प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )

प्रकरण १५ वें. : इतिकर्तव्यता.

उपप्रकरण ९ वें.
आर्थिक उन्नतीचीं अंगें व त्यांची साधना.

व्याजापेक्षी सावकारी.- सावकारीमध्यें आणखी एक भेद केला पाहिजे तो हा कीं गहाणवस्तूच्या उत्पन्नांतून व्याजाची अपेक्षा करणारी सावकारी आणि मुद्दलादाखल आणि व्याजादाखल किंमतीच्या तथापि अनुत्पादक वस्तू जमानत म्हणून घेऊन केली जाणारी सावकारी. जमिनीवरील सावकारी बर्‍याच अंशीं उत्पन्नावर रचलेली सावकारी असतें; म्हणजे केवळ भूमिभक्षणाचा हेतू न धरतां आपल्या मुद्दलावर आपल्यास व्याज मिळावें या हेतूनें जेव्हां सावकार रकमा देतो तेव्हां तो अर्थात् त्या जागेपासून उत्पन्न होण्याची शक्यता पाहतो. चाळीवर दिलेल्या रकमा ही सावकारी देखील याच वर्गांत मोडेल. परंतु मोठ्या श्रीमंत लोकांनीं किंवा श्रीमंतीचा आव घालूं इच्छिणार्‍यांनीं आपल्यास राहण्यासाठीं जे टोलेजंग वाडे बांधले असतील पण ज्या वाड्यांतून उत्पन्न निघण्याची सोय बेताचीच असेल म्हणजे उत्पन्न निघालें तरी तें शेंकडा तीन टक्के देखील निघण्याचा संभव नसेल, त्या वाड्यांवर जो सावकार व्याज मिळविण्याची अपेक्षा धरतो अशाकडून रकमा मिळण्याचा संभव नाहीं. केवळ एखादा भूमिभक्षक सावकारच असला वाडा वगैरे मालमत्ता आपल्या तावडींत घेण्याच्या इच्छेनें त्यावर रकमा देईल; आणि दरसाल व्याज मिळण्याचा संभव नसल्यानें आणि पुढें कबजा घेण्यासाठीं खटले करावे लागण्याचा संभव असल्यामुळें तो व्याजहि बरेंच आकारील. प्रत्येक व्यहारामध्यें हा एक नियम लक्षांत ठेवावा कीं जेव्हां मालमत्तेपासून वार्षिक उत्पन्न बेताचेंच असेल तेव्हां तिची किंमत कितीहि मोठी असली तरी तिची पत रोकड बाजारांत थोडीच असणार.

कबजेगहाणाची सावकारी याच म्हणजे ‘भक्षक’ वर्गांत मोडते. ज्या वस्तूंपासून वार्षिक उत्पन्न होत नाहीं परंतु ज्यांची किंमत मोठी आहे अशा गोष्टी म्हणजे दागिने, सोनें, घड्याळें, पिआनो वगैरे प्रकारच्या मौल्यवान् जिनसा सावकारास बहुतेक प्रसंगीं कबजांतच घ्याव्या लागतात. कां कीं, मालकास त्या वस्तूंच्या अस्तित्वापासून उत्पन्न होत नसतें; आणि शिवाय मुद्दल आणि व्याज मिळून जर रास वाढत गेली आणि ऋणकोस पैसा देणें अशक्य झालें तर ऋणको ती वस्तु लांबवील असाहि संभव महाराष्ट्रांत असतो. आणखी एक थोडीबहुत साहसाची सावकारी सांपडते. ती म्हटली म्हणजे बड्या बापाच्या बेट्यास त्याच्या भावी इस्टेटीच्या कबजावरच पैसा देणें ही होय. या सावकारींत कायद्याच्या भानगडी पुष्कळ असतात. पुष्कळदां हें कर्ज कोर्टामार्फत वसूल होणेंहि शक्य नसतें आणि यामुळें सावकारस बरेंच मोठें जोखीम अंगावर घ्यावें लागतें. उधळपट्टी करणार्‍या तरुण मुलांस गांठून त्यांस जे रकमा देतात ते दिलेल्या रकमेच्या चौपट किंवा पांचपट रकमेचें खत लिहून घेतात; आणि कुळाची बेअब्रु करण्याचा धाक घालून यांस आपली रक्कम वसूल करून घ्यावीं लागते. अशा प्रकारचे सावकार सर्व देशांत आहेत आणि इंग्लंडांत जाणारे हिंदुस्थानी राजपुत्र बरेच वेळां असल्या सावकारांच्या तावडींत सांपडण्याचा संभव असतो.

कांहींच जमानत नसतांना देखील लहान सहान रकमा कर्जाऊ देणें म्हणजे बिनजमानतीची सावकारी देशांत थोडक्या प्रमाणानें चालू आहे. असल्या प्रकारच्या सावकारीमध्यें देण्याची रक्कम पांच दहा रुपये फार तर असते. गरीब मजूर वर्गास केवळ आपल्या वेतनाच्या जोरावर पैसा काढावा लागतो आणि त्यांस महिन्याचें कधीं कधीं रुपयास एक आणा व्याज द्यावें लागतें. डोक्यावर माल घेऊन विकणार्‍या लोकांस देखील सुमारें याच दरानें पैसे काढावे लागतात आणि कधीं कधीं तर रुपयास एक आणा रोज याप्रमाणें व्याज भरावें लागतें.

सावकारी आणि दुकान हे दोन धंदे पुष्कळदां एकत्र सांपडतात. ज्यापाशीं कांहीं एक नाहीं अशा पण कामवाल्या मनुष्यास रोजचा २५।३० रुपयांचा माल देऊन रोजच्या उत्पन्नांतून ते पैसे वसूल करण्याची रीत आहे. मुंबई, पुणें येथील चहाच्या दुकानांत असल्या प्रकारची सावकारी चालते. महिन्याचें भाडें ठरलें असेल त्याप्रमाणें घरवाला रोजचे दोन तीन रुपये वसूल करतो आणि वाणी आपल्या सामानाचे पैसे रोज घेऊन जातो.