प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )

प्रकरण १५ वें. : इतिकर्तव्यता.

उपप्रकरण ९ वें.
आर्थिक उन्नतीचीं अंगें व त्यांची साधना.

महासंघ आणि चढाओढ.- महासंघांचा उपयोग स्पर्धा नाहींशी करून धंद्याला मक्त्याचें स्वरूप आणण्याकडे होतो हें सांगितेलें आहे.

बाजारांत येणारा तयार माल एकाच प्रकारचा असला व गिर्‍हाइकांस अमुक माल कोणत्या प्रतीचा आहे हें चटकन समजणें शक्य असलें व असा माल बाजारांत मोठ्या प्रमाणावर घाऊक खपत असला तर असा माल तयार करणार्‍या कंपन्यांमध्यें साहजिकच चढाओढ लागते; आणि त्याचा परिणाम मालाच्या किंमतीवर होतो. साखर, तेल, दारू, मीठ हीं उदाहरणें या सदराखालीं येतात. कोणता माल उच्च प्रतीचा आहे हें गिर्‍हाइकास लवकर ओळखतां येतें व जो उत्तम माल सर्वांत कमी किंमतीस देईल त्याच्याच मलाचा अर्थात् जास्त खप होईल. साधारणपणें कमी किंमतीचा व चिल्लर खपणारा माल जो असतो त्याचीं निरनिराळ्या आकाराची पुडकीं कारखानदार तयार करतो व हीं पुडकीं गिर्‍हाइकास लवकरच माहित होतात. कांहीं माल निरनिराळ्या छापाखालीं व ट्रेड मार्कखालीं खपतो व हाहि माल लवकरच गिर्‍हाइकाच्या परिचयाचा होतो. वर सांगितलेल्या प्रकारच्या मालांतहि निराळ्या रीतीची चढाओढ होणें शक्य असतें. एखाद्या कारखानदाराच्या मालाची प्रसिद्धि होऊन त्या मालाचा बाजारांत एकदां जम बसला म्हणजे गिर्‍हाइक विशेष चौकशी न करतां त्या मालाची खरेदी करीत असतें व त्या किंमतीस स्वाभाविक किंमतीचें स्वरूप येतें. अशा कारखानदारास जर कोणी बाजारांत प्रतिस्पर्धी भेटला तर कारखानदारास किंमत कमी न करतां जाहिरातीचा खर्च जरा अधिक वाढवितो. साबण, कॅमेरे, कॉफी, पेटंट औषधें इत्यादि माल या सदरांत येतो. ज्या मालाच्या चढाओढीमुळें किंमतीतं चढउतार होण्याचा संभव असतो असा माल तयार करणार्‍या कारखान्यांचा संघ करून बाजारांतून प्रतिस्पर्धी काढून टाकणें व मग ज्या रीतीनें फायदा पडेल अशा मालास किंमती लावणें शक्य असतें. दुसर्‍या प्रकारच्या मालाच्या कारखानदारांनीं जर संघ केला तर प्रत्येक कारखानदारास आपला माल खपविण्याकरितां करावा लागणारा जाहिरात वगैरे खर्च वांचेल आणि अशा रीतीनें किंमत न वाढवितां धंदा किफायतशील करतां येईल.

चढाओढ करण्यापेक्षां संघ स्थापन करून जे फायदे आहेत व ज्यामुळें हे महासंघ स्थापन झाले ते येणेंप्रमाणें:-

१ विक्रीखर्च बराच कमी होतो. वर जे दुसर्‍या प्रकारचे धंदे सांगितले त्या धंद्यांतील मालाचा खप करण्या करतां जाहिरातीचा अतोनात खर्च करावा लागतो. ज्या अमेरिकन मासिकांचा फार खप आहे अशा मासिकांत कारखानदारास जाहिरात द्यावयाची असली तर एका अंकांत जाहिरात छापून येण्याकरतां शंभर डॉलरपासून कधीं कधीं चारशें डॉलरपर्यंत आकार भरावा लागतो. या एकाच गोष्टीवरून जाहिरातींचा खर्च किती होत असतो याची स्पष्ट कल्पना यईल. दुकानांतील किंवा वखारींतील गिर्‍हाइकांस माल दाखविण्याकरितां जी जागा केलेली असते ती सर्वांगसुंदर व मोहक करण्याकरितांहि पुष्कळ पैसा खर्च होत असतो. तसेंच सर्व देशभर, भिंतीवर, रेल्वेलाइनीवर, शेजारीं असणार्‍या इमारतींवर जाहिराती चिकटविणें इत्यादि उदाहरणें यासंबंधाचीं देतां येतील.

२ विक्री करण्याकरितां मालखपवे पाठवावे लागतात. त्यांचा पगार व प्रवासखर्च कारखानदारावरच पडतो. हा सर्व खर्च कारखानदारावरच पडतो. हा सर्व खर्च महासंघ स्थापन केल्यावर त्या मानानें कमी होतो.

