प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )
प्रकरण १५ वें. : इतिकर्तव्यता.
उपप्रकरण ९ वें.
आर्थिक उन्नतीचीं अंगें व त्यांची साधना.
महासंघ.- आजकालच्या दिवसांत कोणतीहि गोष्ट लहानसहान प्रमाणावर यशस्वी रीतीनें चालवितां येत नाहीं म्हणून अनेक जणांच्या भांडवलांचें एकीकरण होऊं लागलें आहे. अनेक भागीदार मिळून धंदा केला आणि तो धंदा करणारा संघ हीच एक व्यक्ति बनली म्हणज तिला आपण कंपनी म्हणतों. अशा अनेक कंपन्या एकत्र झाल्या म्हणजे त्याला ट्रस्ट असें म्हणण्याची पद्धति आहे. संघ करण्याचे हेतू दोन असतात. एक तर धंदा मोठ्या प्रमाणावर केल्यामुळें होणारी काटकसर संपादन करणें आणि दुसरा हेतु म्हटला म्हणजे त्या धंद्यांतील लोकांचें एकीकरण केल्यानें त्या व्यापारास मक्त्याचें स्वरूप आणणें. या प्रकारच्या संघाची घटना अमेरिकेंत फार झाली आहे आणि त्यामुळें इतर लोकांचे व्यापार चिरडून टाकण्याची अमेरिकन लोकांची शक्ति वाढली आहे. उदाहणार्थ, तेल किंवा पोलाद यांची गोष्ट घ्या. हें पोलाद अमेरिकेच्या एका मोठ्या कंपनीनें आपलेसें करून घेतलें आहे. देशांत उत्पन्न होणार्या बहुतेक पोलादावर एक कंपनी स्वामित्व गाजविते. तीच गोष्ट तेलाची व तीच गोष्ट बर्याच अंशीं तंबाखूची. या अनेक कंपन्यांचें एकीकरण होऊन नंतर त्या मोठ्या होतात. ज्या कंपन्यांचें एकीकरण होतें त्यांचा धंदा एक तर समान असतो अगर अन्योन्याश्रयी असतो. छापखाना, दैनिकपत्र, कागदाची गिरणी आणि ज्या लांकडापासून कागद करतात त्या लांकडाचें अरण्य या सर्व गोष्टी अन्योन्याश्रयी आहेत; आणि यांच्या एकीकरणामुळें धंद्यांत विलक्षण काटकसर होते आणि त्यांच्यांशीं स्पर्धा करणें इतरांस जड जातें. सर्वच छापखाने एकाच व्यक्तीनें ताब्यांत घ्यावयाचे हा दुसरा प्रकार झाला. याच्यायोगानें गांवांतील छपाईच्या कामाचा मक्ता एकाच व्यक्तीस मिळाल्यासारखा होतो. मग ठरेल तो दर निमुटपणानें दिल्याशिवाय गिर्हाइकास गत्यंतर नाहीं.
मक्ता उत्पन्न करण्यासाठीं जो संघ करावयाचा तो वाटेल त्या गोष्टीचा करतां येत नाहीं. छापखान्यांचा संघ करून काय उपयोग? हा फार तर १।२ वर्षें टिकेल. दुसरा निराळाच मोठा छापखाना तेथें आला कीं, याचें मक्त्याचें स्वरूप गेलेंच. येथें स्पर्धेची भीति नाहीं असें नाहीं, परंतु खाणीची गोष्ट तशी नाहीं. ज्या खाणी आहेत त्या ताब्यांत घेतल्या किंवा त्या खाणीच्या मालकांनीं संघ केला म्हणजे त्यापुढें कांहींच इलाज नाहीं. जेथें स्पर्धेची भीति असेल तेथें मक्ता होत नाहीं असें नाहीं. नवीन भांडवल येऊन तेथें नवीन कारखाना निघेपर्यंत त्याला मक्त्याचें स्वरूप ठेवतां येईल आणि बाल्यावस्थेंत असलेल्या दुसर्या कारखान्यांस अतिशय हलके दर लावून चिरडून टाकतां येईल.
