प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )

प्रकरण १५ वें. : इतिकर्तव्यता.

उपप्रकरण ९ वें.
आर्थिक उन्नतीचीं अंगें व त्यांची साधना.

ट्रस्ट (निधिसंरक्षक) कंपनी.- अमेरिकेमध्यें हा कंपन्यांचा प्रकार चांगलाच प्रचलित आहे. याचें अस्तित्व यूरोपांत फारसें ऐकूं येत नाहीं याचा मुख्य उद्देश म्हटला म्हणजे अज्ञानाच्या दौलतीची व्यवस्था पाहणें हा होय. या कंपन्यांस यांचें गिर्‍हाईक असणारा इसम आपल्या मृत्युपत्रांमध्यें व्यवस्थापक नेमतो आणि त्यामुलें अज्ञानाच्या इस्टेटीची व्यवस्था हातीं घेण्यास त्यांस अधिकार उत्पन्न होतो. पुष्कळदां इस्टेटवाले असें करितात कीं, आपला कोणी आप्त (बायको वगैरे) आणि ट्रस्ट कंपनी या दोघांस आपल्या इस्टेटीचे ट्रस्टी नेमतात. कंपनी तिच्यांतील व्यक्ती मृत झाल्या तरी चालूच राहते, असें असल्यानें इस्टेटीची व्यवस्था पाहणार्‍या संस्थेंत एक कंपनी असल्यास त्या संस्थेला कायमपणा असतो. मनुष्याच्या शाश्वतीपेक्षां कंपनींत शाश्वती अधिक असते हा कंपनीकडे दौलतीची व्यवस्था सोंपविण्यांत एक फायदा असतो व दुसरा फायदा म्हणजे प्रत्येक व्यवहार कसा करावा हें काम तज्ज्ञाकडे असल्यानें लवकर होतें. उदाहरणार्थ, मृताच्या विम्याचा पैसा घ्यावयाचा असला तर मृताच्या आप्तास किंवा ज्यांच्या फायद्याकरितां विमा उतरला असेल त्यांस अतिशय त्रास पडतो. परंतु विम्याचे पैसे वसूल करण्यास या निधिसंरक्षक कंपनीस असा त्रास पडत नाहीं. मृताची पत्‍नी जर व्यवस्थापक असली तर कौटुंबिक गरजा तिला चांगल्या समजतील आणि ट्रस्ट कंपनीस त्या गरजांप्रमाणें व्यवस्था लावण्यास व्यावहारिक उपाय कोणते योजावेत हें चांगलें समजेल आणि या प्रकारच्या फायद्यामुळें आपल्या इस्टेटीची व्यवस्था पाहण्याचें काम पत्‍नी व ट्रस्ट कंपनी या दोघांकडे देण्याची वहिवाट ठिक आहे. ट्रस्ट कंपन्यांकडून काम करून घ्यावयाची पद्धत केवळ अज्ञानाच्याच हिताकरितां आहे असें नाहीं तर सज्ञानासहि तिची मदत होते. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीची इस्टेट एके ठिकाणीं आहे आणि नोकरी दुसरीकडे आहे, अशा स्थितींत त्याला आपल्या इस्टेटीची व्यवस्था पाहण्याचें काम ट्रस्टकंपनीकडे सोंपवितां येतें. इस्टेटीची व्यवस्था पाहणें हें काम ट्रस्टकंपन्या करितात, पण त्यास मर्यादा आहे. उदाहरणार्थ, ट्रस्टकंपन्या अज्ञानाकरितां दुकान चालवूं शकणार नाहींत किंवा त्याच्याकरितां त्याचें शेत पिकवूं शकरणार नाहींत. त्या फार तर दुकानाचा विक्रय करतील, पैसे जमा करतील, शेअर्सवरील मुनाफा वसूल करतील, शेत खंडानें देऊन खंड घेण्याची व्यवस्था करतील, घरें व चाळीं यांचें भाडें वसूल करतील; पण यापलीकडे त्यांनां कांहीं करितां येणार नाहीं. थोडक्यांत सांगावयाचें म्हणजे हिंदुस्थानांत कोर्ट ऑफ वार्डसमध्यें जें काम होतें तें अमेरिकेंत ट्रस्टकंपन्या करितात.