३ जेव्हां एका संघाखालीं असलेले कारखाने चोहोंकडे देशांत पसरलेले असतात त्या वेळीं मालासाठीं मागणी मुख्य ऑफिसांत घ्यावयाची आणि मागणी करणारा जेथें असेल तेथील नजीकच्या कारखान्यांतून त्या मागणीचा पुरवठा करावयाचा. या तर्‍हेनें रेल्वेभाडें वगैरे वांचतें व गिर्‍हाइकांस व कंपनीस फायदा पडतो.

४ पुष्कळ कारखान्यांमध्यें फायदा विशेषेंकरून मॅनेजरच्या गुणावर अवलंबून असतो. यामुळें सर्व कारखान्यांमध्यें जो हुषार मनुष्य असेल त्याच्या हातीं कार्यव्यवस्था सोंपवितां येते.

५ शिवाय असेंहि होतें कीं, निरनिराळ्या कारखान्यांमध्यें जीं माणसें असतात त्यांत निरनिराळ्या प्रकारची हुषारी आढळून येते. कित्येक कारखान्यांत विक्रीखात्याचा मनुष्य चांगला असतो, कित्येक कारखान्यांत माल तयार करण्यांत हुषारी दिसून येते आणि कित्येक कारखान्यांच्या यशस्वीपणाचें कारण कामकरी लोकांस संतुष्ट कसें ठेवावें यांत दिसून येणार्‍या हुषारीवर अवलंबून असतें. या सर्व कारखान्यांचें एकीकरण झाल्यानें प्रत्येक कारखान्यांतील चांगुलपणाचेंहि माणसांच्या एकीकरणामुळें एकीकरण करतां येतें.

६ अनेक कारखान्यांमध्यें एक प्रकारचाच माल न करतां निरनिराळ्या प्रकारच्या कामाकरितां निरनिराळे कारखाने वापरतां येतात. त्यामुळें एक काम सोडून दुसरें काम हातीं घेतेवेळेस प्रत्येक कारखान्याची जशी घडी बिघडते तशी बिघडत नाहीं, व त्यामुळें वेळेची काटकसर होते आणि प्रत्येक कामांत विशिष्टीकरण होतें.

७ निरनिराळ्या प्रकारचा माल एकाच कंपनींत तयाल होत असल्यानें गिर्‍हाइकी वाढते. कां कीं, एक प्रकारचा माल मिळविण्याकरितां सतरा कंपन्या धुंडाळण्यापेक्षां एकाच कंपनीकडे जाणें गिर्‍हाइकास बरें वाटतें.

८ मालाचा पुरवठा मोठ्या प्रमाणावर करण्याची ताकद ज्या कारखान्यास असेल तिकडे गिर्‍हाइक धांवतें. कां कीं, त्यास त्वरेनें माल करून देतां येतो व त्वरेनें पुरवठा करण्याची शक्ति असते.

९ बाहेरदेशीं माल पाठविण्यास मोठ्या कारखानदारांस अधिक सोपें जातें. त्यांनां माल बाहेरदेशीं पाठविण्यास स्वतःचें खातें उभारतां येतें व परदेशांतहि ऑफिसें उघडतां येतात.

१० ज्या वेळेस स्पर्धा चालू असते त्या वेळीं गिर्‍हाइक कायम राखण्याकरितां उधारीनें माल द्यावा लागतो आणि ही उधारी पुष्कळदां अहितकारक होते. संघ केल्यानें स्पर्धेची भीति कमी झाली म्हणजे घातुक उधारीला आळा बसतो.

पाश्चात्त्य देशांचा वाढलेला व्यवहार जो येथें वर्णन केला आहे त्यांत “ट्रस्ट” उर्फ महासंघ हीं भांडवलाच्या एकीकरणाचीं उदाहरणें होत; आणि मालमत्तेचे उदाहरणार्थ जमिनीचे बाजारांत विक्रीस असलेले गहाणरोखे हें भांडवलाच्या विस्तरणाचें उदाहरण होय. या प्रकारच्या रोख्यांनीं देशांत असलेल्या रोकडीखेरीज इतर संचयाचा व्यापारी दळणवळणास अत्यंत मोठा उपयोग होऊन देशाचें भांडवल अनेक पटींनीं वाढल्यासारखें होतें. व्यवहारांत जितका सुव्यवस्थितपणा व भक्कमपणा अधिक तितका रोख्यांवर लोकांचा विश्वास अधिक बसतो. असो. भांडवलाचें एकीकरण व विस्तरण या विषयासंबंधानें पुढच्या पायर्‍या जशा स्पष्ट दाखवून दिल्या तशा इतर मुद्दयांसंबधानें देतां येणार नाहींत. तथापि साधारण स्वरूपावगमासाठीं कांहीं ठळक गोष्टी देतां येतील.