अमेरिकेंत जे असे मोठाले संघ झाले त्यामुळें अमेरिका देशाचें फार नुकसान होत आहे अशी अमेरिकन लोकांची ओरड आहे. धंद्याला मक्त्याचें स्वरूप आलें म्हणजे नुकसान होणार गिर्हाइकांचें. त्यामुळें गिर्हाइकांनां अर्थात् आपणांवर कंपनी जुलुम करीत आहे असें वाटतें. स्टँडर्ड ऑईल कंपनी दरसाल दरशेंकडा ४० मुनाफा देते. एकदां स्टँडर्ड ऑईल कंपनीस दोन कोट रुपयांच्या वर दंड झाला होता. त्यानंतर कंपनीनें तेलाचा भाव वाढवून दिला, तेव्हां हा दंड सरकारानें कंपनीस केला कीं लोकांनां केला अशी चर्चा तेथील वर्तमानपत्रांत चालू होती. यामुळें लोकांची महासंघाविरुद्ध वृत्ति आहे आणि या संस्थांचें दमन कसें करावें यासंबंधानें अनेक पुस्तकें लिहिलीं आहेत. या महासंघाविषयीं अमेरिकेंत अतोनात वाङ्मय वाढलें आहे आणि या वाङ्मयाचा आढावा हारवर्ड युनिव्हर्सिटींतील प्रो. बुलक यांनीं आपल्या लेखांत घेतला आहे. या महासंघांचें दमन कसें काय करावें या विषयावर आणि हे महासंघ देशास हितकारक आहेत कीं अहितकारक आहेत यासंबंधानें जे ग्रंथकार लिहिल आहेत त्यांत प्रो. एली (Ely), प्रो. जेंक्स, मि. मीड इत्यादि लेखक प्रमुख होत. संयुक्त संस्थानांचें या महांसंघामुळें कल्याण अगर अकल्याण झालें याचा तात्त्विक विचार करण्याचें प्रयोजन नाहीं. येथें एवढेंच सांगितलें पाहिजे कीं बहुतेक लेखकांची दृष्टी जनता व महासंघ हे परस्परविरोधी आहेत व आपण जनतेचे अंश आहोंत अशा प्रकारची आहे; आणि प्रो. बुलक यांनीं जो आढावा घेतला आहे त्यांत हे महासंघ फार नफा खातात यावरच विशेष जोर दिला आहे.
या महासंघांच्या संबंधानें भारतीयांची दृष्टी निराळ्या प्रकारची असली पाहिजे. अमेरिकेंतल्या लहानसहान संस्थांस हे महासंघ चिरडून टाकतील तर त्याबद्दल आम्हांस बिलकूल दुःख नाहीं. आम्हांस या महासंघांचें भय निराळ्याच कारणामुळें आहे. तें कारण म्हटलें म्हणजे ज्या अमेरिकेंतल्या कंपन्यांनां या महासंघांपुढें टिकाव धरतां येत नाहीं त्याच कंपन्या आम्हां भारतीयांच्या दृष्टीनें फारच मोठाल्या व अजस्त्र आहेत आणि त्यांस चिरडून टाकणारे हे महासंघ इतर देशांतील उत्पादकांस व कारखानदारांस सहज चिरडून टाकतील हें होय. आपणांस स्वसंरक्षणासाठीं तरणोपाय म्हटला म्हणजे भांडवलाचें एकीकरण करून धंदे चालविणें आणि त्यांचेंहि एकीकरण करून महासंघ होऊं देणें हाच आहे. संघ जर व्यक्तीस चिरडणारे असतील तर आपल्या देशांतीलच संघांनीं व्यक्तींस चिरडणें हें परक्या देशांतील संघांनीं आमच्या देशांतील व्यक्तींस चिरडण्यापेक्षां पुष्कळ चांगलें. अर्थात्, आपणांस या महासंघांच्या घटनेकडे अनुकरणेच्छूच्या जिज्ञासेनें पाहिलें पाहिजे.
अमेरिकन लोकांची या महासंघांविरुद्ध असलेली बुद्धि प्रथमतः एका कायद्यानें कृतींत उतरली. तो कायदा शर्मन (Sherman) नांवाच्या गृहस्थानें पुढें आणला म्हणून त्यास शर्मनचा अँटी-ट्रस्ट कायदा असें म्हणतात. तो कायदा निरनिराळ्या संघांनीं एकीकरण करण्याच्या विरुद्ध होता. व्यापाराला विघातक अशीं जीं जीं एकीकरणें होतील तीं तीं एकीकरणें अमेरिकेच्या शासनघटनेच्या विरुद्ध आहेत असें तत्त्व अमेरिकेच्या शासनघटनेच्या आदिसूत्रांत गोंवलें गेलें आहे. त्या तत्त्वांनुरूप हा कायदा होत आहे अशी त्यावेळेस लोकांची व कायदे करणारांचीहि भावना होती. तथापि हें कायद्याचें ध्येय भांडवलवाल्यांनीं निराळीच एक खुबी करून फेंटाळून लावलें आणि शर्मनचा कायदा नाहींसारखाच केला. भांडवलवाल्यांनीं असें केलें: न्यू जर्सी संस्थानांत असा कायदा करून घेतला कीं, एका कंपनीनें दुसर्या कंपनीमध्यें शेअर घेण्यास हरकत नाहीं. याचा परिणाम असा झाला कीं, न्यू जर्सी संस्थानांत बहुतेक सर्व मोठ्या कंपन्या रजिष्टर झाल्या आणि त्या कंपन्यांवर राज्य चालविण्याचा मुनाफा कराच्या रूपानें न्यू जर्सी संस्थानास मिळाला. एका इमारतीला शें दोनशें कंपन्यांच्या पाट्या लागावयाच्या असे प्रकार न्यू जर्सी संस्थानांत सुरु झाले. कंपनीचें रजिस्टर्ड ऑफिस म्हणजे एक नांवाची पाटी न्यू जर्सी संस्थानांत आणि कंपनीचें खरेंखुरें ऑफिस व धंदा कंपनीस वाटेल तेथें अशा प्रकारची स्थिति आज तेथें आहे. ज्या संस्थानांत कंपन्यांच्या व्यवहाराला फायदेशीर कायदे असतील अशा संस्थानांमध्यें कंपन्या रजिष्ट करून घेण्याचा धंदा सुरू झाला. जर कोणास अरिझोन वगैरे संस्थानांत एखादी कंपनी रजिष्टर करून पाहिजे असेल तर त्यानें असल्या कंपनी रजिष्टर करणार्या लोकांस जर कांहीं रक्कम भरली तर त्या मनुष्याला कंपनीला लागणार्या सर्व गोष्टी पुरवून कंपनी रजिष्ट करून त्याचें सर्टिफिकीट ते लोक आणून देतात. पहिले नामधारी डायरेक्टर किंवा कंपनीचे संस्थापकसुद्धां ते लोकच पुरवितात. असो.