बँकाचा धंदा व ट्रस्टकंपन्यांचा धंदा यांत फरक आहे. ट्रस्टकंपन्या, ज्यांची रकमा वारंवार काढण्याची प्रवृत्ति असेल अशा ठेवी ठेवणारांचीं खातीं आपणांकडे उघडीत नाहींत तर साधारणपणें सेव्हींग बँकेमध्यें पैसे ठेवणारा जो वर्ग असतो त्या वर्गाच्या ठेवी आपणांकडे ठेवतात. बँका व ट्रस्टकंपन्या यांच्यांतील दुसरा फरक म्हटला म्हणजे बँका पुष्कळ दिवस म्हणजे वर्षेंच्या वर्षें कर्जाऊ रकमा देत नाहींत, पण ट्रस्टकंपन्या दहा किंवा वीस वर्षांत फेड करण्याच्या शर्तींचे म्हणजे लांब मुदतीचे कर्जरोखे करून घेऊन पैसे देतात. कां कीं, जो वर्ग व्यापार करीत नाहीं पण संचय करीत आहे आणि ज्याची दृष्टी आपले पैसे अनेक वर्षें गुंतविले जाऊन व्याज सारखें मिळत रहावें अशी आहे अशांच्याच रकमा ट्रस्टकंपन्यांकडे असतात. जी जामिनकी रोकडीच्या स्वरूपांत ताबडतोब आणतां येणार नाहीं. अशा जामिनकीवर पैसे देण्याची प्रवृत्ति बँकांनां नसते, पण ट्रस्टकंपन्या तसल्या प्रकारची जामिनकी घेऊन पैसे देऊं शकतात. ट्रस्टकंपन्यांचे पक्षकार किंवा खातेदार बँकांच्या खातेदारापेक्षां अर्थात् निराळे असतात. त्यांचें साधारणतः वर्गीकरण येणेंप्रमाणें.

१ इन्शुरन्स कंपन्या.
२ संचय करूं इच्छिणारा आणि कायमच्या ठेवी ठेवूं इच्छिणारा वर्ग.

ट्रस्ट कंपन्यांकडून पैसा घेऊं इच्छिणारें वर्ग येंणेंप्रमाणें.
१ जमीन गहाण टाकून तिजवर रकम मागणारा वर्ग.
२ मोठमोठ्या इमारती बांधणार्‍या कंपन्या.
३ डिबेंचर्स म्हणजे गहाणाचे कर्जरोखे देऊन पैसा काढून त्याजवर धंदे करणार्‍या कंपन्या.

ट्रस्ट कंपन्या या दुसर्‍यांचें विशिष्ट काम करून देणारे एजंट असतात. ज्यांस रकम उभी करावयाची असेल अशा रेल्वे कंपन्या वगैरेचे शेअर किंवा डिबेंचर्स विकण्याचें काम या कंपन्या करतात. कां कीं, कायमच्या ठेवी ठेवूं इच्छिणार्‍या रोकडवाल्यांशीं त्यांचा संबंध असतो.

न्यूयॉर्क संस्थानामध्यें हुंड्या वटविण्यास त्यांस मनाई आहे; पण हुंड्या विकत घेण्यास त्यांस मनाई नाहीं. कां कीं, ट्रस्ट कंपन्याचें उद्दिष्ट हुंड्यांचा व्यापार करणें नसून रकमा गुंतवून व्याज घेणें हेंच असलें पाहिजे असें त्या संस्थानांतील कायद्याचें ध्येय आहे.

भांडवलाचें एकीकरण करण्यासाठीं जे महासंघ तयार होतात त्यांची स्थूल माहिती होण्यासाठीं महासंघ अथवा ट्रस्ट आणि होल्डिंग कार्पोरेशनची माहिती अवश्य आहे.