प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )

प्रकरण १५ वें. : इतिकर्तव्यता.

उपप्रकरण ९ वें.
आर्थिक उन्नतीचीं अंगें व त्यांची साधना.

पातीची सावकारी.- सावकारी व दुसरा धंदा यांचें एकीकरण जेथें झालें आहे असा आणखी प्रकार म्हटला म्हणजे आपल्या पैशानें काम करणार्‍या मनुष्याबरोबर सावकारानें समाइकीनें व्यापार करणें किंवा कंत्राटें वगैरे घेणें. या प्रकारच्या धंद्यांत व्यवहार साधारण येणेंप्रमाणें असतो. सावकार आपल्या रकमेस सुमारें आठ आण्यापासून बारा आणेपर्यंत व्याज लावतो; काम करणारा मनुष्य आपल्या महिन्याचा अत्यंत आवश्यक तेवढा खर्च धंद्यांतून काढून घेतो; सावकार आपला कारकून धंद्याचे जागीं पाठवितो आणि त्याजकडून हिशेब ठेवितो व याप्रमाणें धंद्यांतून येणारें उत्पन्न सावकार व काम करणारा हे दोघे समाइकीनें वांटून घेतात.

सावकार आणि पैसे वापरणारा मनुष्य यांस एकमेकांच्या धंद्याची आणि वृत्तींची जितकी अधिक माहिती होते तितका दोघांमधील व्यवहार अधिक सोपा होतो आणि यामुळें सावकारीचें विशिष्टीकरण प्रगमनशील देशांत बरेंच झालेलें आहे. घरें बांधणार्‍या धंद्याचे सावकार निराळे, वाण्याच्या धंद्याचे सावकार निराळे आणि ग्रंथप्रकाशनादि धंद्यांतले सावकार निराळे. अशी या देशांत व्यवस्था आहे सावकार जितका बहुश्रुत असेल, म्हणजे पैसे मागण्यास ज्या धंद्यांतील माणसें त्याजकडे येतात त्या धंद्यांचें जितकें सूक्ष्म ज्ञान त्यास असेल तितकी त्यास पैसे देतांना भीति कमी वाटेल. उदाहरणार्थ, एल् एल्. बी. च्या परिक्षेस जाणारा विद्यार्थी कर्जाऊ रकमेकरितां एखाद्या वकिलाकडे गेला तर त्यास पैसे लवकर मिळतील परंतु तोच जर एखादा वाणी आपलें दुकान वाढविण्याकरितां पैसे मागण्यास वकिलाकडे गेला तर त्यास त्याजकडून पैसे मिळविणें अधिक कठिण जाईल. परंतु आजकालच्या सावकारी धंद्यांत असलेल्या मारवाड्याकडे हीं दोन्हीं माणसें गेलीं तर दोघांसहि सारखाच विरुद्ध अनुभव येण्याचा संभव आहे. आपल्या देशांतील सांपत्तिक वृद्धि होण्यास सावाकारांचा वर्गहि काम करणार्‍या लोकांबरोबर सुशिक्षित झाला पाहिजे. नवीन अपरिचित धंद्यांत पैसे घालण्यास लोकांची प्रवृत्ति होत नाहीं. उदाहरणार्थ, उद्यां अमेरिकन एक्सप्रेस कंपनीसारखी एका मनुष्याच्या ठिकाणापासून दुसर्‍या मनुष्याच्या ठिकाणापर्यंत मालाची किंवा लहानसहान वस्तूंची नेआण करण्याचा धंदा करण्याची कंपनी काढावयाचें कोणीं मनांत आणलें तर स्थानिक सावकाराकडून त्यास कितपत साहाय्य होईल याची बरीच शंका आहे. तसेंच ज्या धंद्यांत भौतिक शास्त्रांचें ज्ञान विशेष लागतें त्या धंद्यांत पैसे घालण्याइतके म्हणजे उदाहरणार्थ, कोलटारपासून अनेक द्रव्यें काढावयाच्या धंद्यांत पैसे घालण्याइतके सुशिक्षित असे सावकार आज किती आहेत हें सांगतां येणार नाहीं. तथापि असे सावकार शोधूं गेल्यास त्या कामीं अगदींच अपयश येईल असें मात्र वाटत नाहीं. रासायनिक धंद्यांमधील त्या व्यवहाराची पूर्वीं कांहींएक माहिती नसलेल्या कांहीं लोकांनीं तो व्यवहार समजून त्यांत पैसे घातले आहेत आणि यामुळें असा नवीन व्यवहार करणारास आज एकदम निराश होण्याचें कारण नाहीं.