शर्मन अँटी-ट्रस्ट अॅक्ट न्यू जर्सीनें कुचकामाचा कसा केला हें वर सांगितलेंच आहे. तथापि तो कायदा पास झाल्यानंतर जी महत्त्वाची घडामोड झाली आणि ज्या गोष्टींचा उदय झाला त्यांत ‘होल्डिंग कॉर्पोरेशन्स’ (Holding Corporations) चा प्रमुखत्वानें उल्लेख केला पाहिजे. या कंपन्या दुसरा तिसरा धंदा न करतां दुसर्या कंपन्यांचे भाग घेणें आणि भागांवर येणारा मुनाफा वांटून घेणें हाच धंदा करतात. अशा कंपन्या करण्यांत फायदा आहे तो असा. समजा, एखाद्या कंपनीचे भाग हजार हजार रुपये किंमतीचे आहेत तर दहा रुपये गुंतवूं इच्छिणार्यास त्या भागावरील मुनाफा कसा मिळवितां येईल? अशावेळीं त्यांनें होल्डिंग कॉरपोरेशनचे शेअर घेतले आणि होल्डिंग कॉरपोरेशननें ते मोठाले शेअर घेतले म्हणजे हा थोडक्या रकमेचा मनुष्य देखील ज्यांचे भाग मोठाले आहेत अशा कंपन्यांच्या मुनाफ्याचा अंशभाक् होईल. दुसरा फायदा म्हटला म्हणजे ज्याअर्थीं ही होल्डिंग कॉरपोरेशन निरनिराळ्या कंपन्यांचे शेअर विकत घेते त्याअर्थीं होल्डिंग कॉरपोरेशनमध्यें शेअर घेणार्याचे पैसे अधिक सुरक्षित होतात व रकमेचें जोखीम इतक्या निरनिराळ्या लोकांवर वांटले जातें. होल्डिंग कॉरपोरेशनपासून होणारा तिसरा मोठा फायदा म्हटला म्हणजे निरनिराळ्या कंपन्यांचा जो महासंघ बनवावयाचा तो संघ बनविण्याची एक नवीन पद्धति निर्माण झाली. निरनिराळ्या कंपन्यांचें एकीकरण करावयास त्या कंपन्यांचें वैशिष्ट्य घालवून एकीकरण करावयाचें असें न करतां त्यांचें वैशिष्ट्य कायम राखून त्यांचें एकीकरण करणें सुलभ झालें; आणि थोडक्या भांडवलांत कंपनीचा सबंध ताबा हातीं घेण्याची संधि उत्पन्न झाली. समजा, बडनेरा मिल, पुलगांव मिल व हिंगणघाट मिल या सर्वांचें एकीकरण करावयाचें आहे तर हें एकीकरण करतांना प्रत्येक कंपनीच्या जनरल मीटिंगमध्यें ठराव पास झाला पाहिजे. शिवाय प्रत्येक कंपनीच्या भागांची किंमत या नवीन संघांत किती घालावयाची यासंबंधानें वाद जरा जास्त लांबेल. पुन्हा या सर्वांचें भांडवल एकत्र केलें म्हणजे सर्वाधिकार कोणास द्यावा यासंबंधानें आंत कारस्थान सुरू झालेंच. परंतु होल्डिंग कॉरपोरेशनमुळें या सर्व गोष्टींचा तंटा मिटतो. एखादी होल्डिंग कॉरपोरेशन तयार होते, ती बाजारभावाप्रमाणें दुसर्या कंपन्यांतील शेअर विकत घेते, प्रत्येक कंपनींत मताधिक्य करून कारभार आपल्या हातातं घेते आणि हिचेच चालक त्या सर्व कंपन्यांचे चालक बनतात. जर वर सांगितलेल्या तिन्ही कंपन्यांचें एकीकरण झालें तर अर्थात् त्यामध्यें आपआपसांत स्पर्धा रहात नाहीं व उत्पादन करावयाच्या मालाचें वाटल्यास विशिष्टीकरण करतां येतें. प्रत्येक गिरणीनें सर्व प्रकारचा माल न काढतां निरनिराळ्या गिरण्यांनीं निरनिराळ्या प्रकारचा माल काढावा असें करतां येईल.