिअन व अस्तुरिअन हे स्पॅनिश वंशांतील शुद्ध कुळांचे प्रतिनिधिभूत लोक होत. कार्थेजिनिअन लोक वसाहतीला आले त्यांच्याशीं वरील लोकांचा विवाहसंबंध सर्वांत अगोदर होऊं लागला. कार्थेजिनिअन लोकांमागून ग्रीक लोक वस्तीला आले. यांची थोडी होती. यांजपासून मिळालेले असे कांहीं गुण पोर्तुगीज लोकात आहेत अशी कांहीं लोकांची कल्पना आहे ती चुकीची वाटते. रोमन लोकांकडून पोर्तुगालला त्याची आजची भाषा व आजची संस्कृति प्रथमतः प्राप्त झाली. प्युनिक युद्धानंतर रोमच्या वरिष्ठ सत्तेला ६ शतकें पावेतों विशेष धक्का बसला नाहीं व त्याच्या संस्कृतीची छाप अव्याहत राहिली. तरी पण पोर्तुगीज लोकांच्या मूळ स्वभावांत अथवा शरीरघटनेंत या रोमन लोकांच्या नात्यानें विशेष फरक घडून आला असें म्हणवत नाहीं. या बाबतीत सएविक व व्हिसिगॉथिक सत्ताकाळांत म्हणण्यासारखे टिकाऊ परिणाम झाले. उत्तर भागांत हे परिणाम विशेष दिसतात. इ. स. ७११ नंतर अरब व बर्बर लोकांच्या म्हणजे भूर लोकांच्या वर्चस्वाचा काळ लागतो. टेगस नदीच्या दक्षिणेकडे मूर लोकांचें वर्चस्व सर्वांत अधिक होतें. अलेम्तेजो, अल्गार्व्हे या ठिकाणीं अरब व बर्बर नमुन्याचे लोक पुष्कळ सापडतात. तसेंच इमारती कलाकुसरीचीं कामें व भाषा यांची तपासणी करतां अरब व बर्बर जातींचें कार्य या बाबतींत सर्वत्र दिसून येतें. मूर लोकांचा बौद्धिक विजय इतका पूर्ण व दूरगामी झाला कीं, मोझॅरॅबिक नांवाची एक स्वतंत्र जातच उत्पन्न झाली; व ती अशी होती कीं, तिचें रक्त पोर्तुगीज, तिचा उपासनामार्ग ख्रिस्ती, पण तिची भाषा व चालरीत अरबी. मुसुलमानांचा विशिष्टतासूचक सुंताविधि देखील पुष्कळ मोझॅरॅविक लोकांनीं उचलला. मुसुलमानांच्या राज्यांत धर्मसहिष्णुता बसत असल्यानें पोर्तुगीज यहुदी लोकांनां यूरोपांत इतरत्र कोठेंहि कोणाला मिळवितां आली नाहीं इतकी संपत्ति व संस्कृति मिळवितां आली. या मुसुलमानी काळांत तसेंच पहिला इम्यनुएल (१४९५-१५२१) यानें त्यांनां जबरदस्तीनें धर्मांतर करावयास लावल्यानंतर यहुदी लोकांचीं ख्रिस्ती लोकांशीं लग्नें झालीं. याप्रमाणें यहुदी रक्त पोर्तुगीज रक्तांत मिश्रित झालें. १४५० सालानंतर आफ्रिकन गुलाम पोर्तुगालमध्यें आणूं लागले. या गुलामांची संख्या फार मोठी असे. यामुळें पोर्तुगालमध्यें त्यांच्या वस्तीनें आणखी एक वंशाचें रक्त पसरलें. मध्य व दक्षिण पोर्तुगालमध्यें नीग्रो नमुन्याचे लोक पुष्कळ सापडतात. यूरोपीय जातींनां श्वेतेतर लोकांशीं मिसळून राहण्याचा प्रसंग वारंवार आलेला आहे. अशा प्रसंगांत सर्व यूरोपीय जातींत पोर्तुगीज लोकांनीं व त्यांच्या ब्रेझिलमध्यें गेलेल्या नातेवाइकांनीं सर्वांत अधिक यशस्वितेनें वेळ निभावलेली आहे. दोन्ही देशांत परस्पर विवाह सुरू करून ते निष्प्रतिबंध रीतीनें चालू ठेवण्याची तोड पोर्तुगीज लोकांनें स्वीकारली. या मिश्र विवाहांपासून झालेली प्रजा इतर अशा प्रकारच्या बहुतेक प्रजेहून शीलानें व बुद्धीनें श्रेष्ठ असते असा अनुभव आहे.